खासदार शरद बनसोडे उद्या करणार उपोषण

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 एप्रिल 2018

संसदेत काँग्रेस व अन्य विरोधी खासदारांनी गोंधळ घालून कामकाज वारंवार बंद पाडल्याच्या निषेधार्थ खासदार शरद बनसोडे हे उपोषण करणार आहेत. 

सोलापूर : संसद सभागृहात बजेट सत्र सुरू असताना काँग्रेस व अन्य विरोधी खासदारांनी गोंधळ घालून कामकाज वारंवार बंद पाडले. त्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या वतीने देशभरात खासदारांचे उपोषण होणार आहे. त्याच अनुषंगाने उद्या (गुरुवारी) सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत उपोषण करणार असल्याचे खासदार शरद बनसोडे यांनी सांगितले. 

देशातील जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी तसेच अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी लोकसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संसदेत सुरू असताना विरोधी पक्षातील काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षाच्या खासदारांनी गोंधळ घालून संसदेचे कामकाज बंद पाडण्यास भाग पाडले. यामुळे लोकसभेत कोणतेही निर्णय किंवा चर्चा झाली नाही. संसदेचा महत्वाचा वेळ वाया गेला. जनतेने मोठ्या विश्वासाने निवडून दिल्यानंतर त्यांचा प्रतिनिधी म्हणून जनतेच्या हिताचे काम करणे खासदारांचे प्रथम कर्तव्य आणि महत्वाची जबाबदारी असताना कॉगे्रस खासदारांनी गोंधळ घालून निवडून दिलेल्या जनतेचा विश्वास घात केला त्याचबरोबर जनतेकडून कररूपाने जमा झालेल्या पैसा गोंधळ घालून वाया घालवला याचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने राष्ट्रीय पातळीवर खासदारांचे उपोषण करून करण्याचा निर्णय घेतला आहे, असे श्री बनसोडे म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सर्व खासदार सहभागी होऊन देशभरात उपोषण करणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: MP Sharad Bansode is going to hunger strike tomorrow