माय माझी हिरकणी....

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 मे 2017

संघर्षातही तिने दिली सुसंस्काराची शिदोरी...

मायेची पखरण करणारी आई, संकटसमयी धीर देणारी आई, कष्ट करून मुलांसाठी झिजणारी आई, मुलांचे आयुष्य सुंदर व्हावे म्हणून स्वतःचा विचार न करता जीवाचे रान करणारी... आईची कितीतरी रूपे. प्रत्येकाचेच आपल्या आईशी असणारे जिव्हाळ्याचे नाते त्याचे जगणे समृद्ध करते. प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करीत आपल्या मुलांना दिशा देणाऱ्या आईबद्दलच्या भावना ‘माय माझी हिरकणी’मधून आईच्या आठवणीला उजाळा देणाऱ्या... काही निवडक भावना...

संघर्षातही तिने दिली सुसंस्काराची शिदोरी...

मायेची पखरण करणारी आई, संकटसमयी धीर देणारी आई, कष्ट करून मुलांसाठी झिजणारी आई, मुलांचे आयुष्य सुंदर व्हावे म्हणून स्वतःचा विचार न करता जीवाचे रान करणारी... आईची कितीतरी रूपे. प्रत्येकाचेच आपल्या आईशी असणारे जिव्हाळ्याचे नाते त्याचे जगणे समृद्ध करते. प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करीत आपल्या मुलांना दिशा देणाऱ्या आईबद्दलच्या भावना ‘माय माझी हिरकणी’मधून आईच्या आठवणीला उजाळा देणाऱ्या... काही निवडक भावना...

आज कधीही परत न येऊ शकणाऱ्या भूतकाळाकडे पाहिलं, की आठवणीचे मनोहारी शंखशिंपले मनाला खुणावतात. सुरवातीस बांबोरी आणि नंतर शिक्षणासाठी नगर या दोन गावांत आमचं वास्तव्य झालं. आई-बाबांकडे सर्वगुण असूनही नशीब खडतरच होते. त्यामुळे अतोनात श्रम करूनही आर्थिक स्थिती बेताचीच होती; पण त्यातूनही मनोधैर्य खचून न देता त्यांनी आम्हा भावंडांना ‘अपत्य हीच संपत्ती’ मानून सुसंस्कृत आणि सुशिक्षित बनविले. सुसंस्कृत अशासाठी म्हणते, की दैनंदिन जीवनात उपयोगी पडणारे व्यवहारज्ञान माणुसकी, अतिथ्यशीलता, विनम्रपणा हे गुण त्यांनी आमच्या अंगी बाणविले. 

 

कुठलेही काम करण्यात लाज नसते हे आईने आम्हाला स्वतःच्या उदाहरणावरून पटवून दिले. वडील नोकरीनिमित्त दूर हैदराबाद- सिकंदराबाद येथे होते. आम्ही पाच भावंडे प्राथमिक शाळेत व हायस्कूलमध्ये होतो. म्हणजे सर्व जण वय १६ च्या आतील. आई दोन वर्षांची असताना पोरकी झालेली. गावात शाळा नसल्याने अशिक्षित. ही उणीव तिने स्वतःच घरी अक्षर बाराखडी शिकून पुस्तक वाचण्यापर्यंत मजल मारून भरून काढली. न शिकता देखील तिची हुशारी, स्पष्टवक्‍तेपणा, करारी स्वभाव तिच्या व्यवहारातून व्यक्त होई. पाच मुलांच्या शिक्षणाचे आर्थिक नियोजन ती करी. वडील हैदराबादला असताना पुरेशा सुविधा नसताना संसाराचा गाडा समर्थपणे ओढीत होती. हरभरा पोत्याने विकत घेऊन, भिजवून दळून सर्व उस्तवार करून घरीच हरभऱ्याची डाळ तयार करायची. आम्ही भावंडे ती बाजारात विकत असू, अशा तऱ्हेने ती संसाराला हातभार लावीत होती. ती आम्हाला नेहमी सांगायची, कष्टाने माणूस कधीच मरत नाही, कष्ट केले तर तुम्हाला शारीरिक तंदुरुस्ती व आर्थिक बळ मिळते. 

आपण नेहमी दुसऱ्याचे चांगले करावे, ते जमत नसेल तर निदान वाईट तरी करू नये हे तिचे वाक्‍य आजही कानात रुंजी घालते. माहेर म्हणजे आईच्या आठवणींचा आहेर! चुलीवरील, नंतर भुश्‍याच्या शेगडीवरील आईचा स्वयंपाक फारच लज्जतदार. पुढे स्टोव्ह आला, गॅसशेगडी आली. तिखटमीठाच्या डब्यातील बरेच कप्पे रिकामे असले तरी तिने केलेल्या भाज्यांची चव न्यारीच असे. 

वांबोरीत वीज नव्हती. संध्याकाळी कंदील पेटवून अभ्यास करावा लागे. सकाळी दहा व संध्याकाळी सहा वाजता गरमागरम जेवण वाढत असे. रात्री झोपताना आई गोष्टी सांगायची. हा आनंद हल्ली दुर्मिळच! आई खूप प्रेमळ होती. आम्हीदेखील तिच्याबद्दल आदरयुक्त भीती बाळगत होतो. हात उगारायची तिला कधी वेळच आली नाही, असे असताना आम्ही सर्व भावंडे स्कॉलर होतो आणि एक आदर्श कुटुंब म्हणून गाव आमच्याकडे पाही. कुठल्याही परिस्थितीत स्वाभिमान सोडू नये, हे ती वारंवार सांगे. 

अडलेल्यांना मदत करण्यास सतत पुढे असे. एवढ्या मोठ्या कुटुंबाचा रथ ओढताना अनेक वेळेस अंगाला चटके बसले; परंतु त्याचे व्रण त्यांनी लोकांना कधी दाखविले नाहीत. शिकवणी, क्‍लास हे शब्दच माहीत नव्हते. आई-बाबांच्या त्याग आणि कष्टामुळेच आम्ही सर्व भावंडे उच्चशिक्षित असून, सुस्थितीत आहोत. साध्यासुध्या मध्यमवर्गीय कुटुंबात सुसंस्कार, मानवता, प्रामाणिकपणा याची शिदोरी मला मिळाली. आजही आईच्या आठवणी खाचखळग्यांनी युक्त वाटेवर चालण्यास बळ देतात. 
पुनश्‍चः जन्म घेईन माते ‘तुझ्याच पोटी!’ 
माझ्या आईला सातारा येथील ज्ञानदीप मंडळातर्फे ‘आदर्श माता’ पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

- डॉ. अरुणा शां. फिरोदिया, सातारा 

माझी माय 
आमच्यासाठी कुटुंबाचा आधार, आदर्श हसतमुख व्यक्तिमत्त्व. आपल्या मुलांना सुसंस्कृत, उचशिक्षित बनवायचे स्वप्न तिचे आणि पप्पांचे अपार कष्ट, जिद्द, सकारात्मकता यामुळे आज पूर्णत्वास आले. माझी मुले हीच आमची संपत्ती, अशी म्हणणारी माय आजही माझ्या आणि दादाच्या अडचणीत खंबीरपणे पाठीशी असते. लग्नानंतर ती छोट्याशा गावातून कऱ्हाड शहरात आली. काही काळ नोकरी केली; पण दोघे नोकरीला. मग मुलांकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून स्वतःच्या मिळकतीवर घरीच ब्यूटी पार्लर सुरू केले. कुटुंबाची जबाबदारी पण तेवढीच सांभाळली. जिद्दीने शिका आणि करून दाखवा असा बाणा असणारी मायने कायम प्रेमाने हसऱ्या स्वभावाने नाती बांधून ठेवली. मी MPT ORTHO आणि दादा M. PHRAM अशा पदव्या मिळवल्या असतील, तरी त्यामागील आमच्या आई- बाबांचे कष्ट, साथ पण महत्त्वाची. प्रेमळ आई, समजूतदार बाबा यांनी आमचासाठी घेतलेले कष्ट शब्दांत सांगणे कठीण. फक्त एवढंच म्हणेन... ‘माझी माय.. माझा प्रगाढ विश्वास तू, मायेच्या पावसाचा ओलावा तू, अन्‌ शेवटच्या कुशीतील विसावा तू...’

- डॉ. अमृता अमर कोठावळे

मातृदेवो भव !!!
रायगडची हिरकणी डोळ्यापुढे आली आणि मातृदिनानिमित्त आईसाठी चार शब्द लिहावेसे वाटले. या माउलीबद्दल चार नव्हे चारशे, चार हजार शब्दही कमीच आहेत. आई हे व्यक्तिमत्त्व सुंदर कल्पनातीत आहे.

अनादीकाळापासून हे आताच्या या वळणावर सुद्धा ‘आई’ ही केवळ ‘आईच’ असते. तिचं लेकरांप्रती असलेले प्रेम, माया, कष्ट, जिव्हाळा, काळजी याचे वर्णन करणे केवळ अशक्‍य आहे हे सर्व शब्दात मांडता येणारच नाही. एक व्यक्ती म्हणून किंवा अमूक एकाची आई म्हणून मांडलेले चार शब्द, आठवणी, अनुभव हे गाठीशी असू शकतात; पण मातृदिनानिमित्त सर्व ‘आई’ या व्यक्तीसाठी मातृदिन हा ज्याचा त्याने फुले देऊन व सत्कार करण्याचाच दिवस; पण आईसाठीचा असा दिवस कधीही एक दिवसाचा नसतो व नसावा.

- माधुरी कुलकर्णी, सातारा

भावंडावर केले श्रमसंस्कार...
आई या एका शब्दातच सगळं विश्‍व सामावले आहे. जीवनातल्या संकटांचा अवघड कडा पार करून आम्हाला जपणारी आमची हिरकणी माझी आई म्हणजे सौ. शामला सदाशिव देसाई. सदैव हसतमुख, अगत्यशील, प्रेमळ आणि कर्तव्यतत्पर. मुंबईच्या दोन खोल्यांच्या घरात सदैव माणसांची वर्दळ. संसार, माहेरच्या सगळ्या माणसांना तिने जोडून ठेवले. १९९३ मध्ये वडिलांची कंपनी बंद पडल्यावर जेवणाचे डबे करून, घरगुती मसाले, चटण्या, सांडगी, मेतकुट असे अनेक पदार्थ करून विकायला सुरवात केली. आमच्या वाडीतील वृद्ध व्यक्‍तींना स्वत: डबे नेऊन द्यायची. घराला आर्थिक हातभार लावत असताना आम्हा भावंडांवरही तिने श्रमसंस्कार केले.

- सौ. रिमा देवदत्त धायगुडे, सातारा

खडतर स्थितीत आईमुळे स्वावलंबी...
आम्ही तीन बहिणी व तीन भाऊ. वडील प्राथमिक शिक्षक. माझी आई पूर्ण अडाणी- निरक्षर; परंतु तिला शिक्षणाची आवड व तळमळ होती. गरीब परिस्थितीत आम्हा भावडांना उच्च शिक्षण देण्यासाठी आईने खूप कष्ट घेतले. ती दररोज शेतात राबायची. खूप कष्ट करायची. मुलगा- मुलगी भेद करू नका म्हणून आज प्रबोधन होते आहे; परंतु ५५- ६० वर्षांपूर्वी माझी आई जात्यावर ओवी म्हणायची...
मुलाया परास मुलगी कशाने झालीय उणी....
एका कुशीची रतने दोन्ही....
आम्ही मुली आहोत, म्हणून आईने कधीही कशाचीही उणीव वा कमतरता आम्हाला भासू दिली नाही. खडतर परिस्थितीत सुद्धा आम्हाला चांगले उच्च शिक्षण दिले व स्वावलंबी बनविले.

- शकुंतला हुलवान, मलकापूर

आईची सर कोणालाही येऊ शकत नाही
काही दुखले- खुपले, की पळत जाऊन आईला सांगणारी मुले दिसतातच; पण आईला काय होतेय हे समजण्याएवढे वय त्या वेळी नव्हते. आता मात्र मोठे झाल्यावर ती आठवण झाल्यावर दुःख होते. एके दिवशी आईशी गप्पा मारताना ती म्हणाली, ‘‘आता सर्वांचे छान चालले आहे. सर्व मुले- मुली सुखात, आनंदात आहेत. केलेल्या कष्टाचे चीज झाले. आता शेवटपर्यंत हिंडून फिरून तब्येत चांगली राहवी ही एकच इच्छा आहे.’’ पण दुसऱ्याच दिवशी शतपावली करत असताना आई खाली पडली. मांडीचे हाड मोडले. ऑपरेशन झाले आणि एका जागेवर बसण्याची वेळ तिच्यावर आली. आईची सर कोणालाही येऊ शकत नाही. मुलाला उशीर झाला तर कोणत्याही कामात लक्ष न लागणारी आई, मुलांवर जीव ओवाळून टाकणारी आई, मुलांनाच सर्वस्व मानणारी आई ही देवाने बनवलेली एक शक्ती आहे. 

- दीपक काटकर, सातारा

आयुष्याची शिल्पकार 
माझी आई माझ्या आयुष्याची शिल्पकार आहे. सौ. सुनीता नारायण धायगुडे असे तिचे नाव. एक अनोखी आणि अद्वितीय हिरकणी. आर्थिक संकटाच्या काळातही काटकसरीने संसार करून तिने आम्हा चौघा भावंडांना उच्चशिक्षित केले. साताऱ्यात स्वत:चे घर उभे करून मलाही स्वत:च्या पायावर उभे राहण्याचे बळ देणारी माय माऊली. ‘लिव्हर सोरायसिस’सारख्या वेदनादायी आजाराशी तिने १२ वर्षे लढा दिला; पण त्यातही तिचा हसतमुख आणि प्रेमळ स्वभाव तसूभरही कमी झाला नाही. आज ती शरीराने आमच्यात नसली, तरीही संस्कारांनी आणि शिकवणुकीने ती सदैव आमच्यातच राहील.

- देवदत्त धायगुडे, सातारा

ती असते आई
चोचित चारा आणून पिलांना भरवते 
आपल्या वासराला प्रेमाने चाटते 
दिवसभर काडीकाडी गोळा करून घरटे बांधते 
सगळ्या मुलांवर सारखी माया करते
मुलांना बरे नसताना रात्र-रात्र जागते
दिवे लागणीला मुलांना शुभंकरोती शिकविते
दिवसभर राबते, मुलांची काळजी घेते
मुलांनी खूप शिकावे, 
जगात नाव कमवावे असे वाटते
ठेच लागल्यावर आई गं म्हणून तीच आठवते
म्हातारी झाली तरी मुलांच्या डोक्‍यावर थरथरता हात फिरविते 
ती असते आई
मुलांना मात्र त्याची जाणीव नसते
म्हातारपणी आई अडगळ असते
अरे ती आई असते
अरे ती आई असते...

- पद्मा शिंदे, जाधववाडी, फलटण.

कष्ट मोठे... लक्ष भावंडांकडे...
माझी आई एक नर्स होती. बाई बाळंतपणासाठी अडली, की तिची सुटका करणे, आईचा व बाळाचा जीव वाचवणे हा तिच्या डाव्या हाताचा मळ होता. आमच्या आळीतील सर्व मुले तिच्या पायावरची आहेत असे सर्व शेजारी म्हणायचे. रात्री- अपरात्री झोपेतून जागे झालो, की शेजारी आई नसायची. आई कोणाच्या तरी घरी बाळंतपणासाठी गेलेली असायची. आम्ही चार भावंडे. सर्वांत लहान मी. कष्ट करून तिने आमचे संगोपन केले. कामावर जाताना आई सर्व सूचना करून जायची. कामावर असायची मात्र मन, लक्ष आम्हा भावंडाकडे असायचे. 

- नलिनी काटकर, सातारा

मुलांच्या शिक्षणासाठी लढली हिरकणी
बारावीनंतर माझं लग्न झालं. हुंडा न घेणाऱ्या मुलांशीच आपल्या मुलीचा विवाह करण्याचा निर्धार तिने खरा करून दाखवला. मनानं श्रीमंत असं सासर मिळालं. लग्नानंतर माझ्या मुलीला शिकवा अशी अटही तिनं घातली. आज मी प्राथमिक शिक्षिका होऊन स्वत:च्या पायावर उभी आहे. पोस्ट ग्रॅज्युएशनचं शिक्षण पूर्ण करण्यात माझ्या पतींचाही मोलाचा वाटा आहे. आज आम्ही सर्व भावंडं उच्चशिक्षित आहोत. तत्कालीन समाजव्यवस्थेतील जातीपातींची बंधने झुगारून आपल्या मुलींच्या शिक्षणासाठी खंबीरपणे पाठीशी उभी राहणारी माझी माय खरोखरच हिरकणी आहे. 

- सौ. बबिता बबन धायगुडे, वाई

काळाच्या पुढे राहणारी आई...
आपल्या मुलांना कुणी नावे ठेवू नयेत, ती कुठेही कमी असू नयेत, त्यांनी एक चांगली व्यक्‍ती म्हणून समाजात वावरावे यावर आईचा कटाक्ष असे. सध्या जरी आम्ही आपापल्या संसारात रमलेलो असलो तरी तिची अजूनही आमच्यावर घारीची नजर असते आणि ६५ व्या वर्षीही ती उत्साहाने भारलेली असते. नवनवीन गोष्टी शिकण्याकडे तिचा कल असतो. एवढ्यावरच न थांबता नातवंडांनाही सतत काहीतरी वेगळे शिकवण्याची तिची धडपड असते. सगळ्यांच्या मते, काळाच्या पुढे राहणारी बाई म्हणजेच माझी आई.

- सुमेधा सुधीर कुलकर्णी, फलटण.

अखंड कामात रमणारी आई...
१९७२ चा दुष्काळ पडला आणि आई, मामा असे सर्व जण कर्नाटकातून महाराष्ट्रात पोट भरण्यासाठी आले. माझ्या आईने अनेक प्रकारची कामे केली. मी शिक्षण घेऊन सातारा जिल्हा बॅंकेत १९९२ मध्ये नोकरीला लागलो. माझी नोकरी २५ वर्षे झाली. मी आईला म्हणायचो तू आता कामे बंद कर. आई म्हणायची, ‘तुला मोठे होण्यासाठी अजून खूप काम करणे बाकी आहे.’ या आशेने माझी आई वयाच्या ७७ वर्षांपर्यंत अखंड काम करत राहिली. गवंडी काम, स्वयंपाक करणे, धुणं-भांडी करणे, सर्व कामे तिने केली. एमएपर्यंत शिक्षण घेतले ते तिच्यामुळेच. 

- हणमंत पुजारी, जखीणवाडी, ता. कऱ्हाड

Web Title: mothers day