महापालिका निवडणूक प्रचाराचे धूमशान

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 फेब्रुवारी 2017

भाजपचे मंत्री प्रचारासाठी रस्त्यावर

महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी आता शिगेला पोचली आहे. भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मंत्री रस्त्यावर उतरले आहेत. चक्क पदयात्रा काढत आहेत. 

भाजपचे मंत्री प्रचारासाठी रस्त्यावर

महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी आता शिगेला पोचली आहे. भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मंत्री रस्त्यावर उतरले आहेत. चक्क पदयात्रा काढत आहेत. 

सोलापुरात भाजपचे दोन मंत्री आहेत. पालकमंत्री विजयकुमार देशमुख व सहकारमंत्री सुभाष देशमुख हे त्यांच्यावर जबाबदारी दिलेल्या प्रभागांत फिरत आहेत. मात्र, सोलापूर शहर म्हणूनही त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी बैठका, सभा घेण्यावर भर दिला आहे. या दोन मंत्र्यांबरोबरच राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले हेही बुधवारी सोलापूरला येऊन गेले. प्रभाग क्रमांक १५, १२, १७ या ठिकाणी बडोले यांनी पदयात्रा, बैठका, प्रचार कार्यालयाचे उद्‌घाटन, सभा यासारखे कार्यक्रम हाती घेतले होते. त्यामुळे शहरातील दोन मंत्र्यांवरच अवलंबून न राहता पक्षाने राज्यातील इतर मंत्र्यांनाही निवडणुकीच्या रणांगणात उतरविले आहे. श्री. बडोले यांनी काल मतदारांच्या गाठीभेटीही घेतल्या. पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यावर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी असल्याने ते त्या भागात येणाऱ्या प्रभागांमध्ये फिरत आहेत. सहकारमंत्री देशमुख दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात प्रचारासाठी फिरत आहेत. खासदार शरद बनसोडे मध्य विधानसभा मतदारसंघात बैठका घेत आहेत. याशिवाय केंद्र व राज्यातील नेतेमंडळी उमेदवारांच्या प्रचारासाठी वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेत आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांची सभा नुकतीच झाली.

पालकमंत्री-सहकारमंत्री एकत्र
एकमेकांपासून दूर असलेले सहकारमंत्री सुभाष देशमुख व पालकमंत्री विजयकुमार देशमुख पक्ष उमेदवारांच्या प्रचारासाठी एकाच व्यासपीठावर येऊ लागले आहेत. बुधवारी देगाव येथे झालेल्या सभेत हे दोन्ही देशमुख एकाच व्यासपीठावर होते. दोन्ही देशमुख एकत्र आल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवा जोश निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.

पदयात्रा, कोपरा सभा आणि मेळाव्यांचे आयोजन
पदयात्रा, कोपरा सभा आणि मेळाव्यांचे आयोजन करण्यासह घरोघरी भेटी देऊन प्रत्यक्ष मतदारांना आवाहन करण्याचे नियोजन काँग्रेसच्या उमेदवारांनी केले आहे. गुरुवारी सकाळी विविध भागांतील उमेदवारांनी पदयात्रा काढून आपला प्रचार केला. 

प्रभाग एकमधील प्रशांत कांबळे, मीनाक्षी निशाणदार, लता गादेकर व सिद्धेश्‍वर मुनाळे यांनी पदयात्रा काढली. घरोघरी जाऊन मतदारांना भेटून काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन केले. सायंकाळी गोविंदश्री मंगल कार्यालयाजवळ माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या सभेचे आयोजन केले होते. मात्र ही सभा ऐनवेळी रद्द करण्यात आली. प्रभाग १५ मध्ये काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी ज्येष्ठ नेत्या उज्ज्वला शिंदे यांच्या उपस्थितीत महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी उमेदवार चेतन नरोटे, वैष्णवी करगुळे, विनोद भोसले व श्रीदेवी फुलारे उपस्थित होत्या. 

प्रभाग दोनमधील उमेदवार अविनाश बनसोडे, सोनाली लाड, रोहिणी सावंत, केदार उंबरजे यांनीही पदयात्रांवर भर दिला आहे. प्रभाग १६ मधील संजय हेमगड्डी, नरसिंग कोळी, जयश्री शिंदे, फिरदोस पटेल यांनीही पदयात्रांवर भर दिला असून, कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचेही आयोजन त्यांनी केले होते. सायंकाळी सहानंतर प्रभागातील विविध भागांमध्ये कोपरा सभांचे आयोजन करण्यात येत आहे. एकूणच, उमेदवार आपल्या प्रचारासाठी मतदार भेटीवर भर देत आहेत.

नेत्यांअभावी स्थानिकांचा मेळ लागेना
सोलापूर महापालिका निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला तरीही राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही स्टार प्रचारक, माजी मंत्री अथवा आमदार सोलापुरातील उमेदवारांच्या प्रचारासाठी अद्यापही आलेले नाहीत. राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस निर्मला बावीकर यांनी सोलापुरात येऊन पदयात्रा काढली. प्रदेशचे सरचिटणीस बसवराज पाटील हे उद्या (शुक्रवार) सोलापुरात सभेसाठी येत आहेत. राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांचा १८ फेब्रुवारीला सोलापूर दौरा निश्‍चित झाला आहे. राज्याचे नेते सोलापूरकडे फिरकत तर नाहीतच शिवाय सोलापुरातील माजी अध्यक्ष, माजी उपमहापौर, माजी गटनेते, माजी सभापती यांचाही मेळ होताना दिसत नाही. प्रत्येक पदाधिकाऱ्याला आपल्या कार्यकर्त्यांची, नातलगांची काळजी लागलेली दिसत आहे. 

निरीक्षक प्रदीप गारटकर हे काही प्रभागांत प्रचारासाठी फिरले आहेत. शहराध्यक्ष भारत जाधव यांनीही पाच ते सहा प्रभागांमध्ये आपल्या पद्धतीने उमेदवारांचा प्रचार केला आहे. त्यांच्या जोडीला माजी अध्यक्ष शंकर पाटील, परिवहन सभापती राजन जाधव, राष्ट्रवादी युवकचे माजी जिल्हाध्यक्ष संतोष पवार, प्रमोद भोसले, दिनेश शिंदे हे काही भागांत प्रचारासाठी फिरत आहेत. सोलापूर शहरातील सर्वच स्थानिक नेत्यांची मोट बांधून प्रचाराचा जो झंझावात निर्माण करायला हवा होता, तो निर्माण करण्यात पर्यायाने ‘हम सब एक है’चा विश्‍वास देण्यात राष्ट्रवादीचे स्थानिक नेते कमी पडले आहेत. उमेदवारांनी मात्र नेत्यांच्या भरवशावर न बसता आपल्या पद्धतीने प्रभागात होम टू होम प्रचार, वाहनांच्या माध्यमातून प्रचार, कॉर्नर बैठका, पदयात्रांवर अधिक भर दिला आहे. सकाळी लवकर पदयात्रा व सायंकाळी ते रात्रीपर्यंत कॉर्नर बैठका घेतल्या जातात. 

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापूरसाठी वेळ देण्याचे मान्य केले आहे. त्यानुसार शेवटच्या टप्प्यात अजित पवार यांची सभा होण्याची शक्‍यता आहे. एक ते दोन दिवसांमध्ये त्यांच्या सभेचे ठिकाण, वेळ व तारीख निश्‍चित होईल. 
- भारत जाधव, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

स्थानिक पातळीवर प्रचार यंत्रणा सुरू
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निवडणूक आयोगाला पाठविलेल्या ४० स्टार प्रचारक यादीतील एकाही नेत्याने सोलापूरला भेट दिली नाही. अपवाद जिल्हा संपर्कप्रमुख बाबा जाधवराव यांचा. विशेष म्हणजे, नेत्यांना सोलापुरात आणण्यात स्थानिक पदाधिकाऱ्यांनाही अपयश आले आहे. तरीही स्थानिक नेतृत्वावर प्रचार यंत्रणा कामाला लागली आहे. सभेचे नियोजन होत नसल्याने स्थानिक पदाधिकाऱ्यांनी होम टू होम प्रचारावर भर दिला आहे.  जिल्हा संपर्कप्रमुख बाबा जाधवराव यांचाही स्टार प्रचारकांमध्ये समावेश असून ते पदाधिकाऱ्यांच्या हाकेला साद देऊन सोलापुरात येत होते. मात्र, त्यांच्यावरही मुंबई, पुणे येथील जबाबदारी वाढल्याने त्यांनी सोलापुरातून काढता पाय घेतला आहे. थोडक्‍यात श्रेष्ठी, वरिष्ठ नेत्यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांना वाऱ्यावर सोडले असले तरी स्थानिक पदाधिकारी हिम्मत न खचता होम टू होम प्रचार, कॉर्नर सभा, बैठकांवर जोर देत आहेत. यात कितपत यश मिळेल, याबाबत साशंकता आहे. त्यासाठी २३ तारखेची वाट पाहावी लागणार आहे. सोलापूर महापालिका निवडणुकीला तिसऱ्यांदा सामोरे जात असले तरी शहरातील समस्यांवर विचारमंथन करून साधा पक्षाचा जाहीरनामा काढण्याचा विचारही त्यांच्या मनात डोकावला नाही. नाशिकमध्ये विकास केल्याचा सोशल मीडियातून गवगवा होत आहे. याचा माहितीपट करून शहरवासीयांसमोर ठेवण्याचा पक्षाचा मानस होता, मात्र तो सत्यात उतरला नाही. चांगल्या कामाचे मार्केटिंग करण्यासही पदाधिकाऱ्यांना जमले नसल्याचे दिसून येत आहे. 

महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी वरिष्ठ नेत्यांना सोलापुरात आणून सभा, पदयात्रा काढण्याचे नियोजन आहे. मुंबई निवडणुकीत गुंतल्याने कोणाचीही सभा होऊ शकली नाही. सरतेशेवटी पक्षाची मोठी पदयात्रा काढण्यात येणार आहे. कमी असले तरी चांगले उमेदवार असून यंदा आम्ही खाते खोलणारच आहोत. 
- उमेश रसाळकर, शहर संघटक, मनसे

ओवेसी बंधूंच्या सभेने एमआयएममध्ये दिलासा
सोलापूर महापालिका निवडणुकीत एमआयएमचे आमदार, खासदार ओवेसी बंधूंनी खूपच लक्ष घातले आहे. त्यामुळेच त्यांनी सोलापूरला वेळ देऊन दोन जाहीर सभा घेतल्या. जाहीर सभांमुळे वातावरणात चांगलाच बदल झाला आहे. एमआयएम महापालिकेत खाते खोलून प्रवेश करणार, असे दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे. 

रोज कॉर्नर बैठक, पदयात्रा, होम टू होम प्रचार चालू आहे. ‘उडी उडी जाऐ...पतंग उडी जाए’ हे प्रचारगीत १२ प्रभागांतून ऐकावयास मिळत आहे. 

हैदराबादहून आलेले ५५ कार्यकर्ते उमेदवारांच्या १२ प्रभागांत होम टू होम प्रचार करीत आहेत. हैदराबाद, तेलंगणाच्या विकासकामांचा, योजनांचा भडिमार मतदारांवर केला जात आहे. यातून मतपरिवर्तन करण्याचे काम चालू आहे. हैदराबाद, तेलंगणा, औरंगाबाद येथून आमदार, पदाधिकारी सोलापुरात येऊन तळ ठोकून प्रचार यंत्रणेवर लक्ष ठेवून आहेत. 

मतदानाअगोदर ओवेसी बंधूंचा रोड शो करण्याचा विचार आहे. तशी बोलणी चालू आहेत. त्यांनी वेळ दिली तर रोड शोमधून वातावरणनिर्मिती होणार आहे. तेलंगणा, औरंगाबाद, हैदराबादहून आमदार शहरात येऊन पदयात्रेत सहभागी होत आहेत. 

- कोमारो सय्यद, सरचिटणीस, एमआयएम 

Web Title: The municipal election campaign