पक्षाध्यक्ष शरद पवारच माझे परमेश्‍वर

पक्षाध्यक्ष शरद पवारच माझे परमेश्‍वर

नेसरी - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार ही छोटी व्यक्‍ती नसून, तेच माझे परमेश्‍वर आहेत, असे उद्‌गार खासदार धनंजय महाडिक यांनी कानडेवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात काढले. आमदार संध्यादेवी कुपेकर अध्यक्षस्थानी होत्या.

श्री. महाडिक म्हणाले, ‘‘गेल्या लोकसभा निवडणुकीत माझ्यासारख्या तरुणाला उमेदवारी देऊन काम करण्याची संधी पवार यांनी दिली. त्यांच्या मार्गदर्शनाने व खासदार सुप्रिया सुळे यांच्या साथीने संसदेत एक हजार १५५ प्रश्‍न विचारले. आज देशातील कोणताही घटक समाधानी नाही. पाच वर्षांत बाहेर न पडणारे विरोधक निवडणुका जवळ आल्यानंतर मतदारसंघात फिरत आहेत. निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी लोकांत मिसळून काम करणे आवश्‍यक असते.’’

आमदार कुपेकर म्हणाल्या, ‘‘सव्वाशे कोटी जनता हुकूमशाहीच्या छायेखाली नांदत आहे. भाजप सरकारने पाच वर्षांत केवळ प्रलोभने दाखवली. त्यांची पूर्तता मात्र केली नाही. सर्वच घटकांत सरकारबद्दल नाराजी आहे. (कै.) बाबासाहेब कुपेकरांच्या बांधणीतून चंदगड मतदारसंघात राष्ट्रवादीची फळी भक्‍कम आहे.’’

डॉ. नंदिनी बाभूळकर म्हणाल्या, ‘‘कार्यकर्त्यांनी आपापसांतील मतभेद विसरून आगामी लोकसभा निवडणुकीच्या कामाला लागावे. खासदार महाडिकांचा विजय पवारसाहेबांसाठी फार महत्त्वाचा आहे. त्यांच्या पाठीशी ‘चंदगड’मधील राष्ट्रवादी खंबीरपणे उभी राहील.’’ 

बी. एन. पाटील-मुगळीकर यांनी स्वागत केले. ‘गोकुळ’चे संचालक रामराजे कुपेकर, गणेश फाटक, अशोक पाटील, दीपकराव जाधव, जयकुमार मुनोळी, सभापती रचना होलम, संतोष पाटील, दत्तात्रय विंझणेकर, रामाप्पा करीगार, जब्बार मुल्ला यांची भाषणे झाली. जयसिंग चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. जितेंद्र शिंदे यांनी आभार मानले. या वेळी गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्‍यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

बाभूळकर... भावी आमदार 
दरम्यान, या मेळाव्यात अनेक कार्यकर्त्यांनी डॉ. नंदिनी बाभूळकरांचा भावी आमदार असा उल्लेख करून डॉ. बाभूळकरांची उमेदवारी चंदगड विधानसभा मतदारसंघातून जाहीर करावी, अशी मागणी केली. त्यावर, पक्षाचे अध्यक्ष पवारसाहेबच उमेदवारी जाहीर करतील, असे डॉ. बाभूळकर यांनी आपल्या भाषणातून सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com