तीन वर्षांतच केली ३१० कोटींची विकासकामे

मंगळवार, 31 ऑक्टोबर 2017

मोरगिरी - आमदार शंभूराज देसाई यांनी गेल्या तीन वर्षांत विधिमंडळात जनतेचे प्रश्न प्रभावीपणे मांडतानाच शासनाच्या विविध योजनांतून ३१० कोटी रुपयांची विकासकामे केली आहेत. त्याचबरोबर भूकंपग्रस्तांचे १९९५ सालापासून बंद झालेले दाखले पूर्ववत सुरू करणे व सह्याद्री व्याघ्र प्रकल्प जाचक अटी रद्द करण्यासारखे महत्त्वाचे निर्णय करून घेतले. 

मोरगिरी - आमदार शंभूराज देसाई यांनी गेल्या तीन वर्षांत विधिमंडळात जनतेचे प्रश्न प्रभावीपणे मांडतानाच शासनाच्या विविध योजनांतून ३१० कोटी रुपयांची विकासकामे केली आहेत. त्याचबरोबर भूकंपग्रस्तांचे १९९५ सालापासून बंद झालेले दाखले पूर्ववत सुरू करणे व सह्याद्री व्याघ्र प्रकल्प जाचक अटी रद्द करण्यासारखे महत्त्वाचे निर्णय करून घेतले. 

पाटण तालुक्‍याच्या कामासाठी निधीची तरतूद करून धरणाच्या कामासाठी ३२० कोटी ३० लाख रुपये, कऱ्हाड घाटमाथा रस्त्यासाठी ३२० कोटी, तोंडोशी प्रकल्पग्रस्तासाठी ८६ लाख, पाटण बस स्थानकासाठी दीड कोटी, पाटण येथील न्यायालय इमारतीसाठी चार कोटी, पाटण पोलिस कर्मचारी वसाहतीसाठी तीन कोटी ७५ लाख रुपये, पाटण येथे मागासवर्गीय मुलांमुलीचे वसतिगृहासाठी १७ कोटी ७५ लाख रुपये, कोयना पुनर्वसन गावठाण कामांसाठी चार कोटींचा निधी आणून विकासकामे सुरू केली आहेत, असे शंभूराज देसाई यांचे म्हणणे आहे. मतदारसंघातील गाव, वाडीवस्तीला बारमाही वाहतुकीस योग्य रस्त्यांनी जोडणार असल्याचे देसाईंनी सांगितले होते. गावातील अंतर्गत रस्त्यांचे काँक्रीटीकरण पूर्ण करणार, वाडी-वस्त्यांना जोडणारे फरशी साकव पूल व इतर मोठे पूल, धरणाचे पुनर्वसन, शासन खर्चाने शेतीला पाणी, डोंगर कपारीत व धोक्‍याच्या ठिकाणी असणाऱ्या दुर्गम गावांचे पुनर्वसन, ग्रामीण व डोंगरी भागात अंगणवाड्या, १२ तास विजेची सोय, पाटण तालुक्‍यातील १९९५ पासून बंद असलेले भूकंपग्रस्त दाखले आदी कामांसंबंधी त्यांनी आश्‍वासने दिली होती.

त्यातील बहुतांश आश्वासनांची पूर्तता करण्यावर त्यांनी भर दिला आहे. आमदार देसाईंनी पाटण तालुक्‍यातील भूकंपग्रस्तांचे १९९५ सालापासून बंद झालेले दाखले पूर्ववत सुरू करण्याचा निर्णय करून घेतला. पाटण तालुक्‍यातील ५५ हजार २१३ भूकंपबाधितांना त्याचा लाभ मिळाला. लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या स्मारकासाठी राज्य शासनाच्या निधीतून दहा कोटी मंजूर केले. लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या स्मृतिदिनानिमित्त कारखाना कार्यस्थळावर राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनास मान्यता घेतली. तारळी धरणातील पाणी ५० मीटरवरील क्षेत्रास देण्यास शासनाची खास बाब म्हणून तत्वत: मान्यता, पवनचक्कीमुळे खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी निधी, ग्रामसडक योजनेंतर्गत रस्ते, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प जाचक अटी रद्द करणे, वन्यप्राण्यांकडून होणाऱ्या पिकांच्या नुकसानीपोटी २०१५ पासून दुप्पट नुकसान भरपाई, पाटणच्या नळ पाणीपुरवठा योजनेसाठी ४६.५७ लाख रुपयांचा निधी मिळवण्यात त्यांना यश आले आहे.

जनतेनेच आमदार देसाईंच्या कामाचे ऑडिट करावे. विधानसभा निवडणुकीनंतर पंचायत समिती व जिल्हा परिषद, ग्रामपंचायत व सेवा सोसायटींच्या निवडणुकीत जनतेने आमच्यावर विश्‍वास टाकला आहे. त्यावरून आमदारांचे तीन वर्षांतील कामकाज दिसून येते. 
- सत्यजितसिंह पाटणकर, युवा नेते, पाटण

काय कमावले...
तारळी धरण प्रकल्पातील पाणी ५० मीटरवर उचलण्यास शासनमान्यता 
भूकंपग्रस्तांचे बंद झालेले दाखले पूर्ववत देण्याचे काम सुरू 
सह्याद्री व्याघ्र प्रकल्प जाचक अटी रद्द केल्या 
लोकनेते बाळासाहेब देसाई यांचा गौरव प्रस्ताव विधिमंडळात मांडला 
कोयना भूकंप निधी प्रतिवर्षी दहा कोटी 

आगामी नियोजन
राष्ट्रीय पेयजल योजनेतून ४४ योजना पूर्ण करण्याचे उद्दिष्ट 
मारेणा गुरेघर, तारळी, वांग, मराठवाडी धरणाचे काम पूर्ण करणार
पाटण तालुका पर्यटन विकास आराखडा तयार करणार