Loksabha 2019 : हिटलरशाहीच्या पराभवासाठीच विशाल पाटील यांना उमेदवारी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 एप्रिल 2019

" गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी भाजपच्या कळपात शिरलो ही मोठी घोडचुक झाली. शेतकऱ्यांच्या "अच्छे दिनासाठी' भाजपमध्ये गेलो. प्रत्यक्षात "लुच्चे दिन' आले. आम्ही हाडाचे शेतकरी आहोत. शेतकऱ्यांला कधी काय करायचे याचे चांगले ज्ञान आहे. कमळावर तणनाशक फवारून त्याला हद्दपार करु. "

सांगली - स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्या पुतळ्याची साक्ष देवून सांगतो की सध्याची गर्दी पाहता सांगलीचा खासदार विशाल पाटीलच असणार आहे. आज माझ्यावर लोक टीका करताहेत. हिटरलशाहीच्या पराभवासाठी मी हा निर्णय घेतला आहे, असे प्रतिपादन स्वाभिमानीचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी केले. 

सांगली लोकसभेचे स्वाभिमानीचे उमेदवार विशाल पाटील यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी प्रचाराच्या प्रारंभी ते बोलत होते.

गेल्या अडीच वर्षात भाजपला शिट्टीने आवळायचा प्रयत्न केला. आता बॅंटने आवळण्याचा प्रयत्न आहे. यापुढे तीच बॅट टाळक्‍यात घालायचीही तयारी आहे, असा इशाराही यावेळी खासदार शेट्टी यांनी दिला. 

" गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी भाजपच्या कळपात शिरलो ही मोठी घोडचुक झाली. शेतकऱ्यांच्या "अच्छे दिनासाठी' भाजपमध्ये गेलो. प्रत्यक्षात "लुच्चे दिन' आले. आम्ही हाडाचे शेतकरी आहोत. शेतकऱ्यांला कधी काय करायचे याचे चांगले ज्ञान आहे. कमळावर तणनाशक फवारून त्याला हद्दपार करु. शिट्टी चिन्हावर आवळले नाहीत म्हणून बॅटने त्यांना आवळणार आहे. क्रांतिकारकांच्या जिल्ह्यातच असल्याने वेळप्रसंगी हीच बॅंट डोक्‍यात घालण्याचीही तयारी आहे. '' 

- राजू शेट्टी, खासदार

कारखानदारांच्या मांडीला मांडी लावून बसतोय यावर टीका होत असल्याचे सांगून खासदार शेट्टी म्हणाले,"" सगळ संपण्यापेक्षा मांडीला मांडी लावून बसणे कधीही बरे. मंदिरांतील मारुतीच्या बेबींत बोट घातल्यानंतर विंचू चावला तरी सगळे गार वाटतया, असे म्हणत आहेत. मी एकट्यानेच विंचू चावला म्हटल्याने बघून घेण्याच्या धमक्‍या सुरु आहेत. तुम्ही बघुन घ्यायला काय सुद्दाम हुसेनची औलाद आहे काय असा प्रश्‍न विचारला.

लोकशाही जीवंत राहिली तरच आंदोलने होतील म्हणून आम्ही आघाडीसोबत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या जमिनी अधिगृहण करुन उद्योजकांच्या खिशात घालण्याच्या धोरणाला विरोध म्हणून त्यांच्यातून बाहेर पडलो. आणि तेथूनच संघर्ष सुरु झाला.

- राजू शेट्टी, खासदार 

राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील, आमदार सुमन पाटील, आमदार विश्‍वजित कदम, अरुण अण्णा लाड, माजी आमदार सदाशिव पाटील यावेळी उपस्थित होते. 

Web Title: MP Raju Shetti comment