रायगडला ‘वर्ल्ड हेरिटेज स्टेशन’ करण्याचा संकल्प - संभाजीराजे

रायगडला ‘वर्ल्ड हेरिटेज स्टेशन’ करण्याचा संकल्प - संभाजीराजे

कोल्हापूर - दुर्गराज रायगडावर पाच व सहा जूनला साजरा होणारा शिवराज्याभिषेक सोहळा विश्ववंदनीय करण्यासाठी शिवभक्तांनी स्वयंशिस्तीचे दर्शन घडवावे, असे आवाहन करत रायगडला ‘वर्ल्ड हेरिटेज स्टेशन’ करण्याचा संकल्प अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे मार्गदर्शक खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी येथे व्यक्त केला.

शिवराज्याभिषेकानिमित्त गडावरील महादरवाजा व खुबलढा बुरूज येथे प्रायोगिक तत्त्वावर फसाड लायटिंग केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे दुर्गराज रायगडावर होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पूर्वनियोजनाच्या  बैठकीत ते बोलत होते. या वेळी यौवराज शहाजीराजे छत्रपती उपस्थित होते. भवानी मंडपातील तुळजाभवानी मंदिरामध्ये बैठक झाली.

 ‘‘शिवराज्याभिषेक सोहळ्याची महती जगभर पोचावी, या उद्देशाने सोहळा साजरा केला जातो. यंदा या सोहळ्याकरिता ग्रीक, बल्गेरिया व पोलंडमधील राजदूतांना आमंत्रित केले आहे. रायगड विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून गडावर विविध विकासकामे सुरू आहेत. यंदाच्या सोहळ्यानिमित्त महादरवाजा व खुबलढा बुरुजावर फसाड लायटिंग केली जाणार आहे. महादरवाजावर ती कायमस्वरूपी असेल.’’

- संभाजीराजे छत्रपती

ज्येष्ठ शस्त्र संग्राहक गिरीश जाधव यांनी ‘जागर शिवकालीन युद्धकलेचा’ विषयावर माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘शिवकालीन युद्धकला लोप पावत चालली आहे. महाराष्ट्राला खेळाचा विसर पडत आहे. केवळ काही जिल्ह्यांमध्ये ही युद्धकला टिकून आहे. या कलेचे संघटन घडवून ऊर्जितावस्था आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. वस्तादांचा सत्कारही केला जाईल. जास्तीत जास्त आखाड्यांनी प्रात्यक्षिकात सहभागी व्हावे.’’

शिवभक्तांनो हे लक्षात ठेवा...

  •       पाचाड ते चित्त दरवाजा ग्रीन कॉरिडॉर, या मार्गावर शटल सर्व्हिस.
  •       गड मार्गावर शंभर फुटांवर स्वयंसेवकांची हजेरी.
  •       रोपवेचा वापर केवळ ज्येष्ठ, महिलांसह गडावर साहित्य. नेण्यासाठी. 
  •       गड चित्त दरवाजातून सर करावा व नाना दरवाजातून उतरावा.
  •       वीस ठिकाणी पाण्याच्या टाक्‍या, पाण्याचे ॲरो, गडावर वॉटर एटीएम.
  •       होळीच्या माळासह ठिकठिकाणी नियंत्रण कक्ष कार्यरत.
  •       पाच जूनला रात्रभर, तर सहा जूनला दिवसभर शाहिरीचा कार्यक्रम.
  •       रायगडावर वाहतूक व्यवस्थेसाठी नोंदणी सुरू, शुल्क  ५५० रुपये.

हेमंत साळोखे ‘सोहळा पालखीचा स्वराज्याच्या ऐक्‍याचा’ सोहळ्याबाबत माहिती देताना म्हणाले, ‘‘अठरापगड जाती धर्मातील लोकांना एकत्र करून छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली. स्वराज्यातील एकीचा संदेश देण्यासाठी सहा जूनला  राजसदर, होळीचा माळ, बाजारपेठ ते जगदीश्वर मंदिर या मार्गे काढण्यात येणाऱ्या पालखी सोहळ्यात विविध जातीधर्मातील लोककलांचा जागर घातला जाईल.  पारंपरिक वेशभूषेत महिला, शिवभक्तांनी सहभागी व्हावे. पालखी मार्गावर पुष्पवृष्टी होईल.’’

प्रात्यक्षिकांना बक्षीस
युद्धकलेची उत्कृष्ट प्रात्यक्षिके सादर करणाऱ्या आखाड्याला मराठा महासंघाचे राजेंद्र कोंढरे यांनी ५१ हजारांचे बक्षीस जाहीर केले आहे. केमिस्ट असोसिएशनने २० हजार, राहुल टकले यांनी १० हजार रुपयांचा निधी जाहीर केला. दरम्यान गडावरील सोयी-सुविधांची २७ व २८ मे रोजी पाहणी करणार असल्याचे सांगण्यात आले.

समितीचे सदस्य धनाजी खोत, प्रतिक दिंडे, अमर पाटील, आशुतोष बेडेकर, सत्यजित आवटे, शाहीर आझाद नायकवडी यांनी आपापल्या समित्यांच्या नियोजनाची माहिती दिली. नगरसेवक महेश सावंत यांनी समितीकडे २५ हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. तसेच आणखी ७५ हजार रुपये देणार असल्याचे सांगितले.

प्रा. अनिल घाटगे, मुस्लिम बोर्डिंगचे गणी आजरेकर, कोल्हापूर हायकर्सचे विजय ससे, छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे फिरोजखान उस्ताद, संतोष हासूरकर, प्रवीण कारंडे, भय्या कदम यांनी विविध सूचना केल्या. समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत यांनी प्रास्ताविक केले. शाहीर शहाजी माळी यांनी सूत्रसंचालन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com