
एक महिन्यात दुसऱ्यांदा खासदार संजय पाटील यांनी पालिका नगरसेवकांची आणि अधिकाऱ्यांची प्रदीर्घ बैठक घेत पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर "ऍक्शन मोड' मध्ये येण्याचे संकेत दिले.
तासगाव (जि. सांगली) ः एक महिन्यात दुसऱ्यांदा खासदार संजय पाटील यांनी पालिका नगरसेवकांची आणि अधिकाऱ्यांची प्रदीर्घ बैठक घेत पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर "ऍक्शन मोड' मध्ये येण्याचे संकेत दिले. रिंग रोड आणि शहरातील विकास कामे याबाबत चर्चा झाल्याचे समजते.
तीन आठवड्यांपूर्वी खासदार पाटील यांनी रात्री तीन वाजेपर्यंत पालिका नगरसेवकांशी चर्चा करून चार वर्षांनंतर उपनगराध्यक्ष आणि पक्षप्रतोद बदलून अन्य नगरसेवकांना संधी देण्याचा निर्णय घेतला होता. त्याप्रमाणे बदल झाले सुद्धा ! उपनगराध्यक्ष दत्तात्रय रेंदाळकर आणि पक्षप्रतोद जाफर मुजावर यांची निवड झाल्यानंतर लगेचच पुन्हा पदाधिकारी आणि नगरसेवकांची पालिकेत रात्री उशिरापर्यंत बैठका घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. एका महिन्यात ही दुसरी बैठक आहे, त्यामुळे सध्या पालिकेत सुरू असलेला कारभाऱ्यांचा कारभार चांगलाच "मनावर' घेतला असल्याचे स्पष्ट झाले आहे.
गेली चार वर्षे पालिकेच्या कारभाऱ्यांनी केलेले उद्योग आता गांभीर्याने घेण्याची वेळ आली आहे. पहिल्या दोन अडीच वर्षांची कामाची प्रशासकीय चौकशी सुरू झाली आहे. आज खासदार संजय पाटील यांनी अधिकारी आणि नगरसेवक अशी वेगवेगळी बैठक घेतली.
यावर्षी पालिकेच्या निवडणुकीला सामोरे जावे लागणार असल्याने गेल्या चार वर्षांतील कारभारातील चुका दुरुस्त करत काम करण्याची गरज आहे त्या पार्श्वभूमीवर ! आता स्वतः खासदारच ऍक्शन मोड मध्ये आल्याने नगरसेवकांची धावपळ उडाली आहे.
या बैठकीत तासगावच्या विकास कामाबरोबरच रेंगाळलेला रिंग रोड याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा झाली. भुयारी गटार योजनेच्या कामाचा आढावाही घेण्यात आला. पालिकेच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या कामाची चर्चाही यावेळी करण्यात आल्याचे समजते.
संपादन : युवराज यादव