खासदार महाडिकांना आता आठवला पक्ष! 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 जानेवारी 2017

नोटांबदीनंतर झालेला बदल 
मोदी यांनी 8 नोव्हेंबर रोजी नोटबंदी जाहीर केली आणि तेव्हापासून देशात जे वेगळ्या प्रकारचे वातावरण दिसू लागले, त्यातून सरकारविरोधातील रोष प्रकट होऊ लागला. आणखी काही दिवस हेच चित्र राहणार, मग लोकसभेत पुन्हा याच मुद्यावर मोदी सरकार अडचणीत येण्याची शक्‍यता दिसू लागली. नेमका हा धोका ओळखूनच श्री. महाडीक यांनी मात्र स्वतःला सावरत पुन्हा पक्षाची कास धरल्याचे बोलले जाते. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पक्षाच्यावतीने तालुका पातळीवर होणाऱ्या मेळाव्यात त्यांची छबी झळकू लागली आहे. या खासदार महोदयात असा अचानक कसा बदल झाला याची मात्र चर्चा पक्षातील नेते व कार्यकर्त्यात होऊ लागली.  

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर पक्षापासूनच फारकत घेतलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार धनंजय महाडिक हे अलीकडे पक्षाच्या व्यासपीठावर दिसू लागले आहेत. त्यांचा पक्षातील वाढता संपर्क पाहून कार्यकर्तेही आता साहेबांना पक्ष दिसू लागला, असे म्हणू लागले आहेत. 

लोकसभा निवडणुकीत अनेकांचा विरोध डावलून जिल्ह्याचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी श्री. महाडिक यांना राष्ट्रवादीची उमेदवारी दिली. उमेदवारी दिली पण त्यांना विजयापर्यंत पोचवण्यात अडचण होती ती सतेज पाटील व महाडिक यांच्यातील वादाची. हा वादही निवडणुकीपुरता का असेना मिटविण्यात श्री. मुश्रीफ यांना यश आले. महाडिक-सतेज यांचे मतभेद यानिमित्ताने मिटले; पण मनभेद कायम राहिले, हे त्यानंतर लगेच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत पाहायला मिळाले. 
लोकसभेत एकीकडे नरेंद्र मोदींचे वादळ घोंघावत असताना केवळ जिद्दीच्या आणि दोन्ही कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या जोरावर श्री. महाडिक यांनी जिल्ह्यात हे वादळ परतवून लावले. लोकसभेत विजयश्री मिळवली, पण त्यानंतर झालेल्या विधानसभा असो किंवा महापालिकेच्या निवडणुका, यात मात्र श्री. महाडीक पक्षापासून फटकूनच राहू लागले. विधानसभेत ज्या सतेज पाटील यांनी त्यांना प्रामाणिक मदत केली, त्यांच्याच विरोधात स्वतःच्या चुलतभावाला भाजपच्या तिकिटावर उभे करून आपली रसद त्यांच्या मागे लावायलाही ते मागे राहिले नाहीत. त्यातून सतेज यांचा पराभव झाला. महापालिकेच्या निवडणुकीतही ते ताराराणी-भाजप उमेदवारांच्या मागे राहिले. त्यातून जे व्हायचे झाले. महापालिकेतही राष्ट्रवादी "बॅकफुट' वर गेली. 

विधानसभा, महापालिका निवडणुकीनंतर त्यांची उठबस ही पक्षाचे व्यासपीठ किंवा नेत्यांपेक्षा भाजपच्या नेत्यांसोबतच राहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशीही त्यांची जवळीक वाढली. पुढच्या लोकसभेत ते भाजपचेच उमेदवार असतील असेच चित्र दिसू लागले. देशात "टॉप'च्या खासदारांत गणना होऊनही राष्ट्रवादीने साधा गुच्छही दिला नाही. हा राग होताच पण देशात मोदींचेच राज्य चालणार याची जाणीव झाल्याने ते राष्ट्रवादीपेक्षा जिल्ह्याच्या पातळीवर विरोधकांशीच त्यांचा संपर्क वाढला. 

Web Title: mp dhananjay mahadik remembers ncp after a long time