Vidhan Sabha 2019 :..तर शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आलीच नसती : डॉ. कोल्हे

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 16 October 2019

राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीच्या प्रश्नावर जबाबदारीने उत्तर देणे आवश्यक होते. जर त्या शेतकरी बांधवाला जबाबदारीने उत्तर दिले असते तर शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आलीच नसती.

-  डॉ. अमोल कोल्हे

फलटण शहर : राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीच्या प्रश्नावर जबाबदारीने उत्तर देणे आवश्यक होते. जर त्या शेतकरी बांधवाला जबाबदारीने उत्तर दिले असते तर शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आलीच नसती, अशा शब्दांत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर टीका केली.

फलटण विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार दीपक चव्हाण यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, बाजार समितीचे चेअरमन रघुनाथराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषद सदस्या शिवांजलीराजे नाईक निंबाळकर, शिवरुपराजे खर्डेकर, पंचायत समितीच्या सभापती प्रतिभाताई धुमाळ, अनिकेतराजे नाईक निंबाळकर, पंचायत समिती सदस्य विश्वजीतराजे नाईक निंबाळकर, ज्येष्ठ नेते डॉ. विजयराव बोरावके, दिलीपसिंह भोसले, महानंदाचे उपाध्यक्ष डि. के. पवार, सुभद्राराजे नाईक निंबाळकर, नगराध्यक्षा नीता नेवसे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

गेल्या पाच वर्षांत महायुतीच्या सरकारने जनतेला अनेक आश्वासने दिली. सर्वत्र जाहिरातींचे फलक लावले 'सर्वोत्तम कामगिरी, महाराष्ट्र मानकरी' परंतु या जाहिरातींचा जेव्हा आपण प्रामाणिकपणे विचार करतो, तेव्हा गेल्या पाच वर्षांत 16 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. माताभगिनींच कुंकू पुसल गेलं, लेकरं अनाथ झाली, जर याला भारतीय जनता पक्ष याला सर्वोत्तम कामगिरी म्हणत असेल तर त्यांना सांगावं लागेल महाराष्ट्र मानकरी नाही तुम्ही महाराष्ट्राचे मारेकरी आहात.

तसेच ते पुढे म्हणाले, कर्जमाफीविषयी शेतकऱ्याने प्रश्न विचारल्यानंतर मुख्यमंत्री 'भारत माता की जय' अस म्हणून ते बोलले असे एक दोन नमुने येत असतात. एवढीच आठवण ठेवून आता शेतकरी व त्यांच्या पोरांनी येत्या 21 तारखेला मतदान करावे. राज्याच्या प्रमुखांना प्रश्न विचारणाऱ्या शेतकऱ्यांची थट्टा केली. परंतु शेतकऱ्यांच्या परिस्थितीचे भान मुखमंत्र्यांनी ठेवायला हवे होते. राज्याचे प्रमुख म्हणून त्यांनी जबाबदारीने उत्तर देणे आवश्यक होते. जर त्या शेतकरी बांधवाला जबाबदारीने उत्तर दिले असते तर शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आलीच नसती, असेही ते यावेळी म्हणाले.

सभेत प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती राजमाता सईबाई महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सभेस सर्व जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, नगरसेवीका, विविध ग्रामपंचायतींचे सरपंच, सदस्य पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला मोठ्या संखेने उपस्थित होत्या.

ही लढाई दोन विचारांची

विधानसभा निवडणूक ही यावेळी महाआघाडी व महायुतीमधील राहिली नाही तर ही दोन विचारांची लढाई झाली आहे. ही निवडणूक महाराष्ट्राच्या भविष्य, भवितव्याची असून, फुले शाहू आंबेडकरांचा विचार महाराष्ट्रात रुजविण्याची व पुन्हा गाजविण्याची ही लढाई झाली आहे. 

...सरकारवर ठेवलेल्या विश्वासाची हत्या

राज्यात झालेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या या आत्महत्या नव्हत्या तर शेतकऱ्यांनी सरकारवर ठेवलेल्या विश्वासाची हत्या होती, असेही डॉ. कोल्हे म्हणाले. 

...म्हणून फलटणला आलोय

ज्या माउलींनं सह्याद्रीच्या छाव्याला जन्म दिला. त्या मातीला नतमस्तक होण्यासाठी आपण फलटणला आलोय. या मातीत येणं हे मी माझ भाग्य समजतो.

चव्हाण हेच निवडून येतील

फलटण विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार दीपक चव्हाण हेच निवडून येणार ही काळ्या दगडावरची रेष आहे. 

...तर राजकीय संन्यास घेऊ : संजीवराजे 

आमदार दीपक चव्हाण हे गेली दहा वर्षे आमदार आहेत. त्यांनी पक्षाशी व नेतृत्वावर कायम निष्ठा ठेवली आहे. जमिनीवर पाय ठेवून जनतेची विकासात्मक कामे केली आहेत. त्यांच्या कारकिर्दीवर कोणताही भ्रष्टाचाराचा डाग नाही, हे त्यांचे वैशिष्ट्ये आहे. जर त्यांनी भ्रष्टाचार केल्याचे सिध्द झाले तर आपण राजकीय संन्यास घेऊ असे संजीवराजे यांनी यावेळी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Amol Kolhe Criticizes Fadnavis Government Maharashtra Vidhan Sabha 2019