पाच पालिकांचे सांडपाणी आजही नद्यांत!

सचिन देशमुख
मंगळवार, 22 मे 2018

कऱ्हाड - वाढत्या नागरीकरणाबरोबरच जिल्ह्यातील पालिकांपुढे सांडपाण्याचा प्रश्‍न गंभीर बनत आहे. प्रक्रियेविना नद्यांमध्ये मिसळणाऱ्या सांडपाण्यामुळे आरोग्याचा प्रश्‍न गंभीर होण्याची चिन्हे आहेत. जिल्ह्यात आठपैकी केवळ तीन पालिका व एकमेव मलकापूर नगरपंचायतीचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित आहे. या शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया होवून त्या पाण्याचा वापर शेती, बागेसाठी होत आहे. उर्वरित पालिकांच्या ठिकाणी सांडपाण्याचा प्रश्‍न ‘रामभरोसे’च असल्याची स्थिती आहे.  

कऱ्हाड - वाढत्या नागरीकरणाबरोबरच जिल्ह्यातील पालिकांपुढे सांडपाण्याचा प्रश्‍न गंभीर बनत आहे. प्रक्रियेविना नद्यांमध्ये मिसळणाऱ्या सांडपाण्यामुळे आरोग्याचा प्रश्‍न गंभीर होण्याची चिन्हे आहेत. जिल्ह्यात आठपैकी केवळ तीन पालिका व एकमेव मलकापूर नगरपंचायतीचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित आहे. या शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया होवून त्या पाण्याचा वापर शेती, बागेसाठी होत आहे. उर्वरित पालिकांच्या ठिकाणी सांडपाण्याचा प्रश्‍न ‘रामभरोसे’च असल्याची स्थिती आहे.  

नदीपात्रात सांडपाणी मिसळण्यामुळे अनेक शहरांमध्ये आरोग्याचा प्रश्‍न निर्माण होत आहे. वाढत्या नागरीकरणामुळे सांडपाण्यावर प्रक्रिया केल्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही. जिल्ह्यात आठ पालिका असून, त्यातील महाबळेश्वर, पाचगणी, वाई, सातारा, कऱ्हाड पालिका कृष्णा नदीकाठी आहेत. त्यामुळे या पालिकांचे सांडपाणी थेट नदीपात्रात जाणे परवडणारे नाही. 

मात्र, यातील पाचगणी, महाबळेश्वर व कऱ्हाड या पालिकांचे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प मार्गी लागले असून, ते कार्यान्वितही झाले आहेत. शिवाय कऱ्हाडलगतची जिल्ह्यातील पहिली नगरपंचायत असलेल्या मलकापूरनेही सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित केला आहे. यात कऱ्हाड पालिकेचा प्रकल्प १२. ५ एमएलडी क्षमतेचा असून, सांडपाणी प्रक्रियेनंतर पाण्याचा वापर शेतीसाठी केला जातो. मलकापूर नगरपंचायतीचे दोन प्रकल्प असून, एक पाच एमएलडी व दुसरा तीन एमएलडी क्षमतेचा आहे. 

या प्रकल्पातूनही प्रक्रियेनंतरचे पाणी शेतीसाठी वापरले जात आहे. महाबळेश्वर पालिकेचे दोन सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प असून, एक चार व दुसरा एक एमएलडी क्षमतेचा आहे. पाचगणी पालिकेचे तीन प्रकल्प आहेत. त्यात एक .६५ एमएलडी, दुसरा .३५ एमएलडी व तिसरा १.५ एमएलडी क्षमतेचा आहे. महाबळेश्वर व पाचगणी पालिकांच्या प्रकल्पातील सांडपाण्यावर प्रक्रिया केल्यावर त्या पाण्याचा वापर उद्यानासाठी केला जात 
आहे.  

सातारा, म्हसवड, फलटण, रहिमतपूर व वाई पालिकांचे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प अद्याप झालेले नाहीत. यातील काही पालिकांच्या प्रकल्पांचे प्रस्ताव शासनस्तरावर आहेत. फलटण पालिकेचा प्रकल्प मंजूर होवून पुढील कार्यवाही सुरू आहे. त्यात कृष्णा नदीचे प्रदूषण रोखण्याच्यादृष्टीने प्रामुख्याने वाई व सातारा पालिकांचे प्रकल्प मार्गी लागून ते कार्यान्वित होणे गरजेचे आहे. त्यामुळे नदीपात्रात मिसळणाऱ्या सांडपाण्याला आळा बसण्यास मदत होणार आहे.

‘प्रदूषण नियंत्रण’चे लक्ष...
जिल्ह्यातील नदी प्रदूषणाबाबत राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सातारा कार्यालय सातत्याने सतर्क राहिले आहे. अनेक पालिकांचे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प मार्गी लागण्यामध्ये या कार्यालयाकडून दिल्या जाणाऱ्या कारवाईच्या इशाऱ्याचा महत्त्वाचा भाग आहे. नदीपात्रात सांडपाणी सोडल्याप्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळाने कठोर भूमिका घेत यापूर्वी सातारा, वाई, कऱ्हाड व मलकापूरच्या नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांविरोधात न्यायालयात दावाही दाखल केला होता. त्यामुळे पालिकांची धावपळ उडाली. दरम्यान, नदीपात्राचे प्रदूषण रोखण्यासाठी पालिकांबरोबरच नदीकाठच्या भुईज, कोरेगाव, उंब्रज, सैदापूर, रेठरे बुद्रुक आदी मोठ्या गावांनीही सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याची आवश्‍यकता आहे. त्यासाठी शासनाने पुढाकार घेणे गरजेचे आहे.   

Web Title: municipal dranage water process project