Election Results : जातीच्या विषारी प्रयोगांना जनतेची चपराक - संजय पाटील

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 मे 2019

सांगली मतदारसंघात काही मंडळींनी जातीचा विषारी प्रयोग केला; मात्र जनतेने त्यांना चपराक दिली. सुसंस्कृत जिल्ह्यात ते प्रयोग चालले नाहीत. केंद्र, राज्याच्या कामांचा धडाका आणि माझी पाच वर्षांतील धडपड या जोरावर पुन्हा मोठ्या मताधिक्‍याने विजय मिळवता आला. तो मी नम्रतेने जनतेच्या चरणी अर्पण करतो

- संजय पाटील

सांगली - सांगली मतदारसंघात काही मंडळींनी जातीचा विषारी प्रयोग केला; मात्र जनतेने त्यांना चपराक दिली. सुसंस्कृत जिल्ह्यात ते प्रयोग चालले नाहीत. केंद्र, राज्याच्या कामांचा धडाका आणि माझी पाच वर्षांतील धडपड या जोरावर पुन्हा मोठ्या मताधिक्‍याने विजय मिळवता आला. तो मी नम्रतेने जनतेच्या चरणी अर्पण करतो, अशा भावना खासदार संजय पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केल्या. 

ते म्हणाले, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाचे अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षांत जनतेसाठी केलेल्या कामांचा हा विजय आहे. त्यांच्या पारदर्शी कारभाराला, विकासाच्या व्हिजनला लोकांनी साथ दिली. मी गेल्या काळात उपसा सिंचन योजनांसाठी केलेलं काम, लोकांशी राखलेला संपर्क, त्यांच्याशी निर्माण केलेले जिव्हाळ्याचे संबंध, राष्ट्रीय महामार्गाची केलेली कामे यांचा प्रभाव दिसून आला. राष्ट्रवादी, काँग्रेससह विरोधकांनी पूर्ण ताकदीने विरोध केला; मात्र कामाने मला तारले. शिवसेना, रासप, रयत आघाडी यांसह घटक पक्षांची मोठी मदत झाली.’’

ते म्हणाले, ‘‘येथे विषारी प्रयोग झाले. काहींनी अस्तित्वासाठी शेवटची केविलवाणी धडपड केली; मात्र जनतेने त्यांचा डाव उधळून लावला. मी सरळ राजकारण केले; मात्र काही वेळा समोरचा वेगळे वागायला लागला तर बोट वाकडं करावं लागतं. ज्या त्या वेळी निर्णय घेऊ. आता खूप काम बाकी आहे. पाणी योजना पूर्ण करायच्या आहेत. शेती विकासासाठी निती आयोगाच्या धोरणाप्रमाणे काम करायचे आहे. त्यासाठी पुढचे पाऊल लगेच उचलेन.’’

आकडे येऊ द्यात
कुणी कुणी पैरा पाळला आणि तुम्ही फेडणार का, यावर श्री. पाटील म्हणाले, ‘‘अजून सविस्तर आकडे हाती आले नाहीत. ते आल्यावर कुणी काय केले आहे, हे कळेल.’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Sanjay Patil comment after Victory in Loksabha election