कोल्हापूर पुन्हा झेपावले...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 एप्रिल 2018

कोल्हापूर - तब्बल सहा वर्षे खंडित झालेली मुंबई-कोल्हापूर विमानसेवा सुरू होण्यासाठी आज झालेली चाचणी यशस्वी झाली. एअर डेक्कनचे मुंबईहून आलेल्या विमानाचे दुपारी ३.०५ मिनिटांनी कोल्हापूर विमानतळावर ‘टेक ऑफ’ झाले. तत्पूर्वी अग्निशमन दलातर्फे ‘वॉटर शॉवर’ने विमानाचे स्वागत करण्यात आले. प्रत्यक्षात वीस एप्रिलपासून विमानसेवा प्रवाशांसाठी सुरू होईल; तेव्हा होणाऱ्या उद्‌घाटनास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्र्यांनाही आमंत्रित केले जाणार असल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी आज येथे दिली.

कोल्हापूर - तब्बल सहा वर्षे खंडित झालेली मुंबई-कोल्हापूर विमानसेवा सुरू होण्यासाठी आज झालेली चाचणी यशस्वी झाली. एअर डेक्कनचे मुंबईहून आलेल्या विमानाचे दुपारी ३.०५ मिनिटांनी कोल्हापूर विमानतळावर ‘टेक ऑफ’ झाले. तत्पूर्वी अग्निशमन दलातर्फे ‘वॉटर शॉवर’ने विमानाचे स्वागत करण्यात आले. प्रत्यक्षात वीस एप्रिलपासून विमानसेवा प्रवाशांसाठी सुरू होईल; तेव्हा होणाऱ्या उद्‌घाटनास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्र्यांनाही आमंत्रित केले जाणार असल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी आज येथे दिली. निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्यासह विमानतळावरील अधिकारी यावेळी उपस्थित होते.

‘तिरुपती, बंगळूर विमानसेवा जूनपासून’
केंद्र शासनाच्या ‘उडाण’ योजनेतून विमानसेवा सुरू झाली आहे. विमानतळाच्या विस्तारीकरणातील २७४ कोटींपैकी मुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांनी ५४ कोटी रुपये राज्याचा हिस्सा देण्याचे मान्य केले आहे. याच योजनेचा दुसरा टप्पा साधारण जूनमध्ये सुरू होईल; तेव्हा तिरुपती, बंगळूर आणि हैदराबाद येथेही विमानसेवा सुरू होईल, असा विश्‍वास खासदार धनंजय महाडिक यांनी आज व्यक्त केला.

दरम्‍यान, अस्सल कोल्हापुरी पद्धतीने भगवा फेटा बांधून वैमानिकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना गुच्छ देताना श्री. महाडिक म्हणाले, ‘‘निवडणुका वर्षभरावर आल्या, तरीही विमानसेवा सुरू होत नव्हती. आजही विमान लॅण्डिंग होते की नाही, याचीही चिंता लागून राहिली होती. प्रत्यक्षात ते लॅण्ड झाल्यावर आनंद झाला. ‘विमान अजून कुठं घिरट्या घालतंय..’

अशा शब्दांत राजकारणात आमच्यावर टीका सुरू होती. आता आठवड्यातून तीन दिवस विमानसेवा सुरू राहील. विमान १८ सीटर असून, पैकी पहिल्या नऊ तिकिटांचा दर प्रत्येकी १९०० रुपये असेल. उर्वरित तिकिटे साडेतीन हजार रुपयांपर्यंतची असतील. दुपारी पावणेतीन वाजता विमान लॅण्ड होईल, तर सव्वातीन वाजता त्याचे ‘टेक ऑफ’ होईल. मुंबई-कोल्हापूर विमानसेवा पुन्हा खंडित होणार नाही, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. लवकरच विस्तारीकरणाचेही काम गतीने सुरू होईल, असा विश्‍वास आहे.’’

या ना त्या कारणाने मुंबई-कोल्हापूर विमानसेवा २०११ पासून खंडित झाली होती. यानंतर खासदार धनंजय महाडिक यांनी विशेष प्रयत्न केले. २७४ कोटींचा विकास आराखडाही तयार झाला आहे. त्याचेही काम लवकरच सुरू होईल. कुंपणभिंतीचे काम ६५ टक्के पूर्ण झाल्याची माहिती येथे पश्‍चिम विभागाचे अधिकारी एस. के. व्यवहारे यांनी वैमानिकांच्या स्वागत समारंभात दिली. निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी विमानसेवा सुरू झाल्यामुळे कोल्हापूरच्या विकासाला आणि पर्यटनाला चालना मिळणार असल्याचे सांगितले. भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे राजेश अय्यर, पश्‍चिम विभागाचे व्यवस्थापक एस. के. व्यवहारे, कोल्हापूर विमानतळाच्या पूजा मूल हे उपस्थित होते. वैमानिक कॅप्टन ॲन्ट्री व्ही. आणि फेस्ट ऑफिसर नवीन के. आणि कॅबिन क्रु उमा पांडे मुंबईहून विमानातून कोल्हापुरात आले. त्यांच्या स्वागतासाठी विमानतळाच्या इमारतीला फुले, फुलांच्या माळांनी सजविले होते. रांगोळ्यांनीही त्यांचे स्वागत केले.

सहा महिन्यांची तिकिटे बुक
पुढील सहा महिन्यांत विमानसेवा खंडित होऊ नये, याची काळजी आम्ही घेतली आहे. पुढील सहा महिन्यांची तिकिटे मी बुक केली आहेत. त्यामुळे एअर डेक्कनने प्रवासी नाहीत म्हणून विमानसेवा बंद करू नये, अशी मागणी खासदार महाडिक यांनी वैमानिकांकडे केली. याच वेळी ही माहिती तुमच्या वरिष्ठांपर्यंत पोचवा, मीही बोलतो असेही आवर्जून सांगितले.

कोल्हापूर ते मुंबई विमानसेवेबाबत दिलेल्या वचनाची पूर्ती आज झाली. ही विमानसेवा वीस वा बावीस एप्रिलपासून सुरू होईल आणि जिल्ह्याच्या विकासाला नवी चालना मिळेल. कोल्हापूर विमानसेवा सहा वर्षांपासून बंद करून गेल्या सरकारने जिल्ह्याच्या विकासाला खो घालण्याचे काम केले. भाजप सरकारने येथील रेल्वे स्थानकाला राजर्षी शाहू महाराजांचे नाव दिले. आता विमानतळाचे ‘छत्रपती राजाराम महाराज विमानतळ’ असे नामकरण करण्याचा ठराव केला आहे. 
-चंद्रकांत पाटील, पालकमंत्री

Web Title: mumbai kolhapur plane service start