खासदारकीचा निर्णय केवळ आमदारांच्या मतावर? 

खासदारकीचा निर्णय केवळ आमदारांच्या मतावर? 

सातारा - साताऱ्याच्या खासदारकीचे करायचे काय, असा प्रश्‍न राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजेंना केल्याच्या काही चर्चा कालपासून पसरवल्या जात आहेत. त्याचा खुद्द शिवेंद्रसिंहराजेंनी इन्कार केला आहे. राष्ट्रवादीच्या आमदारांनी बंड करूनही पक्षाध्यक्ष शरद पवार हे खासदार उदयनराजेंच्या वाढदिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते. त्यामुळे उदयनराजेंच्या खासदारकीचा निर्णय केवळ आमदारांच्या मतावर ठरणार का, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. 

आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी काल दिल्लीमध्ये पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर साताऱ्यात वेगवेगळ्या चर्चांना ऊत आला आहे. साताऱ्याच्या खासदारकीच्या उमेदवाराचे करायचे काय, असा प्रश्‍न श्री. पवार यांनी शिवेंद्रसिंहराजेंसमोर उपस्थित केल्याची महत्त्वाची चर्चा यात होती. मात्र, स्वत: आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी अशी कोणत्याही प्रकारची चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. 

वास्तविक सर्व आमदारांसह राष्ट्रवादीची संपूर्ण फळी उदयनराजेंच्या वाढदिवसावेळी बंड करून उभी राहिली होती. खुद्द पवार यांना कार्यक्रमाला जाऊ नका, अशी विनंती सर्वांनी केली होती, तरीही शरद पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेच. त्यानंतर दिवाळीच्या पाडव्याला शुभेच्छा देण्याचे निमित्त काढून साताऱ्यातील सर्व आमदार बारामतीला शरद पवारांच्या भेटीला गेले होते. या सर्व प्रयत्नांनंतरही उदयनराजेंच्या उमेदवारीबाबत शरद पवारांकडून कोणतेही सूचक वक्तव्य आले नाही. उलट साताऱ्याच्या दौऱ्यात येताना ते स्वत: उदयनराजेंना आपल्या गाडीतून घेऊन आले. त्यांची कृती सर्वच आमदारांना सूचक इशारा होती. त्यामुळे केवळ आमदारांच्या मतावर शरद पवार साताऱ्याच्या उमेदवारीबाबत निर्णय घेतील हे म्हणणे हास्यास्पद ठरेल. 

उदयनराजेंच्या विशिष्ट कार्यपद्धतीची जाणीव राष्ट्रवादीच्या आमदारांना व श्री. पवार यांनाही चांगलीच माहीत आहे. दोन मातब्बर नेत्यांमुळे इतरांना उदयनराजेंविरोधाच्या रांगेत उभे राहावे लागत असल्यासारखी परिस्थिती होती. साताऱ्यातील सातारा, कोरेगाव, कऱ्हाड उत्तर व वाई मतदार संघांमध्ये उदयनराजेंचा हस्तक्षेप, त्यांचा विरोध राष्ट्रवादीच्या प्रस्थापितांना संघर्ष करायला लावणारा ठरू शकतो. पक्षाच्या बालेकिल्ल्याला खिंडार पडत असल्याची किमान परिस्थिती केवळ उदयनराजेच जिल्ह्यात निर्माण करू शकतात. त्याचबरोबर राज्यातही ठिकठिकाणी त्यांच्या चाहत्यांचा वर्ग आहे. लगतच्या लोकसभा मतदार संघामध्येही ते प्रभाव पाडू शकतात. याची जाणीव पक्षाध्यक्षांना आहे. त्यामुळे उदयनराजेंनी आजवर पक्षविरोधी कितीही कारवाया केल्या, तरी त्यांना अभय देण्यात आले आहे. जिल्ह्यामध्ये पक्षाचा समतोल साधण्यातही याचा उपयोग होत आहे. साताऱ्याचा उमेदवार शरद पवारांनी कधीच ठरवून टाकला. तो जाहीर करण्याची औपचारिकता फक्त बाकी आहे, असेही राजकीय गोटातून ठामपणे सांगितले जात आहे. याशिवाय सर्व आमदारही शरद पवार देतील तोच उमेदवार मान्य करणार, असेही सांगितले जात आहे. 

""शुगर डेव्हलमेंट बोर्डामध्ये असलेल्या कामासाठी काल मी दिल्लीला गेला होतो. त्या वेळी पक्षाध्यक्ष शरद पवार व त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. या वेळी सातारा लोकसभेच्या उमेदवाराबाबत कोणतीही चर्चा झाली नाही.'' 
शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com