‘स्वाभिमानी’चा दोन्ही काँग्रेसला गुरुवारपर्यंतचा ‘अल्टिमेटम’

गणेश शिंदे
मंगळवार, 26 फेब्रुवारी 2019

"वर्ध्यातून सुबोध मोहिते, तर बुलढाण्यातून रविकांत तुपकर यांना उमेदवारी दिली जाणार आहे. हातकणंगले, बुलढाणा आणि वर्धा स्वाभिमानीचे हक्काचे मतदारसंघ आहेत. कार्यकर्त्यांना संधी मिळावी, यासाठीच ही आग्रही भूमिका आहे. गुरुवार (ता. २८) पूर्वी निर्णय झाला नाही तर मात्र आम्हाला विचार करावा लागेल"

जयसिंगपूर - हातकणंगलेसह बुलढाणा आणि वर्धा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने भक्कमपणे पक्ष बांधणी केली आहे. बुलढाणा आणि वर्धा मतदारसंघावर ‘स्वाभिमानी’चा प्रभाव असल्याने तीन मतदारसंघ मिळावेत, अशी आमची भूमिका आहे. याला प्रतिसाद मिळाला नाही तर आमचा मार्ग मोकळा आहे. त्यानंतर सुमारे २० मतदारसंघांत स्वाभिमानीची भूमिका निर्णायक ठरणार असल्याने दोन्ही काँग्रेसने २८ फेब्रुवारीपर्यंत निर्णय घ्यावा, असा अल्टिमेटम दिल्याची माहिती खासदार राजू शेट्टी यांनी आज ‘सकाळ’शी बोलताना दिली.

ते म्हणाले, ‘‘हातकणंगलेसह बुलढाणा आणि वर्धा येथे स्वाभिमानीची पकड लक्षात घेऊन काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडे जागांची मागणी केली आहे. सध्या चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहे. स्वाभिमानीमुळे आघाडीच्या उमेदवारांच्या मताधिक्‍क्‍यात वाढ होणार आहे. मात्र, निर्णय घेण्यास विलंब होणे अपेक्षित नाही. पुण्यात २८ रोजी पक्ष कार्यकारिणीची बैठक आहे. त्याआधी निर्णय घ्यावा; अन्यथा आमचा मार्ग आम्हाला मोकळा करून द्यावा.’’

ते म्हणाले, ‘‘यावेळी लोकसभा निवडणूक शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर लढविली जाणार आहे. स्वाभिमानीने विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर सातत्याने आवाज उठविला आहे. दुष्काळ निवारणासाठीची आंदोलने, सोयाबीन परिषद, कापूस उत्पादकांना न्याय देण्यासाठीही सातत्याने आंदोलने केली आहेत. राज्यातील जवळपास निम्मा भाग ऊसपट्टा आहे. या पट्ट्यात स्वाभिमानीची पकड आहे. त्यामुळे स्वाभिमानीशी आघाडी केल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीलाही याचा लाभ होणार आहे. शेतकरी प्रश्‍नावर भविष्यात चांगले काम करता यावे, यासाठी आम्ही हात पुढे केला आहे.’’

वर्ध्यातून सुबोध मोहिते, तर बुलढाण्यातून रविकांत तुपकर यांना उमेदवारी दिली जाणार आहे. हातकणंगले, बुलढाणा आणि वर्धा स्वाभिमानीचे हक्काचे मतदारसंघ आहेत. कार्यकर्त्यांना संधी मिळावी, यासाठीच ही आग्रही भूमिका आहे. गुरुवार (ता. २८) पूर्वी निर्णय झाला नाही तर मात्र आम्हाला विचार करावा लागेल, असा निर्वाणीचा इशाराही शेट्टी यांनी दिला आहे. 

शरद पवार यांचा सबुरीचा सल्ला
केंद्रातील मोदी सरकारला थोपविण्यासाठी आघाडीसोबतच या. घाईघाईत निर्णय घेऊ नका, असा सबुरीचा सल्ला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांना दिला. बुलढाणा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीकडेच आहे; पण वर्ध्याबाबत काँग्रेस नेतृत्वाशी चर्चा करून तोडगा काढला जाईल, असेही श्री. पवारांनी सांगितले. स्वाभिमानीतर्फे श्री. तुपकर यांची श्री. पवार यांची त्यांच्या निवासस्थानी दीर्घकाळ चर्चा केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड आणि स्वाभिमानीचे अनिल पाटील उपस्थित होते.

Web Title: MP Raju Shetty comment