सोलापूर महापालिकेत कामगारांचे कामबंद आंदोलन 

विजयकुमार सोनवणे
मंगळवार, 3 एप्रिल 2018

महापौर शोभा बनशेट्टी यांनी आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांचा 'मस्तवाल, अहंकारी, हेकेखोर' म्हणून उल्लेख केला होता. त्याचा निषेध म्हणून महापालिकेतील कामगार संघटनेने आज काम बंद आंदोलन केले.

सोलापूर - अच्छे दिन..अच्छे दिन लायेंगे म्हणत महापालिकेत सत्तेवर आलेल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांमुळे सोलापूरकरांसह कर्मचारीही हैराण झाले आहेत. त्यामुळे 'कोई लौटा दो हमे बीते हुए दिन....' म्हणण्याची वेळ आली आहे, असा टोला कामगार नेते अशोक जानराव यांनी लगावला. 

महापौर शोभा बनशेट्टी यांनी आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांचा 'मस्तवाल, अहंकारी, हेकेखोर' म्हणून उल्लेख केला होता. त्याचा निषेध म्हणून महापालिकेतील कामगार संघटनेने आज काम बंद आंदोलन केले. कौन्सिल हॉलजवळ जमलेल्या कर्मचाऱ्यांसमोर श्री जानराव यांनी महापौरांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, तुमच्या पक्षातील भांडणाचा त्रास जनतेला तर होत आहेच, आता अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही होऊ लागला आहे. उच्चपदस्थ असलेल्या आयुक्तांना असंसदीय भाषेत बोलणे हे महापौरपदाला शोभणारे नाही. त्याबाबत आम्ही महापौरांना माफी मागा म्हणणार नाही, कारण माफी मागितली तरी काही होणार नाही. त्याऐवजी महापालिकेत सहकारमंत्री आणि पालकमंत्री गटामध्ये सुरु असलेल्या वादात लक्ष घालण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना महापौरांनी करावी, असे साकडे घालणार आहोत. भाजप सत्तेवर आल्यावर सोलापूरकरांना अच्छे दिन येतील अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात काहीच झाले नाही. मागच्या सत्ताधाऱ्यांच्या कालावधीत कामगारांच्या मागण्या मान्य होत होत्या, गेल्या वर्षभरात एकही मागणी मान्य झाली नाही. त्यामुळे 'कोई लौटा दो हमे बीते हुए दिन...' म्हणण्याची वेळ आली आहे. केवळ आयुक्तच नव्हे तर कोणत्याही वरिष्ठ आणि कनिष्ठ कर्मचाऱ्यालाही कुणी पदाधिकाऱ्याने अरेरावीने बोलल्यास ते खपवून घेतले जाणार नाही, असा इशाराही जानराव यांनी दिला. 

कामकाजावर परिणाम 
काम बंद आंदोलनात कर्मचारी सहभागी झाल्यामुळे सकाळच्या सत्रातील कामकाज ठप्प झाले होते. आंदोलनकर्त्यांनी महापौरांशीही चर्चा केली व भविष्यात असे वक्तव्य करू नये, अशी विनंती केली.

Web Title: Municipal Corporations Workers Movement in Solapur