कोल्हापूर: चैनीसाठी मोटारसायकली चोरणारे गजाआड

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 जुलै 2019

  • चैनीसाठी मोटारसायकली चोरणाऱ्या दोघा चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक
  • उमेश उत्तम जाधव (वय 38 उजळाईवाडी) व नवनाथ काशिनाथ नाईक (33 पट्टणकडोली) अशी त्यांची नावे. 
  •  दोघांकडून जवळपास साडेतीन लाखांच्या14 मोटरसायकल जप्त

कोल्हापूर - चैनीसाठी मोटारसायकली चोरणाऱ्या दोघा चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. उमेश उत्तम जाधव (वय 38 उजळाईवाडी) व नवनाथ काशिनाथ नाईक (33 पट्टणकडोली) अशी त्यांची नावे आहेत. दोघांकडून जवळपास साडेतीन लाखांच्या14 मोटरसायकल जप्त केल्या. त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्‍यता पोलिसांनी वर्तवली आहे. 

शहरातून पार्किंगचा ठिकाणाहून मोटरसायकल चोरीचे प्रमाण वाढले आहे. गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांनी पथके तयार केली आहेत. पथकातील हेडकॉन्स्टेबल संदीप कुंभार यांना ह्या चोऱ्या उमेश जाधव याने केल्याची माहिती मिळाली. संशयित जाधव हा सेंट झेवियर्स ते मेरी वेदर या परिसरात चोरीची दुचाकी विकण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पवार यांचे पथक तैनात केले.

यावेळी जाधव याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पथकाने त्याची चौकशी केली असता त्याने मोटारसायकल चोरीची कबुली देत मित्र नवनाथ नाईक यांच्या मदतीने मोटरसायकल चोरत असल्याचे सांगितले. पोलिसांनी उमेश जाधवसह नवनाथ नाईक याला अटक करून दोघांकडून तब्बल 14 मोटारसायकली जप्त केल्या. गेल्या वर्षभरात कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून त्यांनी ह्या मोटरसायकली चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. 

सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पवार हेडकॉन्स्टेबल संदीप कुंभार, नितीन चोथे, अमोल कोळेकर अर्जुन बंद्रे,राजू हंडे,पांडुरंग पाटील,सागर कांडगाव आदींनी ही कारवाई केली. 

उधारी भागवण्यासाठी 
संशयित उमेश जाधव याला संगणकाचे चांगले ज्ञान आहे. त्याला व्हिडिओ गेमचे व्यसन होते. त्यातून झालेली उधारी भागवण्यासाठी त्यांनी नवनाथ नाईकच्या मदतीने चोऱ्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. जप्त केलेल्या मोटरसायकलीमध्ये कोल्हापूर शहरातून चोरलेल्या सात तसेच वडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतून दोन, जयसिंगपूर गांधीनगर, शहापूर, शिवाजीनगर येथून चोरलेल्या प्रत्येकी एका मोटारसायकलचा समावेश आहे. 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: motorbike robbery two arrested in Kolhapur