सावत्र मुलीच्या खूनप्रकरणी आईला जन्मठेप 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 नोव्हेंबर 2016

सोलापूर - सावत्र मुलगी साक्षी संजय माळी (वय सात) हिचे अपहरण केल्यानंतर विहिरीत ढकलून खून केल्याप्रकरणी आई उषा संजय माळी (वय 35) हिला जिल्हा व सत्र न्यायाधीश विभा कंकणवाडी यांनी बुधवारी जन्मठेप आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. ही घटना यावली (ता. मोहोळ) येथे 17 मार्च 2015 रोजी घडली होती. 

सोलापूर - सावत्र मुलगी साक्षी संजय माळी (वय सात) हिचे अपहरण केल्यानंतर विहिरीत ढकलून खून केल्याप्रकरणी आई उषा संजय माळी (वय 35) हिला जिल्हा व सत्र न्यायाधीश विभा कंकणवाडी यांनी बुधवारी जन्मठेप आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. ही घटना यावली (ता. मोहोळ) येथे 17 मार्च 2015 रोजी घडली होती. 

या खटल्याची हकिगत अशी, की संजय वसंत माळी (वय 35) याने उषासोबत दुसरे लग्न केले होते. साक्षी ही उषाची सावत्र मुलगी होती. संजयला पहिल्या पत्नीपासून साक्षी आणि तिचा भाऊ आकाश (वय सहा) अशी दोन मुले होती. 17 मार्च 2015 रोजी साक्षी आणि आकाश हे दोघे शाळेतून घरी आले. जेवणानंतर दोघेही आई उषा आणि वडील संजय यांच्यासोबत शेतात गेले. दुपारी दीडच्या सुमारास मुलांना खेळायला सोडून संजय झोपला. उषा शेतात खुरपत होती. काही वेळाने संजय झोपल्याचे पाहून तिने दोन्ही मुलांना मध दाखविण्याच्या बहाण्याने विहिरीजवळ नेले. मुलगा आकाशला दुसरीकडे पाहायला सांगून साक्षीला विहिरीत ढकलून दिले. विहिरीतून आवाज आल्याने आकाश पळत तिथे आला. उषाने आकाशलाही ढकलून दिले, पण तो पाण्यात न पडता बाजूला पडला. तो कठड्यावर येऊन बसला. साक्षीला पोहता येत नसल्याने पाण्यात बुडून तिचा मृत्यू झाला. 
उषा तेथून निघून गेली. काही वेळाने संजयला जाग आली. त्याने दोन्ही मुलांचा शोध घेतला. दोघेही सापडत नसल्याने संजयने पोलिसांत तक्रार दिली. पोलिस रात्रीच्या वेळी तपासाकरिता विहिरीकडे आले. मुलगा आकाश विहिरीच्या कठड्यावर बसलेला होता. गावकऱ्यांच्या मदतीने त्याला बाहेर काढण्यात आले. त्याने घडलेली घटना वडिलांना व सर्वांना सांगितली. संजयच्या फिर्यादीनुसार पत्नी उषावर गुन्हा दाखल झाला होता.

न्यायालयाने उषाला खुनात आणि अपहरणात जन्मठेप आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दोन्ही गुन्ह्यांतील जन्मठेपेची शिक्षा एकत्रित भोगायची आहे. सरकारतर्फे चार साक्षीदार तपासण्यात आले. यात फिर्यादी संजय आणि मुलगा आकाश या दोघांची साक्ष महत्त्वाची ठरली. यात सरकारतर्फे इनायतअली शेख यांनी तर आरोपीतर्फे धनंजय माने यांनी काम पाहिले.

Web Title: mother of his daughter's murder and sentenced to