महापालिका निवडणुकीत दारू... छे, छे!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

सांगली - नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत कडक आचार संहितेच्या अंमलबजावणीमुळे दारुचा महापूर वगैरे काही नसल्याचे उत्पादन शुल्कच्या आकडेवारीवरुन दिसून येत आहे. साधारणपणे निवडणूक काळात दारुची मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर आवक होते. हजारो लिटर दारु कार्यकर्ते श्रमपरिहार म्हणून रिचवतात. तसे चित्र यंदाच्या निवडणुकीतही दिसून आले. मात्र शासकीय आकडेवारीवरुन तसे काही दिसत नाही.

सांगली - नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत कडक आचार संहितेच्या अंमलबजावणीमुळे दारुचा महापूर वगैरे काही नसल्याचे उत्पादन शुल्कच्या आकडेवारीवरुन दिसून येत आहे. साधारणपणे निवडणूक काळात दारुची मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर आवक होते. हजारो लिटर दारु कार्यकर्ते श्रमपरिहार म्हणून रिचवतात. तसे चित्र यंदाच्या निवडणुकीतही दिसून आले. मात्र शासकीय आकडेवारीवरुन तसे काही दिसत नाही.

महापालिका निवडणुकीत आचारसंहितेच्या बडग्यामुळे हॉटेल, ढाबे रात्री दहानंतर बंद होत होते. शहरातील मुख्य रस्त्यांवर मध्यरात्रीपर्यंत नाकाबंदी असे. यामध्ये सर्व वाहनांची कसून तपासणी करण्यात येत होती. त्यामुळे कोणत्याही प्रकारे अवैध दारु वाहतूक वगैरे काही होत नव्हती. सर्व काही आलबेल सुरु होते. उत्पादन शुल्कची तीन पथके, महापालिकेची भरारी पथके आणि पोलिसांची गस्त असा सर्व कडेकोड बंदोबस्त असल्यामुळे निवडणुकीसाठी अवैधरित्या दारु आली नाही, असा दावा उत्पादन शुल्ककडून करण्यात येत आहे.

खरे तर, निवडणूक काळात आचारसंहितेच्या बडग्यामुळे रात्रीची जेवणाची सोय एखाद्या कार्यकर्त्याच्या घरी, फार्म हाऊस, कार्यालयात केली जात होती. महापालिका हद्दीबाहेरील ढाबे हाऊसफुल्ल होते. तेथे दारुचा महापूर वहात होता. फक्त ते भरारी पथकांच्या परिघाबाहेर असल्याने कारवाई झाली नाही का? अवैध दारुची तस्करी मोठ्या प्रमाणात झाली, मात्र तिच्याकडे भरारी पथकांची नजर गेली नाही. पोलिसांनीच केलेली कारवाई मोठी ठरली. त्यांनी एका रत्ना बियर शॉपीच्या दोन बेकायदेशीर गोडाऊनवर छापा टाकून दहा लाखाची विदेशी दारु जप्त केली होती. त्याशिवाय जुना बुधगाव रोडवरही एका वाहनातून दारु जप्त केली. त्या तुलनेत उत्पादन शुल्क विभागाने आचार संहिता काळात २३४ लिटर विदेशी दारु जप्त केली. इतर देशी, हातभट्‌टी दारु पकडली. पण जशी कारवाईची अपेक्षा होती, ती झाली नाही. आचारसंहितेची कडेकोट अंमलबजावणी झाल्याने यंदा निवडणुकीत फार मोठ्या कारवाई झाल्या नाहीत, असा दावा उत्पादन शुल्क विभागाकडून करण्यात येत आहे.

एकूण ७१ गुन्हे दाखल
उत्पादन शुल्क विभागाने आचार संहिता काळात तब्बल ५.७८ लिटर गोवामेड विदेशी दारु, २२८ लिटर विदेशी दारु, ११४.३५ देशी दारु आणि ८५७ लिटर हातभट्‌टीची दारु जप्त केली होती. एकूण ७१ गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये ४२ आरोपींना अटक केली आहे. तर २९ गुन्ह्यात आरोपी सापडले नाहीत. दहा वाहनांसह एकूण सात लाख ५८ हजार ३८३ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

Web Title: Municipal Election Code of Conduct Liquor