करवीर निवासिनी श्री अंबाबाई मूर्तीचा मस्तकाभिषेक कधी?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

कोल्हापूर - करवीर निवासिनी श्री अंबाबाई मूर्तीचा मस्तकाभिषेक कधी? असा सवाल येथील सामाजिक कार्यकर्ते शरद तांबट यांनी निवेदनाद्वारे केला आहे. नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना करा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे आणि उपजिल्हाधिकारी गुरू बिराजदार यांना याबाबतचे निवेदन दिले.

कोल्हापूर - करवीर निवासिनी श्री अंबाबाई मूर्तीचा मस्तकाभिषेक कधी? असा सवाल येथील सामाजिक कार्यकर्ते शरद तांबट यांनी निवेदनाद्वारे केला आहे. नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना करा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे आणि उपजिल्हाधिकारी गुरू बिराजदार यांना याबाबतचे निवेदन दिले.

निवेदनात म्हटले आहे की, करवीर नगरीचे आराध्य दैवत कुलस्वामिनी श्री अंबाबाईच्या मूर्तीबाबत वेळोवेळी भाविकांना माहिती मिळत आहे.  मूर्तीची अवस्था अत्यंत नाजूक आहे. प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. १२ एप्रिलला राज्यपालांच्या सहीने कायदा होऊनही पारंपरिक पुजारीमुक्त मंदिर अद्याप झाले नाही. कायद्याची अंमलबजावणी नाही. शासनाच्या या अध्यादेशाला प्रशासन जुमानत नाही.

पुजारी हटाव आंदोलनामुळे मूळ मूर्तीचा प्रश्‍न प्रलंबितच आहे. याबाबत श्री अंबाबाई मूर्तीवर मस्तकाभिषेक पाहण्याचे भाग्य भाविकांना मिळणार काय?

- शरद तांबट

शंभर वर्षांत पाच ठिकाणी भंगलेल्या मूर्तीची छायाचित्रे उपलब्ध आहेत. २०१६ मध्ये मूर्तीचे संवर्धन केले; पण तरीही मूर्तीची झीज मोठ्या प्रमाणात झालेली आहे. मूर्ती संवर्धन प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रण प्रशासनाकडे आहे. त्यावेळी हे चित्रण म्हणजे जिवंत बॉम्बच असल्याची प्रतिक्रिया तत्कालीन जिल्हाधिकारी अमित सैनी यांनी दिली होती. हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे मंदिरातील गाभाऱ्याच्या मूळ मूर्तीची नित्यपूजा म्हणजे अभिषेक, स्नान, आरती, मंत्रपठण आदी झालेच पाहिजे. श्री. अंबाबाईचे स्थान जागृत आहे. ते कायम ठेवण्यासाठी या प्रक्रिया आवश्‍यकच आहेत. 

नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना करणे भाविकांच्या दृष्टीने आवश्‍यकच आहे. जुनी मूर्ती गाभाऱ्यातच मागील बाजूस आहे तशी ठेवावी. नवी मूर्ती मस्तकाभिषेक, पूजा नित्यनियमाने केल्यास करोडो रुपयांचे उत्पन्न शासनाला मिळणार आहे. त्यामुळे नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना करावी, अशी आग्रही मागणी आहे. हे निवेदन शरद तांबट, महादेव पाटील, राजू सावंत, दिलीप राऊत, राजवर्धन यादव यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

तातडीने निर्णय नाही : महेश जाधव
श्री अंबाबाईची जुनी मूर्ती बदलून नवीन मूर्तीची विधिपूर्वक प्रतिष्ठापना करा, अशा सूचना देवस्थान समितीला असंख्य भाविक करतात; पण समिती यावर तातडीने निर्णय घेऊ शकत नाही. या मुद्यावर भाविक, मंदिर अभ्यासक, मूर्ती अभ्यासक यांच्याशी चर्चा केली जाईल. त्यानंतर समितीच्या बैठकीत योग्य तो निर्णय होईल, असे पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

ते म्हणाले, ‘‘केवळ मूर्तीबद्दल नव्हे तर मंदिराच्या भिंतीवरील योगिनीची प्राचीन शिल्पेही भंग पावलेली आहेत. काही ठिकाणी मंदिराच्या शिळा उखडल्या आहेत. भाविकांसाठी देवस्थान समितीची धर्मशाळा, अन्नछत्र, आरोग्य सुविधा हे देखील महत्त्वाचे प्रश्‍न आहेत. त्या संदर्भातही भाविकांच्या विविध सूचना आहेत. कार्यवाहीत काही अडचणी आहेत; पण सर्वांशी पारदर्शक चर्चा करून हे प्रश्‍न मार्गी लावण्याचा देवस्थान समितीचा प्रयत्न राहील.’’

ते म्हणाले, ‘‘देवस्थान समितीची स्वतंत्र धर्मशाळा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मंदिराच्या जवळपासच जागेची पाहणी व खरेदीची चर्चा सुरू आहे. न्याय व विधी विभागाशी या संदर्भात संपर्कात आहे. ती जागा मिळाली की पार्किंग, अन्नछत्र व भक्त निवास आदी सुविधा होतील.’’

मणकर्णिका कुंडाच्या जागेचाही वापर शक्‍य 
घाटी दरवाजाजवळ मणकर्णिका कुंडाची जागा देवस्थान समितीची आहे. समितीने ही जागा महापालिकेला दिली होती. आता ही जागा आम्ही महापालिकेकडून परत मागितली आहे. ही जागा ताब्यात आल्यावर त्याचाही भाविकांच्या सोयीसाठी वापर करता येईल.

संबंधीत बातम्या

करवीर निवासिनी अंबाबाईच्या नव्या मूर्तीसाठी हालचाली 

Web Title: Movement For Karveer Nivasini Ambabai New Idol