मोहोळ : महावितरणने केला 30 ट्रान्सफॉर्मरचा विद्युत पुरवठा खंडित

Mahavitaran
Mahavitaran

मोहोळ : आष्टी तलाव परिसरातील पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली, वरिष्ठांच्या आदेशानुसार महावितरणने 30 ट्रान्सफॉर्मरचा विद्युत पुरवठा खंडित केल्याने सहा गावातील, सुमारे अडीच हजार एकर क्षेत्रावरील पिके व फळबागा धोक्यात आल्या आहेत, अगोदरच अडचणीत असलेला शेतकरी या कारवाईमुळे जास्तच अडचणीत आला आहे. दरम्यान केळी, डाळिंब, द्राक्ष, लिंबू या फळबागा सुकू लागल्या आहेत, त्यामुळे हाता तोंडाशी आलेला घास जातो की काय अशी धास्ती  शेतकऱ्यांना बसली आहे. यातून सकारात्मक मार्ग काढण्याची मागणी अर्थ व बांधकाम सभापती विजयराज डोंगरे व शेतकऱ्यांनी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या कडे  केली आहे.

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, आष्टी तलाव म्हणजे या परिसरातील शेतकऱ्यांची जीवनदायी आहे. या तलावावरून आष्टी, पापरी, खंडाळी, शेटफळ, येवती, रोपळे या गावातील शेतकऱ्यांनी, विविध बँकांची लाखो रुपयांची कर्जे काढून उसा सह डाळिंब, द्राक्ष, केळी, लिंबू या फळबागांची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे, तर  सध्याही द्राक्ष लागवड सुरू आहे. त्यामुळे कर्जाचा मोठा डोंगर शेतकऱ्यावर आहे. अनेक शेतकऱ्यांना घरच्या पाण्याचा फारसा आधार नाही त्यामुळे त्यांनी तलावाच्या पाण्यावरच पिके  केली आहेत. सध्या मोठ्या प्रमाणात चारा व पाणी टंचाई आहे, अनेक शेतकऱ्यांनी ऊस कारखान्याला गळितास न पाठविता तो चाऱ्यासाठी ठेवला आहे. तर त्याच्या बरोबरच कडवळ, मका, व घास हि चाऱ्याची पिके केली आहेत. चालू वर्षी कडक उन्हाळा असल्याने विहीर व बोअरच्या पाण्याने केव्हाच तळ गाठला आहे.

सध्या आष्टी तलावात 170 . 21 एम सी एफ टी इतका, म्हणजे 21 टक्के पाणीसाठा आहे. याच तलावावरून सुमारे तीन हजार एकर क्षे त्रासाठी पाणी परवाने दिले आहेत,तर याच तलावावर मोठ्या अशा चार पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहेत. चाऱ्याची पिके जगवण्यासाठी व पिण्याच्या पाण्यासाठी ,दररोज किमान तीन तास तरी विद्युत पुरवठा सुरू करावा, कारण कमीत कमी दोन ते अडीच किलोमीटरच्या आत कुठल्याही शेतकऱ्याची पाईप लाईन नाही, त्यामुळे पहिला एक तास तरी पाईप भरण्यातच जाणार आहे, पिण्यासाठी पाणी राखून ठेवणे जरी गरजेचे असले तरी शेतकऱ्यांचाही विचार व्हावा. अनेक शेतकऱ्यांच्या डाळींब बागा सध्या उतरण्याच्या प्रक्रियेत आहेत. तर कलिंगड व खरबूज ही वेलवर्गीय पिके ही याच प्रक्रियेत आहेत. त्यामुळे हाता तोंडाशी आलेला घास जातो की काय अशी भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. अनेक शेतकऱ्यांच्या विहिरीला पायऱ्या नाहीत, त्यामुळे पाणी विहिरीतून काढणेही अडचणीचे आहे.

शेतकऱ्यांच्या या अडचणीबाबत मी पालकमंत्री विजयकुमार देशमुख व पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांना भेटलो आहे. तसेच जिल्हाधिकारी यांच्याशीही फोनवरून चर्चा झाली आहे. येत्या एक-दोन दिवसात एक दिवसाआड दोन तास पिण्याच्या पाण्यासाठी विद्युत पुरवठा सुरू करण्याचे त्यांच्या विचाराधीन आहे,त्यामुळे  यातून सकारात्मक मार्ग निघेल अशी मला आशा आहे.
- विजयराज डोंगरे शेतकरी व सभापती

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आष्टी तलाव परिसरातील तीस ट्रान्सफॉर्मर चा विद्युत पुरवठा खंडित केला आहे. जेणेकरून पिण्यासाठी राखुन ठेवलेल्या  पाण्याचा उपसा होऊ नये, हाच  त्या मागचा हेतू आहे.
- अनिल अंकोलीकर, सहाय्यक अभियंता महावितरण मोहोळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com