भाजपच्या मुलाखती वाजत-गाजत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 जुलै 2018

सांगली - महापालिका निवडणुकीत विजयाचा दावा करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार मुलाखतीस प्रचंड प्रतिसाद मिळाला. ढोल-ताशांचा गजर, हलगीच्या कडकडाटात, फटाक्‍यांची आतषबाजी आणि जोरदार घोषणाबाजी करीत इच्छुकांनी शक्तिप्रदर्शनाने उमेदवारीची मागणी केली. भाजप शिस्तबद्ध पक्ष असला, तरी इच्छुकांनी काँग्रेस-राष्ट्रवादी स्टाईलने घोषणाबाजी करीत उमेदवारी मागितल्याचे चित्र दिसले.

सांगली - महापालिका निवडणुकीत विजयाचा दावा करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार मुलाखतीस प्रचंड प्रतिसाद मिळाला. ढोल-ताशांचा गजर, हलगीच्या कडकडाटात, फटाक्‍यांची आतषबाजी आणि जोरदार घोषणाबाजी करीत इच्छुकांनी शक्तिप्रदर्शनाने उमेदवारीची मागणी केली. भाजप शिस्तबद्ध पक्ष असला, तरी इच्छुकांनी काँग्रेस-राष्ट्रवादी स्टाईलने घोषणाबाजी करीत उमेदवारी मागितल्याचे चित्र दिसले.

सांगली-मिरज रस्त्यावरील कच्छी जैन भवनात आज सकाळी भाजपतर्फे दहा प्रभागांतील इच्छुकांच्या मुलाखतीस प्रारंभ झाला. खासदार संजय पाटील, आमदार सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ, निरीक्षक रवी अनासपुरे, पंढरपूर देवस्थान समितीचे अध्यक्ष अतुल भोसले, भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, माजी उपमहापौर शेखर इनामदार, माजी आमदार दिनकर पाटील, दीपक शिंदे, प्रकाश बिरजे, नीता केळकर, मकरंद देशपांडे, दिलीप सूर्यवंशी, शरद नलवडे आदी उपस्थित होते.

प्रभागनिहाय मुलाखतीस प्रारंभ झाला. इच्छुकांची ध्वनिक्षेपकावर ओळख करून देत त्यांना बोलण्याची संधी देण्यात आली. इच्छुकांनी प्रभागात केलेल्या विविध कामांचा हवाला देत उमेदवारीची मागणी केली. तिकीट द्या, निवडून येण्याची गॅरंटी देतो. भाजपमध्ये आजवर प्रामाणिकपणे काम केल्याचे सांगून उमेदवारी देण्याची विनंती काहींनी केली. काहींनी आजपर्यंत पक्षात काम करूनही डावलले जात असल्याची तक्रार करीत न्याय देण्याची मागणी केली. उमेदवारांच्या भाषणानंतर समर्थक त्यांच्या नावाच्या जोरदार घोषणा सभागृहात देत होते. त्यामुळे मुलाखतीत अनेकदा व्यत्यय येत होता.

महिला उमेदवार, कार्यकर्त्यांची संख्याही मोठी होती. तेव्हा घोषणाबाजी बंद करण्याची विनंती करावी लागली. पक्षाचे मफलर, टोप्या, झेंडे घेऊन इच्छुकांनी शक्तिप्रदर्शन केले. दुचाकीच्या पुंगळ्या काढूनही जोरदार आवाज करीत कार्यकर्ते फेऱ्या मारत होते. एका उमेदवाराने बैलगाडीतून कार्यकर्ते आणून उमेदवारी मागितली. शिस्तबद्ध पक्ष अशी ओळख असलेल्या पक्षाकडे उमेदवारी अर्ज मागताना अनेकांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस स्टाईलने शक्तिप्रदर्शन केल्याचे चित्र दिसले. सायंकाळपर्यंत प्रभाग क्रमांक ९, १०, ११, १२, १३, १४, १५, १६, १७, १८ या दहा प्रभागांतील इच्छुकांच्या मुलाखती पूर्ण झाल्या.

...लाठ्याकाठ्यांची पावती द्या
प्रभाग १४ मधून हणमंतराव पवार यांनी उमेदवारी मागताना आजवर केलेल्या आंदोलनाची आठवण करून प्रसंगी लाठ्याकाठ्या खाल्ल्या, अशी आठवण करून दिली. आजवर डावलले गेले, आतातरी कामाची पोचपावती म्हणून उमेदवारी द्या, अशी विनंती त्यांनी केली.

गर्दीने रस्ता फुलला
भाजपच्या मुलाखतीसाठी एकाचवेळी गर्दी होऊ नये म्हणून प्रत्येक प्रभागातील इच्छुकांना ठराविक वेळ दिली होती. तरीही इच्छुक, त्यांचे समर्थक कार्यकर्ते, महिला कार्यकर्त्या यामुळे कच्छी जैनभवनसमोरील परिसर गर्दीने फुलला होता. मोटारी, दुचाकी, बैलगाड्या, मोटारसायकलींची गर्दी होती.

मुस्लिम उमेदवार अन्‌ गर्दीही
प्रभाग १६ मधील इच्छुक उमेदवार इकलास बारगीर आणि समर्थक मोठ्या संख्येने उमेदवारी मागण्यासाठी उपस्थित होते. इतर प्रभागातील इच्छुकांबरोबर अनेक मुस्लिम कार्यकर्ते, महिला आल्या होत्या.

Web Title: Municipal election BJP Interview Politics