सतेज पाटील स्वत:ला राहुलजींपेक्षा मोठे समजतात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 एप्रिल 2019

कोल्हापूर - काँग्रेसकडून निरोप येऊनही आमदार सतेज पाटील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारासोबत राहत नसतील तर ते स्वत:ला राहुल गांधींपेक्षा मोठे समजत असतील. आमदार पाटील यांचा आघाडीच्या उमेदवाराला विरोध म्हणजे राहुल गांधी आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनाच विरोध करत असल्याची टीका खासदार धनंजय महाडिक यांनी केली.

कोल्हापूर - काँग्रेसकडून निरोप येऊनही आमदार सतेज पाटील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारासोबत राहत नसतील तर ते स्वत:ला राहुल गांधींपेक्षा मोठे समजत असतील. आमदार पाटील यांचा आघाडीच्या उमेदवाराला विरोध म्हणजे राहुल गांधी आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनाच विरोध करत असल्याची टीका खासदार धनंजय महाडिक यांनी केली.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून आज राष्ट्रवादीचे उमेदवार खासदार धनंजय महाडिक यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. खासदार शेट्टी, आमदार हसन मुश्रीफ, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे, माजी आमदार पी. एन. पाटील यांच्या उपस्थितीत अर्ज भरला. आमदार सतेज पाटील यांना काल (रविवारी) राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी निमंत्रण देऊनही ते आज आले नाहीत. यावर महाडिक यांनी पाटील यांच्या हालचालीबाबत शंका व्यक्त केली.

खासदार महाडिक म्हणाले, ‘‘आघाडी धर्म म्हणून आम्ही आमदार सतेज पाटील यांना निवडणूक अर्ज भरण्यासाठी काल (रविवारी) निमंत्रण दिले होते. मात्र, त्यांनी अर्ज भरायला येण्यास नकार दिला. यावरून आमदार सतेज पाटील हे धनंजय महाडिक म्हणून आपल्याला नाही तर ते राहुल गांधी आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनाच विरोध करत असल्याचे चित्र आहे. काँग्रेसने त्यांना निरोप देऊन ते सेनेच्या व्यासपीठावर जाऊन बसतात. त्यामुळे आमदार सतेज पाटील हे स्वत:ला राहुल गांधींपेक्षाही मोठे समजत असतील तर ते कितपत काँग्रेसला रुचेल.’’

खासदार महाडिक म्हणाले, ‘‘सध्या एक एक खासदार महत्त्वाचा आहे. अटल बिहारी वाजपेयी असताना एक मताने सरकार पडले आहे. अशा वेळेला आमदार पाटील यांनी आघाडीसोबत ही निवडणूक गांभीर्याने घेतली पाहिजे होती. त्यांनी आपल्याला मदत नाही केली तरी ठीक आहे; पण किमान विरोधी सेनेला मदत करू नये.’’

काँग्रेसने त्यांना निरोप देऊन ते सेनेच्या व्यासपीठावर जाऊन बसतात. त्यामुळे आमदार सतेज पाटील हे स्वत:ला राहुल गांधींपेक्षाही मोठे समजत असतील तर ते काँग्रेसला कितपत रुचेल?
- धनंजय महाडिक,
खासदार

Web Title: MP Dhananjay Mahadik comment