महावितरणच्याच दिव्याखाली अंधार

तात्या लांडगे
रविवार, 22 जुलै 2018

राज्यातील शेती, उद्योग क्षेत्रासह घरगुती वापरासाठी वीज पुरवठा करणाऱ्या महावितरणला वाढत्या थकबाकीमुळे भविष्यातील अंधाराची चिंता सतावू लागली आहे. सहकारी साखर कारखाने, जिल्हा बॅंकांनतर आता महावितरण थकबाकीमुळे अडचणीत सापडले आहे. 
 

सोलापूर : राज्यातील शेती, उद्योग क्षेत्रासह घरगुती वापरासाठी वीज पुरवठा करणाऱ्या महावितरणला वाढत्या थकबाकीमुळे भविष्यातील अंधाराची चिंता सतावू लागली आहे. सहकारी साखर कारखाने, जिल्हा बॅंकांनतर आता महावितरण थकबाकीमुळे अडचणीत सापडले आहे. 

राज्यात सुमारे 41 लाख कृषी ग्राहक आहेत. त्यांना दोन कोटी 12 लाख एचपी विद्युत जोडभार असून, त्यापैकी 25 लाख 41 हजार शेतकऱ्यांना मीटरद्वारे तर उर्वरित शेतकऱ्यांना अश्‍वशक्‍तीद्वारे वीज पुरवठा केला जातो. परंतु, सध्या राज्यातील 20 लाख शेतकऱ्यांकडे 24 हजार 699 कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यांच्यासाठी मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना सुरू केली; मात्र थकबाकी "जैसे थे' आहे. सध्या घरगुती ग्राहकांकडे 926 कोटी, व्यापारी ग्राहकांकडे 377 कोटी, उद्योग क्षेत्राकडे 700 कोटी, पॉवरलूमकडे 852 कोटी, रस्त्यांवरील दिव्यांची साडेतीन हजार कोटी, रेल्वेसह अन्य विभागांकडे आठ हजार कोटींची थकबाकी आहे.

कर्जमाफीनंतर आता शेतकऱ्यांकडील विजेची थकबाकीही सरकारने माफ करावी, अशी मागणी पुढे येत आहे. परंतु, वसुलीसाठी सर्वोतोपरी प्रयत्न करूनही थकबाकी वसूल होत नसल्याने महावितरणची चिंता वाढली आहे. 

थकबाकी वसुलीसाठी विशेष योजना राबवूनही ग्राहकांकडील थकबाकी वसूल होत नाही. त्यामुळे आता संबंधित ग्राहकांच्या मालमत्तांवर महावितरणचा बोजा चढविण्यात येणार आहे. त्यादृष्टीने राज्य सरकारकडे मागणी करण्यात आली आहे. 
पी. एस. पाटील, मुख्य जनसंपर्क अधिकारी, महावितरण 

विभागनिहाय थकबाकी (आकडे कोटी रुपयांत) 

5846.77 विदर्भ 

12633.79 मराठवाडा 

3428.65 कोकण 

18447.08 पश्‍चिम महाराष्ट्र 

40356.29 
एकूण थकबाकी 

Web Title: MSEDCL are facing problem due bill pending