शेतकऱ्यांच्या रोषापुढे खासदार नामोहरम

MP Namoharam before farmers' anger
MP Namoharam before farmers' anger

राहुरी : परतीच्या पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, शेतकरी हवालदिल झाले आहेत. अशा स्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकारने खंबीरपणे उभे राहण्याची आवश्‍यकता असताना, राज्यात सत्तेसाठी कुरघोड्या सुरू आहेत. त्यामुळे शेतकरी नाराज आहेत. त्यांचा संयम संपत आला आहे. त्यांच्या रोषाचा अनुभव आता लोकप्रतिनिधींना येऊ लागला आहे.

टाकळीमियॉं (ता. राहुरी) येथे पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. शेतकऱ्यांनी खासदार लोखंडे यांच्यावर प्रश्‍नांचा भडिमार केला. 2016 मध्ये शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्या वेळी शेतकऱ्यांना पीकविम्याची रक्कम मिळाली नाही. सरकारने संबंधित विमा कंपनीवर कोणती कारवाई केली, असा प्रश्‍न शेतकऱ्यांनी उपस्थित केला. यावर खासदार लोखंडे निरुत्तर झाले.

टाकळीमियॉं ग्रामपंचायतीमध्ये आज (बुधवारी) सकाळी दहा वाजता शेतकऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीस सरपंच विष्णू निकम, बाबूराव तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष श्‍यामराव निमसे, केशव शिंदे, ज्ञानदेव निमसे, साहेबराव निमसे, तहसीलदार फसियोद्दीन शेख, तालुका कृषी अधिकारी महेंद्र ठोकळे, मंडलाधिकारी, तलाठी आदी उपस्थित होते.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष (उत्तर) रवींद्र मोरे यांनी खासदार सदाशिव लोखंडे यांच्यावर प्रश्‍नांचा भडिमार केला.
मोरे म्हणाले, ""राहुरी तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी सन 2016 मध्ये मोठ्या संख्येने पीकविमा भरला होता. तेव्हा बाजरी वगळता कोणत्याही नुकसानग्रस्त पिकाची विम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळाली नाही. विमा कंपनीने शेतकऱ्यांची फसवणूक केली. संबंधित कंपनीवर केंद्र सरकारने कोणती कारवाई केली, याची माहिती द्या. महाराष्ट्र व कर्नाटकात यंदा एकाच वेळी अवकाळी पावसाचे संकट ओढवले आहे.

कर्नाटकच्या राज्यपालांनी शेतकऱ्यांना मदतीची घोषणा केली. तेथील शेतकऱ्यांना मदत मिळते, मग महाराष्ट्रातील शेतकऱ्यांविषयी दुजाभाव कशासाठी आहे? नुकसान झालेल्या पिकांचा पंचनामा करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे. त्यामुळे बांधावर जाऊन पंचनामे केल्यास महिनाभर पंचनाम्याची प्रक्रिया चालेल. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कधी मिळणार?''

कशीबशी सारवासारव

खासदार सदाशिव लोखंडे म्हणाले, ""महाराष्ट्राचे सरकार स्थापन झालेले नाही. नुकसानभरपाई लवकरच मिळेल.''
त्यांच्या या उत्तराने शेतकऱ्यांचे समाधान झाले नाही. त्यांनी अनेक प्रश्‍न विचारले. त्यावर कशीबशी सारवासारव करून, ""अधिकाऱ्यांनी पंचनामे जलद करावेत. नुकसानग्रस्त एकही शेतकरी नुकसानभरपाई पासून वंचित राहू नये याची काळजी घ्यावी. बांधावर जाऊन पंचनामे करावेत,'' असे आदेश लोखंडे यांनी दिले.

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com