सव्वा लाखाहून अधिक पदे रिक्त 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 जून 2019

राज्य सरकारने 72 हजार पदांची रिक्‍त पदांची मेगा भरती काढली; परंतु प्रत्यक्षात राज्यातील पोलिस, महसूल, शिक्षण, पशुसंवर्धन, समाजकल्याण, सहकार, आरोग्य, कृषी, बॅंक, पाणीपुरवठा यासह अन्य विभागांमध्ये सद्यस्थितीत सव्वा लाखाहून अधिक पदे रिक्‍त असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सोलापूर - राज्य सरकारने 72 हजार पदांची रिक्‍त पदांची मेगा भरती काढली; परंतु प्रत्यक्षात राज्यातील पोलिस, महसूल, शिक्षण, पशुसंवर्धन, समाजकल्याण, सहकार, आरोग्य, कृषी, बॅंक, पाणीपुरवठा यासह अन्य विभागांमध्ये सद्यस्थितीत सव्वा लाखाहून अधिक पदे रिक्‍त असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे सरकारी काम अन्‌ सहा महिने थांब याचीच प्रचिती नागरिकांना येत आहे. 

महसूल विभागात तहसीलदार, नायब तहसीलदार, तलाठी, लिपीक, शिपाई तर जिल्हा परिषदेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामसेवक, कक्ष अधिकारी, लिपीक, पोलिस प्रशासनात पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक, सहायक पोलिस उपनिरीक्षक, शिपाई आणि सहकार विभागात जिल्हा उपनिबंधक, सहायक उपनिबंधक, लिपीक तर राष्ट्रीयीकृत बॅंकांमध्ये व्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक, कॅशियर, शिपाई, आरोग्य विभागात डॉक्‍टर, निवासी डॉक्‍टर, तंत्र अधिकारी, परिचारिका आणि कृषी विभागात उपसंचालक, सहसंचालक, लिपीक, शिपाई, समाजकल्याणमध्ये समाजकल्याण अधिकारी, कार्यालय अधीक्षक, लिपीक, शिपाई यांची सुमारे 89 हजार पदे रिक्‍त आहेत. दुसरीकडे पाणीपुरवठा व सार्वजनिक बांधकाम विभागात अभियंता, उपअभियंता, सहायक अभियंता, लिपीक, शिपाई तर नगरविकासमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी, अभियंता आणि शिक्षण विभागात शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, लिपीक, शिपाई यांची 36 हजार पदे रिक्‍त असल्याची माहिती संबंधित विभागांच्या सूत्रांनी दिली. 

सर्वसामान्यांशी निगडित असलेल्या समाजकल्याण विभागाला मागील काही वर्षांत पूर्णवेळ अधिकारी मिळालेला नाही. प्रत्येक जिल्हा परिषदेच्या एकूण बजेटच्या 20 टक्‍के बजेट समाजकल्याण विभागाचे असूनही कर्मचाऱ्यांची सुमारे 45 टक्‍के पदे रिक्‍त आहेत. 
- परमेश्‍वर राऊत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: More than one lakh vacancies in state