करवीर निवासिनी अंबाबाईच्या नव्या मूर्तीसाठी हालचाली

करवीर निवासिनी अंबाबाईच्या नव्या मूर्तीसाठी हालचाली

कोल्हापूर - करवीर निवासिनी श्री अंबाबाई मूर्तीच्या जागी आहे तशीच नवी मूर्ती बसवण्यासंदर्भात हालचालींना सुरुवात झाली आहे. सध्याची मूर्ती किमान हजार वर्षांपूर्वीची आहे. दोनदा या मूर्तीवर वज्रलेप व रासायनिक लेपप्रकिया झाली आहे. मूर्तीच्या एका भागास जोड दिला गेला आहे. त्यामुळे या मूर्तीऐवजी प्राणप्रतिष्ठा करून दुसरी जशीच्या तशी नवी मूर्ती असे या बदलाचे स्वरूप असणार आहे.

पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने यात गांभीर्याने लक्ष घातले आहे. पण मूर्ती बदलणे आवश्‍यक असले तरी मूर्ती बदलण्याचा निर्णय एकदम जाहीर केला तर लोकांच्या उलटसुलट प्रतिक्रिया उमटून गोंधळ होऊ नये म्हणून भक्‍तांची एक सर्वसमावेशक बैठक घेऊनच हा विषय हाताळू, अशी प्रतिक्रिया अध्यक्ष महेश जाधव यांनी व्यक्त केली आहे.

सध्याची मूर्ती बदलली पाहिजे हे माझे एक भक्त व अंबाबाई मंदिराचा हक्कदार म्हणून मत आहे. कारण आपल्या घरातील देवाची मूर्ती, टाक झिजला तरी त्या जागी आपण नवी मूर्ती विधिपूर्वक ठेवतो. अंबाबाईच्या सध्याच्या मूर्तीची झीज, मूर्तीची अवस्था सर्वांना माहीत आहे. त्यामुळे विधिपूर्वक मूर्ती नवीन बसवणे हा पर्याय आहे. हा विषय भाविकांच्या श्रद्धांशी निगडित असल्याने मी हा विषय भाविकांची बैठक बोलावूनच त्यांच्यासमोर मांडणार आहे. देवस्थान समिती परस्पर निर्णय घेणार नाही व घेतलेला नाही. भाविकांनी, मूर्तितज्ज्ञांनी, अभ्यासकांनी जरूर यावेळी मते मांडावीत.
- महेश जाधव, 

अध्यक्ष, पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समिती

दरम्यान नवीन मूर्तीबाबत काही भाविक आज (ता. १४) जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहेत. श्री अंबाबाई हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. देशभरातून देवीच्या दर्शनासाठी भाविक येतात. वर्षभरात येणाऱ्या भाविकांची संख्या १३-१४ लाखांवर जाते. या निमित्ताने कोल्हापुरातील आर्थिक उलाढालही होत राहते. किंबहुना कोल्हापूरचे धार्मिक महत्त्व अंबाबाईमुळे चर्चेत राहते.

मंदिरातील अंबाबाईची मूर्ती साधारण सातव्या ते नवव्या शतकातील आहे. मूर्तीवर सततच्या अभिषेकामुळे मूर्तीची झीज झाली आहे. मूर्तीवर दोन वेळा वज्रलेप व एकदा रासायनिक लेप प्रक्रिया झाली आहे. देवीशी असंख्य भाविकांच्या श्रद्धा जोडल्या असल्याने हा विषय नाजूक आहे. या पार्श्‍वभूमीवर सध्याच्या मूर्तीऐवजी नवी मूर्ती हा एक पर्याय आहे. त्यामुळे हालचाली सुरू आहेत. पण मूर्ती बदलण्याचा मुद्दा किती रुचतो याचा अंदाज नसल्याने या हालचाली सावध आहेत. नवी मूर्ती बनविण्याचीही तयारी झाली आहे. पण या विषयाला तोंड कसे फोडायचे हा देवस्थान समितीसमोरचा प्रश्‍न आहे.

भावनिक गुंतागुंत न करता हा विषय हाताळला जावा. एखादी जुनी मूर्ती बदलून विधीपूर्वक नवी मूर्ती बसवणे हे नवीन नाही. पण अंबाबाईच्या मंदिरासंदर्भात, मूर्तीसंदर्भात निर्णय घेताना तो सर्वांशी चर्चा करून घ्यावा, जेणेकरून त्याची अंमलबजावणी करणे शक्‍य होईल. 
- ॲड. प्रसन्न मालेकर,
मंदिर अभ्यासक 

अंबाबाई मूर्तीसाठी जो दगड वापरला आहे, त्या दगडाच्या निश्‍चित काही मर्यादा आहेत. वेळोवेळी मूर्तीचे संवर्धन केले गेले हे खरे आहे. पण आज राहू दे, पुढे १०० वर्षांनी काही तरी निर्णय घ्यावाच लागणार आहे. सध्याच्या मूर्तीवर चेहऱ्याचा भाग वगळून सुवर्ण कवच हा देखील मार्ग आहे. 
- योगेश प्रभुदेसाई,
मंदिर व मूर्ती अभ्यासक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com