सासूला वार वर्मी बसला, पळून जाताना जावयाचाही अंत झाला... काय झाले वाचा?

तानाजी टाकले
Sunday, 6 September 2020

पत्नीला नांदायला नेण्याच्या कारणावरून वादावादीतून झालेल्या मारामारीत लाकडी दांडक्‍याचा घाव डोक्‍यात वर्मी लागल्याने सासू श्रीमती शालन रामचंद्र पाटील या मृत झाल्या.

आष्टा (जि. सांगली ) : पत्नीला नांदायला नेण्याच्या कारणावरून वादावादीतून झालेल्या मारामारीत लाकडी दांडक्‍याचा घाव डोक्‍यात वर्मी लागल्याने सासू श्रीमती शालन रामचंद्र पाटील (वय 65, रा. कारंदवाडी, ता. वाळवा) या मृत झाल्या. मारहाण करून पळून जाण्याच्या प्रयत्नात रस्त्यावर पडून गंभीर जखमी झालेल्या संशयित आरोपी जावयाचाही उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

शुक्रवारी मध्यरात्री हा प्रकार घडला. या प्रकरणी आज रात्री दिलीप रामचंद्र पाटील यांनी आष्टा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांत मृत जावई कृष्णा लहू खापरे (वय 45, रा. बोलोली, ता. करवीर) याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. 

पोलिसांनी सांगितले, मंगल व कृष्णा यांचा 11 वर्षांपूर्वी विवाह झाला आहे. त्यांना एक मुलगा व दोन मुली आहेत. कृष्णा याला दारूचे व्यसन होते. तो मंगल हिच्याशी वारंवार भांडत होता. त्यामुळे मंगल तिन्ही मुलांसह मार्च महिन्यात कारंदवाडी येथे आई शालन यांच्या घरी राहण्यास आली होती. शुक्रवारी (ता. 4) दुपारी बारा वाजता मंगलचा पती कृष्णा कारंदवाडी येथे भेटायला आला. रात्री मुक्कामास थांबला. मध्यरात्री एकच्या सुमारास कृष्णा, शालन व मंगल यांच्यात वाद सुरू झाला. कृष्णा मोठमोठ्याने शिव्या देत होता.

मनीषा, दिलीप व वैभव हे वाद सोडवण्यासाठी गेले असता, कृष्णा हातात लाकडी ओंडका घेऊन मंगल हिला तू नांदायला का येत नाहीस म्हणून मारहाण करीत होता. मंगलच्या डाव्या हातावर ओंडक्‍याने मारले. यावेळी आई शालन आडवी आली. लाडकाचा ओंडका तिच्या डोक्‍यात बसला. रक्तस्त्राव सुरू झाला. त्या बेशुद्ध झाल्या. वैभव, ज्योतीराम हे कृष्णा याला धरत असताना तो लाकडी ओंडका घेऊन पळाला. घरासमोरील रस्त्यावर त्याचा तोल जाऊन तो पडला. डोक्‍याला दुखापत झाली. 

या घटनेनंतर दोघांनाही आष्टा येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. शालन या मृत झाल्या होत्या. कृष्णा याला पुढील उपचारासाठी सांगली येथील शासकीय रुग्णालयात हलवले. उपचार सुरु असताना सायंकाळी सहाच्या सुमारास त्याचा मृत्यु झाला. दोन्ही मृत्यू घटनांची नोंद आष्टा पोलिस ठाण्यात झाली आहे. पोलिस निरीक्षक भानुदास निंभोरे तपास करीत आहेत. 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mother-in-law's dead while beating wife at Karandwadi