पर्यायी शिवाजी पुलासाठी काहीही करू - संभाजीराजे

पर्यायी शिवाजी पुलासाठी काहीही करू - संभाजीराजे

कोल्हापूर - ‘पर्यायी शिवाजी पुलाचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून, बांधकामाला कोण अडथळा आणत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही. उर्वरित काम पूर्ण होण्यासाठी वेळ पडली तर काहीही करू,’ असा इशारा खासदार संभाजीराजे यांनी दिला. पुरातत्त्व विभागाने शिवाजी पुलाच्या बांधकामाला घेतलेल्या हरकतीनंतर त्यांनी आपली भूमिका पत्रकार परिषदेत मांडली. 

कोल्हापूरकरांसाठी पुलाचा प्रश्‍न अस्मितेचा मुद्दा बनला आहे. कोणत्याही स्थितीत याचे काम थांबणार नाही, असे सांगून खासदार संभाजीराजे म्हणाले, ‘‘पर्यायी शिवाजी पुलाच्या बांधकामासाठी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला आणि पुरातत्त्व खात्याच्या नियमांमधून कोल्हापूरसाठी खास सवलत मिळवली. थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह प्रधान सचिवांची भेट घेऊन चर्चा केली. त्यामुळे मार्ग निघाला आणि पुलाच्या बांधकामाला प्रारंभ झाला. मात्र, तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी पर्यायी पुलापासून शंभर मीटरपर्यंतची जमीन संपादित करून देण्याची हमी दिली होती.

या जागेत एक एकर जमीन खासगी मालकीची आहे. त्यामुळे संबंधित मालकाला जमिनीचा मोबदला पुरात्तत्व विभागाने द्यावा, असे पत्र जिल्हाधिकाऱ्यांनी पुरातत्त्व विभागाला पाठवले आहे. पुरातत्त्व विभागाने त्याला नकार देत हा विषय राज्याच्या महसूल विभागाशी संबंधित असल्याचे कळवले आहे. त्यातूनच जमीन संपादनाचा वाद सुरू झाला.’’

जमीन संपादनाच्या वादाबाबत पुरातत्त्व विभागाच्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. एका महिन्यात किंवा तातडीने भूसंपादन शक्‍य होत नसेल, तर जिल्हाधिकाऱ्यांनी किमान काही विशिष्ट मुदतीत भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करण्याची हमी पुरातत्त्व विभागाला देण्याचा पर्याय सुचवला आहे. त्याबाबत जिल्हाधिकारी यांनी आश्वासन पुरातत्त्व खात्यास द्यावे, असा पर्याय सुचवला आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याशी चर्चा केली असून त्यांनीही सकारात्मक भूमिका घेतली असल्याचेही खासदार संभाजीराजे यांनी सांगितले.

पुरातत्त्वच्या नोटिशीने खळबळ
ब्रह्मपुरी परिसरात शंभर मीटर अंतरापर्यंत कोणतेही बांधकाम करू नका, जी बांधकामं सुरू आहेत, ती तत्काळ काढून घेण्याची नोटीस पुरातत्त्व विभागाने राष्ट्रीय महामार्गाच्या कोल्हापूर विभागाला दिली आहे. नोटिशीमध्ये शंभर मीटर अंतरावर कोणतेही बांधकाम करता येत नाही असेही सांगितले असताना ११० मीटर अंतरावर सुरू असलेले बांधकाम तत्काळ काढून घेण्याच्या सूचनाही दिल्याने पर्यायी शिवाजी पुलाचे बांधकाम पुन्हा थांबविण्याचा घाट घातला जात असल्याच्या शंकेने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. जाणीवपूर्वक पुलाचे काम बंद पाडणाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी रविवारी (ता. ५) सर्वपक्षीय कृती समितीतर्फे बैठक घेऊन याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे. 

पुरातत्त्वने दिलेल्या नोटिशीमध्ये उल्लेख केल्यानुसार ‘पुरातत्त्व’च्या ठिकाणी शंभर मीटरपर्यंत बांधकाम करता येत नाही; तरीही ११० मीटर अंतरावर काही बांधकाम सुरू असल्याचे नमूद केले आहे. पुरातत्त्वने दिलेल्या अंतरानुसार पंचगंगा नदीवर सुरू असणाऱ्या पर्यायी शिवाजी पुलाचेही बांधकाम थांबविण्याचा हा प्रयत्न आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे. कायदा व सुव्यवस्था बिघडवण्यासाठीच अशी नोटीस काढली जात आहे का? यासाठी सर्वपक्षीय कृती समितीतर्फे बैठक घेतली जाणार आहे. पावसाळा सुरू होण्याआधी हे काम पूर्ण झाले पाहिजे, अशी मागणी होत आहे. त्यादृष्टीने प्रयत्नही सुरू आहेत. आता ही नोटीस आल्यामुळे आज दिवसभर शहर आणि पुलावरून वाहतूक करणाऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. हे काम बंद पाडण्याचा कोण प्रयत्न करत असेल, तर त्याचा शोध घेण्यासाठीच रविवारी बैठक घेतली जाणार आहे.

नोटिशीमध्ये उल्लेख नाही
पुरातत्त्वकडून दिलेल्या नोटिशीमध्ये पर्यायी शिवाजी पुलाचा उल्लेख नाही; मात्र ब्रह्मपुरी परिसरात सुरू असणारे काम बंद करण्याबाबत उल्लेख असल्यामुळे शिवाजी पुलाचेच काम बंद करण्याबाबत ही नोटीस असल्याचे समजून रविवार बैठक घेतली जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com