पोटभाडेकरूंमुळे सोलापुरातील गाळेधारकांना 'अच्छे दिन"

विजयकुमार सोनवणे
मंगळवार, 3 जुलै 2018

गाळ्याच्या भाड्यापोटी महापालिकेस 220 ते 250 रुपये दरमहा भरणारे गाळेधारक पोटभाडेकरूकडून एक हजार 500 ते तीन हजार 500रुपयांपर्यंत भाडे घेतात. एकेका व्यक्तीच्या नावाने एकापेक्षा जास्त गाळे आहेत. काही गाळेधारकांनी फक्त जागा घेऊन, त्यावर स्वतः बांधकाम केले आहे. त्यामुळे ते पालिकेस फक्त जागेचे भाडे भरतात. बांधकाम त्यांनी केले असल्याने भाडे ते ठरवतील त्या प्रमाणे पोटभाडेकरूंना द्यावे लागते. त्यामुळे सध्या तरी गाळेधारकांची चंगळ सुरू आहे. 

सोलापूर : महापालिकेच्या गाळ्यांमधील पोटभाडेकरूंमुळे मूळ गाळेधारकांना "अच्छे दिन' आले असून, गेल्या अनेक वर्षांपासून ते मालामाल झाले आहेत.

 महापालिकेकडे नोंद असलेल्या 353 पैकी 70 ठिकाणच्या मालमत्तेमध्ये पोटभाडेकरू आहेत. बहुतांश ठिकाणच्या पोटभाडेकरूंची संख्या ही किमान 15 ते 20 इतकी आहे. महापालिकेला किरकोळ भाडे भरतानाच, कब्जा असलेला गाळेधारकाच्या घरी मात्र अनेक वर्षांपासून लक्ष्मी पाणी भरत आहे. 

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागांची विक्री किंवा भाड्याने देताना ई लिलाव पद्धतीचा वापर करावा, असा निर्णय राज्य शासनाने नुकताच घेतला आहे. तसेच गाळेधारकांना मुदतवाढ देण्यासंदर्भात महापालिका सभेने केलेला ठराव शासनाने फेटाळून लावला आहे. त्यामुळे महापालिका हद्दीतील गाळे तसेच दिलेल्या मोकळ्या जागांचा विषय चर्चेला आला आहे. पालिकेकडे नोंद असलेल्या यादीनुसार अनेक ठिकाणी जागेची खिरापत वाटण्यात आली आहे. 

शहरातील सामाजिक संस्था, कार्यकर्ते, धार्मिक स्थळांना पालिकेच्या जागा देण्यात आल्या आहेत. त्यांचे भाडे अत्यल्प आहे. बहुतांश गाळ्यांची मुदत संपली आहे. तरीसुद्धा आजही ते गाळे संबंधित व्यक्तीच्याच नावाने आहेत. अत्यल्प भाड्यामुळे महापालिकेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. सध्याच्या बाजारभावाने या गाळ्यांना भाडे घेतले तर पालिकेच्या तिजोरीत दरमहा कोट्यवधी रुपयांची भर पडणार आहे. अतिशय अत्यल्प असलेले भाडेही हे गाळेधारक भरतात की नाही याबाबतही साशंकता आहे. 

गाळ्याच्या भाड्यापोटी महापालिकेस 220 ते 250 रुपये दरमहा भरणारे गाळेधारक पोटभाडेकरूकडून एक हजार 500 ते तीन हजार 500रुपयांपर्यंत भाडे घेतात. एकेका व्यक्तीच्या नावाने एकापेक्षा जास्त गाळे आहेत. काही गाळेधारकांनी फक्त जागा घेऊन, त्यावर स्वतः बांधकाम केले आहे. त्यामुळे ते पालिकेस फक्त जागेचे भाडे भरतात. बांधकाम त्यांनी केले असल्याने भाडे ते ठरवतील त्या प्रमाणे पोटभाडेकरूंना द्यावे लागते. त्यामुळे सध्या तरी गाळेधारकांची चंगळ सुरू आहे. 

महापालिकेच्या गाळ्यांची संख्या 
(स्त्रोत ः भूमी व मालमत्ता विभाग) 
स्वरूप ठिकाणे संख्या 
मेजर गाळे ः 18 574 
मिनी गाळे ः 37 772 
एकूण ः 55 1346

Web Title: municipal corporation shops in Solapur