खासदार कुणाचे...युतीचे की काँग्रेसचे?

Politics
Politics

बिजवडी - माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी आंधळी धरणात जॅकवेलच्या भूमिपूजनप्रसंगी आमदार जयकुमार गोरे यांच्या विरोधात लढण्याची माण विधानसभा मतदारसंघात कोणा लुंग्यासुंग्याची लायकी नाही, असे वक्तव्य करत लोकसभा निवडणुकीत मदत करणाऱ्या व विधानसभेसाठी इच्छुक उमेदवार, भाजपच्या व इतर नेत्यांना घरचा आहेर दिला आहे. या वक्‍तव्यावरून व खासदारांच्या वागणुकीविरोधात माण मतदारसंघात नाराजीचा सूर उमटत असून सांगा...खासदार कुणाचे, महायुतीचे की काँग्रेसचे..! या चर्चेला उधाण आले आहे.

खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना खासदार करण्यासाठी माण मतदारसंघातील भाजपचे माजी आमदार दिलीप येळगावकर, जिल्हा उपाध्यक्ष अनिल देसाई या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी नरेंद्र मोदी यांनी उमेदवार दिला आहे, म्हणून प्रामाणिकपणे काम केल्याचे दिसून आले. खासदारांचे मित्र आमदार जयकुमार गोरे यांनी तर पक्षाच्या विरोधात शड्डू ठोकत मैत्रीधर्म निभावत रणजितसिंह निंबाळकरांचे संपूर्ण लोकसभा मतदारसंघात काम केले. पण, त्यांच्या निर्णयाला माण मतदारसंघात काँग्रेसच्या निष्ठावंतांनी व कार्यकर्त्यांनी साथ दिली नाही. त्याचा फटका निश्‍चितच जाणवला. दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीने केलेल्या अन्यायाविरोधात त्यांना धडा शिकवायचाच, 

या हेतूने पक्षाबाहेर पडलेले शेखर गोरे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जवळ केले. त्यानंतर शेखर गोरे यांनी भाजपच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी रात्रंदिवस मतदारसंघात बैठका, प्रचारगाड्या लावत राजकीय वातावरण चांगलेच ढवळून काढले. त्यांनी पूर्ण ताकदीने कार्यकर्त्यांच्या साथीने प्रामाणिकपणे काम करून दाखवले. त्याची दखल वरिष्ठांपर्यंत चांगल्या प्रकारे घेतली गेली. रासपचे जिल्हाध्यक्ष मामूशेठ वीरकर, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संजय भोसले यांच्यासह आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही निवडणुकीत चांगले काम केले होते.

माढ्यात महायुतीचा खासदार करण्यासाठी महायुतीच्या सर्वच मित्रपक्षांनी मनापासून प्रयत्न केले. त्यांना भाजपचे खासदार म्हणण्यापेक्षा महायुतीचे खासदार म्हटले तर चालले असते. पण, माण तालुक्‍यात खासदारांच्या वागण्यामुळे ते नक्की कोणाचे खासदार आहेत, असा सवाल केला जात आहे.

कारण मतदारसंघात आल्यानंतर भाजप, महायुतीच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना बरोबर घेण्यापेक्षा ते काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांना बरोबर घेताना दिसून येत आहेत, तर भाजपसह महायुतीचे नेत्यांना, कार्यकर्त्यांना ते दुय्यम वागणूक देत असल्याची चर्चा आहे. आंधळी धरणात जॅकवेलच्या भूमिपूजनप्रसंगी महायुतीचे कोणीही बरोबर न घेता आमदार गोरेंच्या साथीने कार्यक्रम घेतला. त्यावेळीही त्यांनी आमदार गोरेंच्या विरोधातील म्हणजे खासदारांनी त्यांच्याच पक्षातील लोकांवर तोंडसुख घेत नव्या वादाला तोंड फोडले आहे. आमदार जयकुमार गोरेंनी पक्षप्रेम बाजूला ठेवून मैत्रीप्रेम निभावले, त्याचीच परतफेड करत खासदारही ज्या पक्षातून खासदार झाले, त्याचे पक्षप्रेम बाजूला ठेवत मैत्रीप्रेम निभावत असल्याची चर्चाही तालुक्‍यात सुरू आहे. 

काँग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष असताना रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी माढा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या तोंडावर सर्वांना आश्‍चर्यचकित करत भाजपत प्रवेश करून माढ्याची उमेदवारी मिळवली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची हवा व माढ्यातील मातब्बर नेतेमंडळींच्या पाठिंब्यामुळे ते मोठ्या मताधिक्‍याने विजयी झाले. त्यामुळे भाजपत प्रवेश करताच त्यांच्या राजकीय जीवनाला वेगळीच कलाटणी मिळाली. त्यांचे वडील माजी खासदार हिंदूराव नाईक-निंबाळकर यांचा खासदारकीचा वारसा चालवण्याची त्यांना संधी मिळाली. त्या संधीचे सोने करत सुरवातीलाच राष्ट्रवादीला राजकीय झटका देत नीरा-देवघरचे चुकीच्या पध्दतीने बारामतीला जाणारे पाणी थांबवून माढ्यातील दुष्काळी तालुक्‍यांकडे वळवल्याने त्यांचे जनतेने कौतुकही केले. मात्र, माण मतदारसंघाच्या राजकारणात त्यांची खरी कसोटी लागली आहे. आमदार गोरेंचे मैत्रीप्रेम निभावताना ते पक्षप्रेम कसे निभावणार, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ते नक्की महायुतीच्या उमेदवाराला मदत करणार की, काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरेंना मदत करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे.

खासदारांच्या वाटचालीत जयकुमारच किंगमेकर...
काँग्रेसचे आमदार आनंदराव पाटील यांना उघड विरोध करत आपले मित्र रणजितसिंह नाईक- निंबाळकरांना जिल्हाध्यक्ष करून त्यांनी आपली पक्षातील ताकद दाखवून दिली होती. त्याच जिल्हाध्यक्षांना अल्पावधीतच खासदार करण्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे खासदार निंबाळकरांच्या ऐतिहासिक राजकीय भरभराटीत आमदार जयकुमार गोरेच ‘किंगमेकर’ ठरल्याचे दिसत आहे.

‘वंचित’चे सोशल इंजिनिअरिंग
सातारा - लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजेंच्या विरोधात निवडणूक लढवताना वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सहदेव ऐवळे यांनी तब्बल ४० हजारांवर मते मिळविली. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडी जिल्ह्यातील आठही मतदारसंघांत उमेदवार देण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी ‘सोशल इंजिनिअरिंग’चा प्रयोग करत आघाडीत समाविष्ठ असलेल्या प्रत्येक समूहाला उमेदवारी देण्यावर भर राहणार असून, प्रत्येक मतदारसंघात स्थानिकांना प्राधान्य दिले जाणार आहे.

लोकसभा निवडणुकीत भारिप बहुजन महासंघाचे डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडी स्थापन करून त्या माध्यमातून त्यांनी सर्व लोकसभा मतदारसंघांत उमेदवार देऊन निवडणूक लढविली. यामध्ये त्यांना फारसे यश आले नसले तरी त्यांनी काँग्रेसकडे जाणारी मते रोखल्यामुळे त्याचा फटका काँग्रेस व राष्ट्रवादीला बसला. सातारा लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने सहदेव ऐवळे यांना उमेदवारी दिली होती. ते जिल्ह्यात फारसे परिचित नसले तरी त्यांनी उदयनराजेंच्या विरोधात निवडणूक लढताना तब्बल ४० हजार ६७३ मते मिळविली होती. इतर पक्षांच्या तुलनेत फारसा संपर्क नसतानाही वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने चांगली मते मिळविली. त्यामुळे वंचित आघाडीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

मागील काही दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीने वाई येथे मेळावा घेऊन विधानसभेसाठीची चाचपणी केली आहे. आठही मतदारसंघांत उमेदवार दिले जाणार आहेत. त्यासाठी आघाडीत समाविष्ठ सहा ते सात समूहांना उमेदवारी दिली जाणार आहे. यामध्ये ओबीसींना दोन, मुस्लिम, भटके विमुक्त, अनुसूचित जातीतील दोन समूह आणि कुणबी या पध्दतीने उमेदवार दिले जातील. त्यादृष्टीने प्रत्येक मतदारसंघात चाचपणी सुरू असून, काही इच्छुकांनी आघाडीशी संपर्कही साधला आहे. रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले गटाचे काही कार्यकर्ते हे यावेळेस वंचित आघाडीसोबत राहणार आहेत. तसेच उमेदवारी देताना प्रत्येक मतदारसंघातील स्थानिकांना संधी दिली जाणार आहे. लोकसभेला बाहेरचा उमेदवार देण्यात आला होता. पण, विधानसभेला मात्र, स्थानिकांनाच संधी देण्याची भूमिका वंचित आघाडीने घेतली आहे. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी, सेना-भाजप युतीच्या विरोधात विधानसभेलाही साताऱ्यातील आठही मतदारसंघांत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार दिसणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com