कृषीपंपांना बारा तास वीजपुरवठा 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 24 ऑगस्ट 2017

मुंबई - राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुरेशा पावसाअभावी पिके करपण्याची शक्‍यता लक्षात घेता कृषीपंपांना सध्याच्या आठ तासांऐवजी 12 तास वीजपुरवठा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाने घेतला. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी संबंधित जिल्ह्यांमध्ये पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. या निर्णयामुळे पिकांना जीवदान मिळण्याची शक्‍यता असून; शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. 

नाशिक, नगर, जळगाव, भुसावळ, उस्मानाबाद, भंडारा, धुळे या जिल्ह्यांसह अनेक महसूल मंडलांमध्ये 75 टक्‍क्‍यांपेक्षा कमी पाऊस झाला असून 90 टक्के क्षेत्रात पेरणी झाली आहे. जवळपास 19 तालुक्‍यांमध्ये पर्जन्यमान कमी झाल्यामुळे कृषीपंपांना 12 तास वीजपुरवठा करण्याची गरज असल्याचे आढळून आले आहे. याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करण्यात आला होता. ज्या तालुक्‍यांमध्ये 25 टक्‍क्‍यांपेक्षा कमी पाऊस पडला आहे आणि चार आठवड्यांपेक्षा अधिक काळ पावसाचा खंड असलेल्या तालुक्‍यांमध्ये आठऐवजी 12 तास वीजपुरवठा करण्यात यावा. हा पुरवठा करताना अधिक उपशामुळे पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू नये, जमिनीतील पाण्याचा स्तर अधिक खाली जाऊ नये; याची काळजी घेण्यात यावी, असे निर्देशही देण्यात आले आहेत. ज्या ठिकाणी उपसा सिंचन योजना बंद पडली आहे तेथून पिकांना पाणीपुरवठा करण्यासाठीही 12 तास वीजपुरवठा करणे आवश्‍यक आहे, असे त्यात नमूद करण्यात आले आहे. 

पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेली समिती पर्जन्यमान, पीकपरिस्थिती व कृषी विभागाचे अभिप्राय लक्षात घेऊन शासनाच्या निकषांनुसार कृषीपंपांना बारा तास वीजपुरवठ्याचे आदेश महावितरणला देईल; तसेच अतिरिक्त वीजपुरवठा करण्यासाठी आवश्‍यक त्या परवानगीसाठी महावितरण वीज नियामक आयोगाकडे प्रस्ताव सादर करेल. कृषीपंपांना 12 तास वीजपुरवठा करत असताना प्रत्यक्ष उपलब्ध विजेची नोंद घेऊन महावितरण शासनाकडे अनुदानाची मागणी करेल. या वीजपुरवठ्यात मोबाईल ऍपचा उपयोग करण्यात येईल. यासाठी वरिष्ठ पातळीवर स्वतंत्र अधिकारी नियुक्त करण्यात येणार आहे. 

कृषीपंपांना वीजपुरवठ्यासाठी 
- पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती 
- 19 तालुक्‍यांना होणार फायदा 
- 25 टक्‍क्‍यांपेक्षा कमी पावसाचा निकष 

Web Title: mumbai news mseb Agricultural pumps