विविध विकासकामांच्या जोरावर सामोरे जाणार

विविध विकासकामांच्या जोरावर सामोरे जाणार

आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या चिन्हावर राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढविणार आहे. पक्षाच्या स्थापनेपासून तालुक्‍यात राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. पंचायत समिती, नगरपालिका, बाजार समिती, तसेच प्रत्येक गावातील सोसायट्या व ग्रामपंचायतीची सत्ता पक्षाच्या ताब्यात आहेत. गावागावांत आणि वाडी-वस्तीवर कार्यकर्त्यांचे मोठे जाळे आहे.

आमदार मकरंद पाटील यांचे नेतृत्व समाजातील सर्व स्तरातील लोकांनी मान्य केले आहे. मागील ४० वर्षांच्या तालुक्‍याच्या राजकारणात सुसंस्कृत व विकासाची दृष्टी ठेऊन काम करणारा लोकप्रतिनिधी आमदार पाटील यांच्या रूपाने लाभल्याचा सार्थ अभिमान तालुक्‍यातील आबालवृध्दांना आहे.

राष्ट्रवादीच्या माध्यमातून आमदार पाटील यांनी केवळ तालुक्‍यात नव्हे, तर मतदारसंघातील तीनही तालुक्‍यांतील ३५६ गावांत व दुर्गम भागात पोच रस्ते, शिवार रस्ते, प्रमुख राज्यमार्गांची बांधणी करून प्रत्येक गाव व माणूस जोडण्याचा प्रयत्न केला. 

सामान्य शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि शेतीला पाणी मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. तालुक्‍यातील जललक्ष्मी, नागेवाडी कालवे तसेच कवठे-केंजळ योजनांची प्रलंबित कामे मार्गी लावली. सुमारे २० हजार एकर क्षेत्र नव्याने ओलिताखाली आणले. गावागावांत नळ पाणीपुरवठा योजना, शाळा, ग्रामसचिवालये व समाजमंदिरांच्या उभारणीसाठी पुढाकार घेतला. या विकास कार्यक्रमाच्या ताकदीवरच राष्ट्रवादी निवडणुकीला सामोरे जाईल.

- प्रतापराव पवार, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

सर्वांगीण विकासासाठी लढणार
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत किसन वीर साखर कारखान्याचे अध्यक्ष व माजी आमदार मदन भोसले यांच्या नेतृत्वाखाली सर्व कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन पूर्ण ताकदीने वाई पंचायत समितीवर झेंडा फडकविण्यासाठी आम्ही सज्ज झालो आहोत. या निवडणुकीच्या माध्यमातून तालुक्‍यात पुन्हा एकदा काँग्रेसला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. 

वाई तालुक्‍यात स्वातंत्र्य काळापासून काँग्रेस विचारांची परंपरा रुजली आहे. प्रत्येक गावात काँग्रेसचे अनेक निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. निवडणुकीच्या निमित्ताने तालुक्‍यातील प्रत्येक गाव व वाडी-वस्तीवर जाऊन निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या माध्यमातून काँग्रेसचा विचार समाजातील तळागाळापर्यंत पोचवून पक्षसंघटना बळकट करण्यासाठी पुढाकार घेणार आहे. काँग्रेसची परंपरा निर्माण करण्यासाठी कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. सर्वसामान्य जनतेतून येणाऱ्या उमेदवाराला संधी देण्याचे पक्षाचे धोरण या निवडणुकीत कटाक्षाने पाळले जाईल. त्यासाठी काम करणारा व निवडून येण्याची क्षमता असणारा उमेदवार असे निकष पक्षाने ठरविले आहेत. तालुक्‍यातील सर्वांगीण विकासाच्या मुद्यावर निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. तालुक्‍यात शेती पाणी आणि बेराजगारीचे प्रश्न गंभीर बनले आहेत.

सत्तारूढ पक्षाने अपेक्षांची पूर्ती न केल्याने सर्वसामान्य जनतेचा भ्रमनिरास झाला आहे. पूर्वीची सुसंस्कृत अशी वाई तालुक्‍याची ओळख पुन्हा निर्माण करण्यासाठी काँग्रेस पक्ष प्रयत्न करेल. विभागवार व गटनिहाय कार्यकर्त्यांचे मेळावे घेऊन इच्छुकांची चाचपणी करून प्रत्येक गटातील निष्ठावंत कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन उमेदवार निवडण्यात येणार आहेत.            

- रोहिदास पिसाळ, तालुकाध्यक्ष, काँग्रेस

वाई तालुक्‍यातील सर्वांगीण विकासाच्या मुद्द्यावर निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. पूर्वीची सुसंस्कृत अशी वाई तालुक्‍याची ओळख पुन्हा निर्माण करण्यासाठी काँग्रेस पक्ष प्रयत्न करेल.
- रोहिदास पिसाळ

परिवर्तनासाठी सर्व पर्याय खुले
वाई तालुक्‍यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर लढविणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता उलथवून परिवर्तन घडविण्यासाठी समविचारी पक्षांना बरोबर घेण्यासाठी सर्व पर्याय खुले ठेवले आहेत. गेल्या दीड वर्षात प्रदेश कार्यकारिणी सदस्य अविनाश फरांदे यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सहकार्याने शेतकरी मेळावा, तिरंगा यात्रा, सुराज्य पर्व रॅली आदी विविध सामाजिक उपक्रम राबवून तालुक्‍यात पक्षसंघटना बळकट करण्याचा प्रयत्न केला. केंद्र व राज्य सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोचविण्यासाठी पुढाकार घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकार मंत्री चंद्रकांत पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक पूर्ण ताकदीने लढविणार आहोत. वाई तालुक्‍यातील समस्यांची जाण असून त्या सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,

त्याचे यशात रुपांतर होईल, अशी खात्री आहे. केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार असल्याने फक्त भाजपच वाई तालुक्‍याच्या विकास व शेतकऱ्यांना स्वयंसिद्ध करू शकते. नुकत्याच पार पडलेल्या वाई पालिकेच्या निवडणुकीतील यशानंतर इतर पक्षांतील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपत प्रवेश करीत असून इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी आहे.

- सचिन घाटगे, तालुकाध्यक्ष, भाजप

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तालुक्‍यातील सत्ता बदलून आम्ही परिवर्तन घडवून आणणार आहोत. त्यासाठी इतर समविचारी पक्षांशी चर्चा सुरू असून त्यांना बरोबर घेऊन जाण्याची तयारी ठेवली आहे.  
- सचिन घाटगे

युती नाही; स्वबळावर रिंगणात
शि वसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार कोणाबरोबर युती अथवा आघाडी न करता शिवसेना वाई तालुक्‍यातील चार जिल्हा परिषद गट व आठ पंचायत समिती गणांत सक्षम उमेदवार देऊन पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढविणार आहे. 

राज्यात सध्या भाजप-शिवसेनेची सत्ता असून जिल्ह्याचे पालकमंत्री विजय शिवतारे यांच्या माध्यमातून तालुक्‍यातील अनेक रखडलेले प्रकल्प मार्गी लागलेत. तालुक्‍यातील विविध विकासकामे मंजूर झाली असून त्यासाठी निधी उपलब्ध झाला आहे. काही कामे पूर्णत्वाला गेली आहेत. त्याचे उद्‌घाटन करून श्रेय लाटण्याचा प्रयत्न प्रस्थापित करीत आहेत.

तालुक्‍यातील ८८ गावांमध्ये शिवसेनेच्या शाखा व कार्यकर्ते आहेत. त्यांच्या माध्यमातून पक्षाची भूमिका पोचविण्यात येत आहे. त्यासाठी प्रत्येक गावात, वाडी-वस्तीवर जाऊन बैठका घेण्यात येत आहेत. त्याला स्थानिक लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या बैठकीत तालुक्‍यात मंजूर झालेल्या कामांचा आढावा मांडण्यात येत आहे. 

त्यासाठी उपतालुकाप्रमुख अतुल जाधवराव, नारायण सणस, प्रल्हाद जाधव, श्री. राजपुरे आदी सक्रिय आहेत. शिवसेनेची उमेदवारी मिळविण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत. जिल्हाप्रमुख नंदकुमार घाडगे, संपर्क प्रमुख व उपनेते नितीन बानगुडे-पाटील, सह संपर्कप्रमुख डॉ. जाधव यांच्या नेतृत्वाखाली आणि नियोजन समितीचे सदस्य महेश शिंदे, ज्येष्ठ कार्यकर्ते हणमंतराव वाघ, चेतन नायकवडी यांच्या मार्गदर्शनाखाली इच्छुकांच्या मुलाखती घेऊन प्रत्येक गट व गणातील कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन सक्षम उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.

- अनिल शेंडे, तालुकाप्रमुख, शिवसेना

वाई तालुक्‍यातील ८८ गावांमध्ये शिवसेनेच्या शाखा व कार्यकर्ते आहेत. त्यांच्या माध्यमातून शिवसेनेची भूमिका नागरिकांपर्यंत पोचविण्यात येत आहे. 
- अनिल शेंडे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com