चंद्रकांतदादांचा सांगलीत "मॉर्निंग मंत्रा' 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 जुलै 2018

सांगली : महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या दुसऱ्या टप्प्यात नेतेमंडळींनी रान उठवले आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आज पहाटेच मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले. शहरातील महावीर उद्यान आणि आमराईत फिरण्यास आलेल्या ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला. भाजपच्या विकासाचा अजेंडा त्यांच्यासमोर ठेवून मदतीचे आवाहन केले. 

सांगली : महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या दुसऱ्या टप्प्यात नेतेमंडळींनी रान उठवले आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आज पहाटेच मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले. शहरातील महावीर उद्यान आणि आमराईत फिरण्यास आलेल्या ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला. भाजपच्या विकासाचा अजेंडा त्यांच्यासमोर ठेवून मदतीचे आवाहन केले. 

प्रचाराचा पूर्वाध संपला आहे. आता दुसऱ्या टप्प्यात नेतेमंडळींनी वातावरण ढवळून काढले आहे. भाजपने तर मंत्र्यांची फौजच प्रचारात उतरवली आहे. आतापर्यंत प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या सभा झाल्या आहेत. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख आदींच्या सभा होणार आहेत. 

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा महापालिका निवडणूक लढवत आहे. पाटील यांनी आतापर्यंत अनेक ठिकाणी सभा घेऊन ते प्रचारात अग्रभागी दिसत आहेत. कालही पाटील यांनी सांगली व कुपवाड परिसरात प्रचार सभा घेतल्या. रात्री मुक्कामास ते सांगलीत होते. आज पहाटेच ते मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले. माजी उपमहापौर शेखर इनामदार आणि पदाधिकारी यांच्यासमवेत त्यांनी महावीर उद्यान गाठले. उद्यानात आलेल्या ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला. ज्येष्ठांनी परिसरातील समस्यांचा पाढा त्यांच्यासमोर वाचला. पाटील यांनी भाजपचा शहर विकासाचा अजेंडा त्यांच्यासमोर सादर केला. समस्या सोडवण्याचे आश्‍वासन दिले. आमराई येथेही त्यांनी फेरफटका मारला. तेथेही फिरायला आलेल्या नागरिकांशी संवाद साधला. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. भाजपचा शहराचा विकास करू शकतो अशी ग्वाही देत मदतीची विनंती केली. 

भाजपचे मंत्री चक्क सकाळीच उद्यानात येऊन संवाद साधत असल्याचे पाहून अनेकांना आश्‍चर्यचा धक्का बसला. काहींनी मनमोकळेपणाने पाटील यांच्याशी गप्पा मारल्या. त्यांनी मतदारांना विकासाचा "मॉर्निंग मंत्रा' दिला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: morning discussion with chandrakant patil and citizebs of sangali