डोंगरातून घसरणाऱ्या दगडांनी उडवली झोप

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

डोंगरातून मोठ-मोठे दगड निसटू लागल्याने भीतीने रहिवाशांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. मोठी दुर्घटना घडण्यापूर्वीच या गंभीर प्रकाराकडे वन विभाग आणि प्रशासनाने लक्ष द्यावे.
- अशोक बडेकर, स्थानिक रहिवाशी 

ढेबेवाडी - डोंगरातील मोठमोठे दगड निसटून पायथ्याला असलेल्या घरांच्या दिशेने गडगडत येऊ लागल्याने गुढे (ता. पाटण) येथील डोंगरपायथ्याला असलेल्या बडेकरवस्तीसह लगतच्या तीन वस्त्यांतील रहिवाशांची झोपच उडाली आहे. वन विभागाने तातडीने हा धोका हटवून संभाव्य मोठी दुर्घटना टाळावी, अशी मागणी तेथील रहिवाशांनी केली आहे.

गुढे-काळगाव रस्त्यापासून जवळच वन विभागाच्या डोंगराच्या कुशीत बडेकरवस्ती, तडाखेवस्ती व सातपुतेवस्ती वसली आहे. डोंगरावर असलेल्या मोठमोठ्या दगडांची पायथ्यालगतच्या या वस्त्यांना पहिल्यापासूनच धास्ती आहे. अनेकदा हे दगड वस्तीच्या दिशेने गडगडत येऊन झाडांमध्ये अडकल्याच्या घटनाही तेथे घडल्या आहेत. पावसाळ्यात दगड निसटण्याचे प्रकार वाढत असल्याने भीतीमुळे वस्तीवरील रहिवाशांची झोप उडते. परिसरात सध्या सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे डोंगरातून पाण्याबरोबर मोठ्या प्रमाणात मातीही वाहून येत असल्याने दगड मोकळे झाले आहेत. डोंगरात चरायला सोडलेल्या जनावरांचा धक्का लागून दगड खाली घसरत आहेत.

वस्तीवरील अनेक घरे दगड, मातीत बांधलेली असून, तेथील रस्त्यावर छोटी मुले सतत खेळत असतात. सध्या डोंगरात झाडांची संख्याही कमी झाल्याने निसटलेले दगड वेगाने खाली वस्तीत गडगडत येण्याची भीती आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाशी संपर्क साधल्यावर तुम्ही सुरक्षित ठिकाणी निघून जा, असे उत्तर मिळत असल्याचे अशोक बडेकर, हणमंत तडाखे, सतीश बडेकर, संजय बडेकर, अक्षय बडेकर आदींनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mountain Stone Slipdown Dangerous Badekarwasti