उस्मानाबाद, मुंबई संघांची विजयी सलामी 

अलताफ कडकाले
शुक्रवार, 13 डिसेंबर 2019

स्पर्धेतील अन्य निकाल 
पुरुष : पुणे वि. वि. धुळे 15-8 एक डाव 7 गुणांनी, सांगली वि. वि. लातूर 18-6 एक डाव 12 गुणांनी, मुंबई उपनगर वि. वि. रत्नागिरी 20-7 एक डाव 13 गुणांनी, ठाणे वि. वि. नंदुरबार 13-9 एक डाव 4 गुणांनी. महिला : ठाणे वि. वि. लातूर 26-6 एक डाव 20 गुणांनी, रत्नागिरी वि. वि. नाशिक 11-10 एक डाव 1 गुणांनी. 

सोलापूर : मुंबईच्या पुरुष व उस्मानाबादच्या महिला संघाने 56व्या वरिष्ठ गट राज्य अजिंक्‍यपद खो-खो स्पर्धेत विजयी सलामी दिली. येथील ह. दे. प्रशालेच्या मैदानावर आजपासून सुरू झालेल्या स्पर्धेत सलामीच्या दिवशी सर्व सामने डावाने झाले. महिलांच्या सामन्यात उस्मानाबादने जालन्याचा 20-7 असा एक डाव राखून 13 गुणांनी धुव्वा उडविला. 

उस्मानाबादकडून निकिता पवारने पहिल्या डावात 2.20 मिनिटे नाबाद व दुसऱ्या डावात 2.40 मिनिटे संरक्षण करताना आक्रमणात दोन गडी बाद करीत अष्टपैलू खेळी केली. ऋतुजा खरे हिने आपल्या धारदार आक्रमणात सहा गडी बाद करताना दुसऱ्या डावात दोन मिनिटे पळतीचा खेळ करीत संघाच्या विजयात साथ दिली. जालन्याकडून अमृता सोनाटकरने 1.50 मिनिटे संरक्षण तर आदिती टेकाळे हिने चार गुण मिळवीत एकाकी लढत दिली. पुरुषांच्या सामन्यात औरंगाबादला मुंबईने 25-14 असा एक डाव राखून पराभूत केले. मुंबईच्या विराज कोमठकर व शुभम शिगवण यांनी औरंगाबादचे प्रत्येकी सात संरक्षक टिपले. त्यांचा एकही संरक्षक मैदानावर तग धरू शकला नाही. औरंगाबादकडून राजपाल निकाळजे व साहूल नाईकनवरे यांनी आपल्या आक्रमणात प्रत्येकी तीन गुण मिळवीत लढत दिली. 

हेही वाचा : ठाण्याच्या दोन्ही संघांची विजयी सलामी 

उत्कर्ष क्रीडा मंडळ व ह. दे. प्रशाला यांच्या संयुक्त विद्यमाने शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारविजेते संघटक श्रीकांत ढेपे यांच्या गौरवार्थ ही स्पर्धा आयोजिली आहे. स्पर्धेचे उद्‌घाटन पुण्याच्या शिक्षण प्रसारक मंडळीचे उपाध्यक्ष श्रीकृष्ण चितळे, सदस्य दामोदर भंडारी, पोलिस उपायुक्त बापू बांगर, मनोज पाटील, खो-खो फेडरेशन ऑफ इंडियाचे सहसचिव डॉ. चंद्रजित जाधव, राज्य खो-खो संघटनेचे माजी सचिव जे. पी. शेळके, सचिव संदीप तावडे, चेअरमन सचिन गोडबोले, ह. दे. प्रशाला शाळा समितीचे अध्यक्ष राजेश पटवर्धन, सोलापूर असोसिएशनचे अध्यक्ष महेश गादेकर, जीएम ग्रुपचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे, जिल्हा क्रीडाधिकारी नितीन तारळकर आदींच्या प्रमुख उपस्थितीत झाले. श्‍वेता मालप हिने सूत्रसंचालन केले. ह. दे.चे मुख्याध्यापक पी. जी. चव्हाण यांनी स्वागत केले. उत्कर्ष मंडळाचे सचिव अजित शिंदे यांनी प्रास्ताविक केले. उमाकांत गायकवाड यांनी आभार मानले. 

"प्रो खो-खो स्पर्धेमुळे खेळाडूंना उज्ज्वल भविष्य' 

सोलापूर : आयपीएल आणि प्रो- कबड्डीच्या धर्तीवर प्रो खो- खो स्पर्धा भविष्यात सुरू होणार आहेत. यामुळे मातीतला आपला देशी खेळ असलेल्या खो-खोला आणखी चांगले दिवस येतील. खेळाडूंना उज्ज्वल भविष्य मिळेल, असे प्रतिपादन गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त बापू बांगर यांनी केले. 

शि. प्र. मंडळीचे उपाध्यक्ष श्रीकृष्ण चितळे यांच्या हस्ते उद्‌घाटन 
वरिष्ठ गटाची पुरुष व महिलांची राज्य अजिंक्‍यपद खो- खो स्पर्धेचे गुरुवारी सायंकाळी उद्‌घाटन करण्यात आले. महाराष्ट्र व सोलापूर ऍम्युचर खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने उत्कर्ष क्रीडा मंडळ व हरिभाई देवकरण प्रशालेतर्फे ही स्पर्धा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते क्रीडा संघटक श्रीकांत शरणप्पा ढेपे यांच्या गौरवार्थ आयोजित केली आहे. स्पर्धेचे उद्‌घाटन पुण्याचे शि. प्र. मंडळीचे उपाध्यक्ष श्रीकृष्ण चितळे यांच्या हस्ते झाले. 

हेही वाचा : लग्नाच्या वाढदिवशी विराटने अनुष्काला दिलं "स्पेशल गिफ्ट'! 

पोलिस अधीक्षक मनोज पाटील, सोलापूर अम्युचर खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष महेश गादेकर, अखिल भारतीय संघटनेचे सहसचिव डॉ. चंद्रजीत जाधव, राज्याचे सचिव संदीप तावडे, शाळा समिती अध्यक्ष राजेश पटवर्धन, शि.प्र.मंडळी पुणेचे सदस्य दामोधर भंडारी, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष सचिन गोडबोले, जी.एम. ग्रुपचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे, उत्कर्ष मंडळाचे कार्याध्यक्ष सुनील चव्हाण, सचिव अजित शिंदे, खजिनदार उमाकांत गायकवाड, स्वागताध्यक्ष मुख्याध्यापक पी.जी. चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. स्पर्धेसाठी रवींद्र नाशीककर, प्रमोद चुंगे, अक्षय गवळी, माणिक साळसकर, हनुमंत मोतीबने आदींनी परिश्रम घेतले. 

देशी खेळांना प्रोत्साहन 
आम्ही आमच्या संस्थेच्या माध्यमातून नेहमीच विविध देशी खेळांना प्रोत्साहन दिले. मैदानी खेळातून विद्यार्थ्यांची उर्जा वाढते. पुण्यात ज्याप्रमाणे नवमहाराष्ट्र संघ राज्यात अव्वल आहे. त्यापध्दतीने सोलापूरच्या उत्कृर्ष मंडळाला सर्वतोपरी सहकार्य करू असे आश्‍वासन श्रीकृष्ण चितळे यांनी दिले. 

Image may contain: 9 people, people smiling, people sitting, child, shoes and outdoor
सोलापूर : अजिंक्‍यपद खो-खो स्पर्धेत मुलींच्या जालना विरुद्ध उस्मानाबाद संघात झालेल्या सामन्यात जालना संघातील सदस्याला बाद करताना टिपलेले छायाचित्र. 

 

Image may contain: 4 people, including Shriniwas Dudhyal, people standing and suit
सोलापूर : अजिंक्‍यपद खो-खो स्पर्धेच्या उद्‌घाटनाप्रसंगी गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त बापू बांगर, शि. प्र. मंडळीचे उपाध्यक्ष श्रीकृष्ण चितळे, पोलिस अधीक्षक मनोज पाटील, सोलापूर अम्युचर खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष महेश गादेकर, डॉ. चंद्रजीत जाधव, संदीप तावडे, राजेश पटवर्धन, दामोधर भंडारी, सचिन गोडबोले, बाळासाहेब वाघमारे आदी. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai and Osmanabad win kho kho macha