खासदार उदयनराजेंच्या "राजधानी' एक्‍स्प्रेसला ब्रेक? 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 जानेवारी 2017

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने बाजूला ठेवल्यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी स्थापन केलेल्या राजधानी सातारा विकास आघाडीला सध्या उमेदवारांचा ब्रेक लागलेला दिसतो. त्यामुळे उदयनराजेंची ही "राजधानी'ची सातारा तालुका एक्‍स्प्रेस होणार, की जिल्ह्यात सुसाट वेग घेणार, हे येत्या दोन दिवसांत निश्‍चित होईल. 

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने बाजूला ठेवल्यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी स्थापन केलेल्या राजधानी सातारा विकास आघाडीला सध्या उमेदवारांचा ब्रेक लागलेला दिसतो. त्यामुळे उदयनराजेंची ही "राजधानी'ची सातारा तालुका एक्‍स्प्रेस होणार, की जिल्ह्यात सुसाट वेग घेणार, हे येत्या दोन दिवसांत निश्‍चित होईल. 

उदयनराजेंचे दबावतंत्र 
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विरोधात खासदार उदनराजे भोसले यांनी सातत्याने भूमिका घेतली आहे. यापूर्वीही लोकसभा किंवा विधानसभेच्या निवडणुकीतही त्यांनी दबावतंत्राचा वापर केला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर उदयनराजेंनी स्वतंत्र राजधानी सातारा विकास आघाडी स्थापन करून राष्ट्रवादीवर दबावतंत्राचा वापर करण्याचा प्रयत्न केला. निवडणूक जाहीर झाल्यानंतर पक्षाची भूमिका विचारात न घेता उदयनराजेंनी ही राजकीय चाल खेळून राष्ट्रवादीच्या नेत्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. 

राष्ट्रवादीकडून दबावाकडे दुर्लक्ष 
पक्षातील नेत्यांनी या दबावतंत्राकडे दुर्लक्ष करीत खासदारांविषयी अनेक तक्रारी पक्षश्रेष्ठींपर्यंत पोचविल्या. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत शेंद्य्रात झालेल्या मेळाव्यात अनेकांनी या विषयाला वाचा फोडली. त्याचवेळी शरद पवार यांनीही "प्रसाद' घेऊन "मतदान' करणाऱ्यांना "घरी' बसवा, असे सूचक वक्‍तव्य करत पक्षाच्या स्थानिक नेत्यांना अप्रत्यक्ष संदेशच दिला होता. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या रणसंग्रामात राष्ट्रवादीने उदयनराजेंना बाजूला ठेवून निवडणुकीची रणनीती आखली आहे. 

उदयनराजेंपुढे दोनच पर्याय 
सध्याच्या राजकीय घडामोडीत उदयनराजेंपुढे दोनच पर्याय उरलेत. इतर पक्षांसोबत आघाडी करणे किंवा राजधानी सातारा विकास आघाडीच्या माध्यमातून जिल्ह्यात उमेदवार उभे करणे, असे दोनच पर्याय त्यांच्यापुढे आहेत. इतर पक्षांसोबत आघाडीचे सर्व पर्याय सध्या तरी मावळलेले दिसतात. कारण सर्वच पक्षांनी स्वबळावर व पक्षाच्या चिन्हावरच लढण्याची भूमिका घेतली आहे. 

सातारा तालुक्‍यापुरती आघाडी? 
खासदारांनी राजधानी सातारा विकास आघाडी तूर्त बाजूला ठेवत सातारा विकास आघाडीच्या माध्यमातून सातारा तालुक्‍यातील दहा गट व 20 गणांत निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी सुसाट सुटलेल्या राजधानी आघाडीच्या एक्‍स्प्रेसला सध्याच्या राजकीय घडामोडींमुळे आता ब्रेक लागलेला दिसतो. ही एक्‍स्प्रेस आता सातारा तालुक्‍यापुरतीच धावणार नाही ना, अशी शंका उपस्थित केली जात आहे. सातारा तालुक्‍यातील गट, गणांतील उमेदवार निश्‍चित करण्यावर उदयनराजेंनी भर दिला आहे. त्यामुळे गुरुवारी (ता. 2) राजधानी सातारा विकास आघाडीच्या सातारा तालुक्‍यातील उमेदवारांची यादी निश्‍चित होण्याची शक्‍यता आहे. 

नाराजांचा भाजपकडे कल 
इतर तालुक्‍यांत खासदारांकडून "राजधानी' आघाडीसाठी उमेदवारांची चाचपणी सुरू होती. पण, प्रत्येक ठिकाणचे नाराज भाजप टिपत असल्याने उदयनराजेंनी ज्या नाराजांच्या जिवावर राजधानी सातारा विकास आघाडीचे भवितव्य उभे करण्याचा प्रयत्न केला, तेच भाजपमध्ये जाऊ लागल्याने खासदारांना "राजधानी' आघाडीची जिल्ह्यात मोट बांधण्यात अडथळे येऊ लागले आहेत. त्यामुळे राजधानी सातारा विकास आघाडीची एक्‍स्प्रेस आता सातारा तालुक्‍यापुरतीच धावताना दिसण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 

स्वबळाच्या नाऱ्याने उदयनराजे समर्थकांची कोंडी 
जिल्ह्यात उदयनराजेंचे नेतृत्व मानणारे प्रत्येक तालुक्‍यात कार्यकर्ते आहेत. त्यापैकी काही जण विविध पक्षांचे पदाधिकारीही आहेत. आगामी निवडणूक स्वबळावर लढण्याचा एल्गार बहुतांश पक्षांनी घेतल्यामुळे उदयनराजे समर्थक पदाधिकाऱ्यांची अडचण झालेली दिसते. पक्षाने या निवडणुकीच्या निमित्ताने त्यांना बांधून घेतले आहे. त्यामुळे हे निष्ठावंत कार्यकर्ते आता उदयनराजेंच्या राजधानी सातारा विकास आघाडीच्या मदतीला येऊ शकतील का, याबाबत शंका उपस्थित होत आहेत. पक्षाच्या धोरणामुळे या कार्यकर्त्यांचीही चांगलीच कोंडी झालेली दिसते.

Web Title: MP udayanaraje politics