एमपीएससीत चव्हाण, डुके, बेलेकर, पाटील यांची बाजी

एमपीएससीत चव्हाण, डुके,  बेलेकर, पाटील यांची बाजी

कोल्हापूर - महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) या वर्षी झालेल्या परीक्षेत जिल्ह्यातील चौघे उत्तीर्ण झाले. यामध्ये उत्पादन शुल्क उपअधीक्षक विभागात सातवे (ता. पन्हाळा) येथील प्रसन्नजित चव्हाण राज्यात प्रथम आले. कक्ष अधिकारी विभागात गारगोटी (ता. भुदरगड) येथील सूरज बेलेकर राज्यात तिसरे आले. प्रमोद डुके (निकम) आणि अनुप पाटील यांनीही यश मिळवले. 

राज्य लोकसेवा आयोगाने २०१८ मध्ये घेतलेल्या परीक्षेचा निकाल आज रात्री उशिरा जाहीर झाला. उत्पादन शुल्क उपअधीक्षक पदाच्या परीक्षेत प्रसन्नजित चव्हाण यांना ९०० पैकी ५४८ गुण मिळाले. त्यांनी वारणानगर येथील तात्यासाहेब कोरे इंजिनिअरिंग कॉलेजमधून मेकॅनिकल इंजिनिअरची पदवी घेतली. त्यांचे वडील प्राथमिक शिक्षक आणि आई प्रतिभा गृहिणी आहे. गारगोटीचे सूरज बेलेकर कक्ष अधिकारी विभागात राज्यात तिसरे आले. त्यांना ५३९ गुण मिळाले.

सूरज यांनी केआयटीतून २०१३ मध्ये माहिती आणि तंत्रज्ञान विषयात अभियांत्रिकी पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. ते तिसऱ्या प्रयत्नात यशस्वी झाले. सूरज यांचे वडील एका पतसंस्थेत व्यवस्थापक असून, आई गृहिणी आहे. कसबा बावडा येथील डुके-निकम यांना ९०० पैकी ५४९ गुण मिळाले. त्यांची सहायक आयुक्त, विक्रीकर या पदासाठी निवड झाली. त्यांनी केआयटी महाविद्यालयातून अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे.

काही काळ नोकरी करून त्यांनी अभ्यास सुरू केला. यावर्षी त्यांना यश मिळाले. त्यांचे वडील निवृत्त मुख्याध्यापक असून आई गृहिणी आहे. अनुप पाटील यांनी ५५५ गुणांसह उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदाच्या परीक्षेत यश मिळविले. त्यांचे वडील शेतकरी आणि आई सुरेखा गृहिणी आहेत. त्यांनी अतिग्रे येथील संजय घोडावत इन्स्टिट्यूटमधून बी. ई. मेकॅनिकलची पदवी घेतली आहे.

आशिष बारकुल राज्यात प्रथम
पुणे : सोलापूर जिल्ह्यातील आशिष बारकुल (खुला वर्ग) यांनी राज्यात पहिला क्रमांक मिळविला आहे. सोलापूर जिल्ह्यातीलच महेश जमदाडे यांनी इतर मागास प्रवर्गातून, तर पुण्यातील स्वाती दाभाडे महिलांमध्ये राज्यात प्रथम आल्या आहेत. उमेदवारांना हा निकाल ‘www.mpsc.gov.in’ या संकेतस्थळावर पाहता येणार आहे. 

सर्वसाधारण वर्गात बारकुल यांनी ५७८ गुण मिळवत पहिला क्रमांक पटकाविला आहे. जमदाडे यांनी ५७१ गुण मिळवत राज्यात दुसरा आणि इतर मागास प्रवर्गात पहिला क्रमांक मिळविला आहे. सुमीत शिंदे हे ५६८ गुण मिळवीत राज्यात तिसरे आले आहेत. स्वाती दाभाडे यांनी ५३७ गुण मिळवत महिलांमधून पहिला क्रमांक मिळविला आहे. पुण्यातील दर्शन निकाळजे हा ५१९ गुणांसह अनुसूचित जाती प्रवर्गातून राज्यात पहिला आला आहे. या वर्षी खुल्या वर्गासाठी ५६२ गुणांचा, महिलांसाठी ५२५ गुणांचा कटऑफ आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com