उल्हासनगरात गांज्याचे रॅकेट चालवणाऱ्या बहीण-भावाला बेड्या

दिनेश पवार
रविवार, 27 ऑगस्ट 2017

सव्वातीन लाखाचा गांजा जप्त

उल्हासनगर : संपूर्ण उल्हासनगरच्या विविध परिसरात गांज्या विक्री करून गांज्याचे रॅकेट चालवणाऱ्या भाऊ बहिणीला मध्यवर्ती पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्या कडून सव्वा तीन लाख रुपयांचा तीन किलोच्या वर गांज्या जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

अल्ताफ रशीद शेख आणि हिना स्वप्नील असे या भाऊ बहिणीचे नाव असून ते विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशनच्या पश्चिमेला असणाऱ्या झोपडपट्टीमध्ये पटरीजवळ राहतात. हे भाऊ बहीण गांज्याचे रॅकेट चालवत असल्याची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त अंकित गोयल यांच्या आदेशानुन्वये वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय डोळस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक घनश्याम पलंगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक व्ही. बी. अहिरे, उपनिरीक्षक दिनेश पाटील, विलास सानप, गोरक्षनाथ आव्हाड, हेड कॉन्स्टेबल आर. आर. कुकले, अरुण मिसाळ, ढेपणे यांनी आज दुपारी छापा टाकला. त्यांच्या घरात तब्बल सव्वा तीन लाख रुपयांचा तीन किलोच्या वर गांज्याचा साठा मिळून येताच पोलिसांनी अल्ताफ शेख, हिना सोनवणे या भाऊ बहिणीला बेड्या ठोकल्या.

उल्हासनगरातील 8 जणांना गांज्याचा पुरवठा विक्रीसाठी केला जातो. अशी खळबळजनक कबुली या भाऊ बहिणीने पोलिसांना दिल्याने या 8 जणांचे अटकसत्र सुरू करण्यात येणार असल्याची माहिती उपनिरीक्षक दिनेश पाटील यांनी दिली. यासोबतच गांज्या कुठून आणला जात होता, कोण पुरवठा करत होते याची देखील चौकशी केली जाणार आहे.

"8 सराईत गुन्हेगार तडीपार"
दरम्यान सध्या  सुरू असलेला गणेशोत्सव सण आणि 2 सप्टेंबर रोजी येणारी बकरी ईद गृहीत धरून पोलीस उपायुक्त अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली उल्हासनगरातील 8 सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे.

गांजा विक्रेते सैय्यद शेख, अशोक रोकडे यांच्या सह 8 गुन्हेगारांना दोन वर्षासाठी ठाणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. याशिवाय परिमंडळात गणेशोत्सव, बकरी ईद च्या कालावधीत शांतता राहावी, तसेच कोणतीही अघटित घटना घडू यासाठी 183 गुंड प्रवृत्तीच्या समाजकंटकांना उल्हासनगरात प्रवेशाची बंदी करण्यात आली आहे.

Web Title: mumbai news ulhasnagar ganja racket unfolded