यंत्रमाग कामगारांच्या किमान वेतनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुंडण आंदोलन 

प्रमोद बोडके
बुधवार, 18 जुलै 2018

सोलापूर शहर व परिसरातील यंत्रमाग कामगारांना किमान वेतन किंवा वेतनवाढ द्यावी या मागणीसाठी सोलापूर जिल्हा यंत्रमाग कामगार संघटना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यावतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुंडण करून पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले.

सोलापूर : सोलापूर शहर व परिसरातील यंत्रमाग कामगारांना जुलैपासून वेतनवाढ किंवा किमानवेतन देण्याचा निर्णय जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत झाला होता. अद्यापही या निर्णयाची अंमलबजावणी न झाल्याने सोलापूर जिल्हा यंत्रमाग कामगार संघटना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यावतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुंडण करून आंदोलन करण्यात आले. 

जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होऊन देखील कामगारांचा प्रश्‍न सोडविण्यात प्रशासनाला अपयश आले आहे. कारखानदार व प्रशासन यांच्यात संगनमत झाले असल्याचा आरोपही यावेळी पदाधिकाऱ्यांनी केला. सोलापूरचे सहाय्यक कामगार आयुक्त यंत्रमाग कामगारांच्या प्रश्‍नांबद्दल जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. 

सहाय्यक कामगार आयुक्तांनी दाखविलेल्या दिरंगाईमुळे कारखानदारांनी पळवाटा शोधल्या आहेत. दिरंगाई करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना तत्काळ बडतर्फ करावे. कामगारांच्या मागण्या मान्य न झाल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. यावेळी कार्याध्यक्ष श्रीधर गुडेली, खजिनदार नागेश केदारी, नागेश वडनाल, रवी चिंचोरे, मोहन गणपा यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कामगार उपस्थित होते. 
 

Web Title: Mundan agitation in front of the Solapur Collector Office of Textile workers