मायणी तलाव कसा होणार गाळमुक्त? 

संजय जगताप
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

मायणी - येथील मायणी तलावातील गाळाचा उपसा मोठ्या प्रमाणात सुरू होता. मात्र काल अचानक तलावात जाणाऱ्या रस्त्यावर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी चारी काढून रस्ता बंद केला. त्यामुळे गाळ उपसा बंद होण्यासह वाहतूकदारांच्या रोजीरोटीचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. वनविभाग व प्रांताधिकारी एकमेकांकडे बोट दाखवून जबाबदारी झटकत असल्याचा आरोप संतप्त गाळ वाहतूकदार करीत आहेत. 

मायणी - येथील मायणी तलावातील गाळाचा उपसा मोठ्या प्रमाणात सुरू होता. मात्र काल अचानक तलावात जाणाऱ्या रस्त्यावर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी चारी काढून रस्ता बंद केला. त्यामुळे गाळ उपसा बंद होण्यासह वाहतूकदारांच्या रोजीरोटीचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. वनविभाग व प्रांताधिकारी एकमेकांकडे बोट दाखवून जबाबदारी झटकत असल्याचा आरोप संतप्त गाळ वाहतूकदार करीत आहेत. 

शासनाच्या गाळमुक्त तलाव व जलयुक्त शिवारासाठी राज्यभरातील विविध गावे पुढाकार घेत आहेत. "सकाळ'च्या तनिष्का व्यासपीठामार्फत तलावातील गाळ काढण्याचे काम हाती घेण्यात येत आहे. गावेच्या गावे श्रमदानात न्हाऊन निघत आहेत. दुष्काळाचा कलंक पुसण्यासाठी सर्वांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. पाण्याचा थेंब न थेंब जमिनीत साठवून भूजल पातळी वाढवण्यासाठी हजारो हात कामाला लागले आहेत. अशा स्थितीत मात्र मायणी तलावातील गाळाचा उपसा करण्यास प्रशासनाकडूनच कोलदांडा घातला जात आहे. तलावातील गाळाची प्रत अत्युत्तम असल्याने वीटभट्टी चालक व अनेक शेतकरी गाळ उपसून स्वखर्चाने नेत आहेत. इंग्रज राजवटीतील सुमारे दीडशे वर्षांचा तलाव असल्याने तेथे प्रचंड प्रमाणात गाळ आहे. हजारो ब्रास गाळाचा उपसा करून आतापर्यंत शेतकऱ्यांनी खडकाळ माळरानांत मळे फुलवले आहेत, तरीही तलावातील गाळाचा कोपराही हललेला दिसत नाही. सुमारे पस्तीस फूट खोल गाळ आहे. त्या गाळाचा अधिकाधिक उपसा व्हावा, ही सर्वांचीच मागणी आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून गाळाचा उपसा सुरू आहे. तसाच तो यंदाही सुरू होता. मात्र, अचानक वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी डरकाळी फोडून तलावात जाणारा रस्ता बंद केला. कालपर्यंत गाळ उपसा सुरू होता. मात्र अचानक तलावात जाणाऱ्या रस्त्याचे गेट बंद करण्यात आले आहे. त्यामुळे गाळाचा उपसा करून चरितार्थ करणाऱ्या अनेक वाहतूकदारांच्या रोजीरोटीवर कुऱ्हाड कोसळली आहे. कधी वनविभाग, तहसीलदार तर कधी प्रांताधिकारी फर्मान काढून तलावात जाणारा रस्ता बंद करीत आहेत. वारंवारच्या अडवणुकीच्या धोरणांमुळे वाहनमालक त्रस्त झाले आहेत. त्याबाबत वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडे विचारपूस केली, तर ते प्रशासनाकडे बोट दाखवत आहेत, तर प्रशासन वनविभागाकडे. त्यामुळे वाहतूकदार संताप व्यक्त करीत आहेत. 

""वनहद्दीतून जाणाऱ्या रस्त्यांवरून गौण खनिजांची वाहतूक होत असल्यास तातडीने ते रस्ते बंद करावेत वा संबंधितांवर कारवाई करावी, अशा आशयाचे पत्र सहायक वनसंरक्षकांनी दिल्यामुळे रस्ता बंद करण्यात आला आहे.'' 
- जी. आर. चव्हाण (तालुका वन अधिकारी) 

Web Title: Mud in the Mayani Lake