कोल्हापूर : काँग्रेससोबत शिवसेनेचे खासदार

कोल्हापूर : काँग्रेससोबत शिवसेनेचे खासदार

कोल्हापूर - राजकारणात कोण कुणाच्या कधी सोबत जाईल आणि दूर जाईल, याचा नेम नसतो. पक्षनिष्ठा खुंटीवर अडकवून आपल्याला जे सोयीचे आहे, तेच पुढे रेटण्याची सवय अलीकडे राज्यकर्त्यांच्या अंगवळणी पडू लागली आहे. तीन महिन्यांपूर्वी जे प्रा. संजय मंडलिक शिवसेनेच्या तिकिटावर खासदार झाले, तेच ऋतुराज पाटील यांच्या काँग्रेस उमेदवारीच्या घोषणेवेळी हजर होते. 

एका विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या विरोधात गेले तरी काय होते, बाकीच्या नऊ मतदारसंघांत पक्षाच्या उमेदवाराच्या पाठीशी आहेच की, अशी भूमिका आजच्या संवाद मेळाव्याच्या निमित्ताने घेण्यात आली.

आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूर दक्षिणमधून पुतणे ऋतुराज यांची काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर केली. लोकसभा निवडणुकीत माजी खासदार धनंजय महाडिक यांचा बदला घेण्यासाठी श्री. पाटील यांनी मंडलिक यांच्या पाठीशी ताकद उभी केली. ‘आमचं ठरलंय’ या वाक्‍याची राज्यभर चर्चा झाली. पाटील यांनी आघाडीचे उमेदवार म्हणून महाडिक यांच्या पाठीशी राहायला हवे होते; मात्र पक्षापेक्षा व्यक्तिगत बदल्याची महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी मंडलिक यांना पाठिंबा दिला आणि येथे आघाडीचा उमेदवार पराभूत झाला. नुकसान सतेज पाटील यांचे नव्हे, तर दोन्ही काँग्रेसचे झाले. 

लोकसभा निवडणुकीला तीन महिन्यांचाच कालावधी उलटला आहे. महायुतीचे उमेदवार म्हणून संजय मंडलिक यांना भरभरून मते लोकांनी पदरात टाकली. दोन लाख सत्तर हजारांहून अधिक मतांनी ते विजयी झाले. गेल्यावेळी युती नसल्याने कोल्हापूर दक्षिणमध्ये शिवसेनेचा उमेदवारही रिंगणात होता. तेथून अजून शिवसेनेच्या उमेदवाराची घोषणा झालेली नाही, तोपर्यंत मंडलिक यांनी काँग्रेसचे संभाव्य उमेदवार ऋतुराज यांच्या पाठीशी मंडलिक गटाची, पर्यायाने शिवसेनेची ताकद उभी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांची खरी ताकद शिवसेना उमेदवाराच्या पाठीशी हवी होती; मात्र ते काँग्रेस उमेदवाराचा प्रचार करतील. 

कोल्हापूर जिल्ह्यात काही ठराविक मंडळी वगळता अलीकडच्या राज्यकर्त्यांनी पक्षापेक्षा व्यक्तिगत महत्त्वाकांक्षा मोठी मानली. काहींनी उघडपणे अन्य पक्षाला मदत केली, तर काहींनी छुप्या पद्धतीने पक्षाला अडचणीत आणले. आज दोन्ही काँग्रेसची वाताहत झाली आहे. त्यास विरोधकांपेक्षा पक्षांतर्गत गटबाजीच अधिक कारणीभूत ठरली.

मंडलिक गट पूर्वीपासून काँग्रेसचा, नंतर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता. मागील निवडणुकीत मंडलिक यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि गट शिवसेनेचा झाला. आजही मंडलिक गट आहे म्हणून शिवसेना आहे; शिवसेना आहे म्हणून मंडलिक गट आहे असे नाही, अशी काहींची धारणा आहे. 

मंडलिक पैरा फेडणार
लोकसभेच्या विजयाचा गुलाल उतरण्याअगोदरच मंडलिक यांनी दक्षिणची भूमिका जाहीर केली. त्यांना सतेज यांनी मदत केली होती, त्याचा पैरा आता ते फेडणार आहेत. तो फेडत असताना त्यांनी शिवसेनेपेक्षा मैत्रीला अधिक प्राधान्य दिले. अमूक एक कुटुंब म्हणजे सर्वपक्षीय कुटुंब, अशी टीका एका बाजूला करायची आणि दुसऱ्या बाजूला पक्षापेक्षा मैित्रभाव मोठा समजायचा, हेच आजच्या मेळाव्यातून सिद्ध झाले.

मंडलिक यांच्या भूमिकेचे भविष्यात पडसाद
एका मतदारसंघात विरोधी पक्षासोबत आणि उर्वरित मतदारसंघांत पक्ष देईल तो आदेश, अशी भूमिका घेतली गेली. अशी सोयीची भूमिका घेणाऱ्यांना कोल्हापूरच्या जनतेने धडा शिकवला आहे. लोक खांद्यावर घेतातही आणि खाली पाडतातही, हेही स्पष्ट आहे. मंडलिक यांच्या भूमिकेचे पडसाद भविष्यात उमटणार, हेही निश्‍चित आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com