
सारिका यांची नजर चुकवून शिवम गॅलरीतील कठड्यावर चढला आणि त्याचा खाली तोल गेला. किचनमध्ये त्याला खाऊ करीत असलेल्या सारिका यांनी हा हृदयाचा ठोका चुकवणारा प्रसंग पाहिला.
संगमनेर : शिवकाळात हिरकणीची गोष्ट सर्वांना ज्ञात आहे. गडाचे दरवाजे बंद झाल्याने ती मुलाच्या ओढीने जिवाची पर्वा न करता कातळावरून खाली उतरते. संगमनेर तालुक्यातही अशीच घटना घडली. त्या हिरकणीने दुसऱ्या मजल्यावरून खाली कोसळणाऱ्या मुलाला वाचविण्यासाठी हवेत झेप घेतली. क्षणार्धात दोघेही खाली कोसळले... तिचा पाय मोडला, तोंडाला मार लागला. त्याही स्थितीत ती बाळाला घेऊन रुग्णालयात गेली. पुढे घडले ते नक्कीच सुखात्मक नव्हते.
चिमुरड्या शिवमसोबत सारिका आरोटे
संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी शिवारातील श्री गणेश कॉलनीमधील इमारतीत दुसऱ्या मजल्यावर कृष्णा आरोटे यांचे कुटुंब राहते. कृष्णा यांची पत्नी सारिका (वय 26), मुलगा शिवम (वय 2) व पत्नीची आजी राहतात. काल सायंकाळी सर्व घरात कामात मग्न होते. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास त्यांचा मुलगा शिवम हा झोपेतून उठला. मुलगा झोपेतून उठल्याने त्याला खीर करण्यासाठी सारिका स्वयंपाकघरात गेल्या.
दुसऱ्या मजल्यावरून घेतली झेप
सारिका यांची नजर चुकवून शिवम गॅलरीतील कठड्यावर चढला आणि त्याचा खाली तोल गेला. किचनमध्ये त्याला खाऊ करीत असलेल्या सारिका यांनी हा हृदयाचा ठोका चुकवणारा प्रसंग पाहिला. पोटचा गोळा मृत्यूच्या दाढेत जात असल्याचे दिसताच त्यांनी कोणताही विचार केला नाही. थेट दुसऱ्या मजल्यावरून त्याला वाचविण्यासाठी झेप घेतली. शिवमला खाली पडण्यापूर्वी वरच्या वर आपण झेलू, असा विचार त्यांच्या मनात होता. कोणाला काही कळायच्या आत दोघेही धाडकन खाली पडले.
हेही वाचा बिबट्या घरात अन् माणसं दारात
बाळाचे काय झाले?
सारिका यांच्या पायाला मार लागला. त्यांना नीट उभेही राहता येईना, तरीही जखमी स्थितीत त्या उठल्या आणि जखमी अवस्थेतील त्या पोटच्या गोळ्याला तिने कवटाळले आणि हंबरडा फोडला. बिगीने मुलावर उपचार व्हावेत यासाठी धडपड करू लागली. मात्र, तिचा इलाज चालेना. आरडाओरड झाल्याने इमारतीतील लोक मदतीला धावले. त्यांनी त्या माय-लेकास घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांना दाखवत असताना तिचा जीव तीळतीळ तुटत होता. डॉक्टरांनी शिवमची तपासणी केली आणि शिवम या जगात राहिला नसल्याचे सांगितले, तेव्हा तिच्या पायाखालची जमीन सरकली.
दुसऱ्यांदा घडले विपरीत
शिवम हा आरोटे दाम्पत्याचा दुसरा मुलगा होता. पहिल्या मुलाचा जन्मानंतर आठवड्यात मृत्यू झाला होता. त्यामुळे शिवम सर्वांच्याच लाडाचा होता. आता दुसरा मुलगा शिवमचा असा मृत्यू झाल्याने आरोटे कुटुंबीय हेलावून गेले आहे.