खासदारांनी आधी स्वतःचे परमिट रुम बंद करावे - संभाजी पवार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 एप्रिल 2017

सांगली - दारू दुकानांना वैयक्तिक विरोध असल्याचे सांगणाऱ्या खासदार संजय पाटील यांनी आधी स्वतःचे झुलेलाल चौकातलेच परमिट रुम बारचे लायसन रद्द करावे. त्यांच्यामुळेच जिल्ह्यात मटका बिनबोभाट सुरू आहे, असा हल्लाबोल माजी आमदार संभाजी पवार यांनी आज पत्रकार परिषदेत केला. पोलिसच मुद्देमालावर दरोडे टाकत असून, जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेचे पुरते बारा वाजले आहेत. त्याला सत्ताधारी भाजपचे खासदार-आमदारच कारणीभूत आहेत, असा आरोपही त्यांनी या वेळी केला.

श्री. पवार म्हणाले, 'खासदार पाटील भाजपची अब्रू देशोधडीला लावतील हे मी पक्ष सोडण्याआधी जाहीरपणे सांगितले होते. त्यामुळेच त्यांच्या भाजप प्रवेशाला मी विरोध केला होता. पोलिस अधीक्षक दिलीप सावंत यांची बदली होताच गावागावात खुलेआम मटका सुरू झाला आहे. आज तेच खासदार दारू दुकाने सुरू करा म्हणून आयुक्तांकडे जातात.

महासभेत ठराव करा, असा सल्ला देतात आणि अंगलट येतेय म्हटल्यावर ही भूमिका राज्य सरकारची असून, मी दारू दुकानांच्या विरोधातच आहे, असा साळसुदपणाचा आव आणतात. जे परमिट रुम चालवतात त्यांचा दारू दुकानांचा वैयक्तिक विरोध आहे हे कसे पटणार? त्यासाठी त्यांनी आपल्या हॉटेलमधील परमिट रुमचे लायसेन रद्द करावे. दारू दुकानांसाठी राज्य मार्गांचे महापालिकेकडे हस्तांतरण कदापि खपवून घेतले जाणार नाही. या मागणीचे समर्थन करणाऱ्यांच्या घरावर महिलांचे चप्पल मोर्चे काढले जातील. मग ते कोणीही असोत. ''

श्री. पवार म्हणाले, 'जिल्ह्यातील गुन्हेगारी मोकाट झाली आहे. गुंडाचे मुडदे गुंडच पाडत आहेत. पोलिस चोरीतील मुद्देमालावर दरोडे टाकत आहेत. भाजपच्या सत्तेचे लाभार्थी सामान्य शेतकरी नव्हे, तर गुंड पुंड आणि दारू दुकानदारच झाले आहेत. या गोष्टीचा मला पुरता अंदाज आल्यानेच मी गुंड प्रवृत्तीला भाजप प्रवेशापासून रोखावे, अशी मागणी केली होती. आज भाजपचा मूळ राजकीय विचार पुरता हद्दपार झाला आहे. त्याची प्रचिती येत आहे.''

धमक्‍या का देता?
दारू दुकानांना माझा वैयक्तिक विरोध असून, माझ्या बदनामीचे कारस्थान रचले आहे. लक्षात ठेवा, माझ्या शेपटावर पाय ठेवला आहात असा इशारा खासदार संजय पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला होता. त्याचा संदर्भ देत श्री. पवार म्हणाले, ""खासदार ही धमकी कोणाला देत आहेत?.. जे काही सांगायचे आहे ते सभ्य भाषेत सांगा. दारू दुकानांविरोधात कोणी बोलू नये यासाठी ते त्यांच्याच पक्षातील लोकांना हा इशारा देत आहेत. त्यांच्या दहशतवादामुळे पक्षातील भाजपमधील कार्यकर्ता बोलायला तयार नाही.''

Web Title: mp first close our permit room