उमेदवारांच्या चेहऱ्यावर दिसला तणाव

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 फेब्रुवारी 2017

लोकसभेच्या तुलनेत मतदानाची टक्‍केवारी कमी झाल्याने काही केंद्र ओसच

लोकसभेच्या तुलनेत मतदानाची टक्‍केवारी कमी झाल्याने काही केंद्र ओसच

महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे मतदारांबरोबरच उमेदवारांच्या चेहऱ्यावरही तणाव स्पष्टपणे दिसत होता. मतदारांचा मतदान करताना गोंधळ होत होता. तर एका भागातील मतदारांची मते दुसऱ्या भागात समाविष्ट करून तयार केलेल्या बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे उमेदवारांच्या चेहऱ्यावर तणाव दिसत होता. लोकसभा निवडणुकीवेळी ज्या पद्धतीने मतदान झाले होते, त्या पद्धतीने मतदान महापालिका निवडणूक असूनही झाले नाही. त्यामुळे मतदारांत जागृती करण्यात प्रशासन कमी पडले का? शासनाने सुटी देऊनही उन्हामुळे मतदारांनी घराबाहेर पडणे टाळले का? हे सांगणे कठीण आहे.

प्रभाग क्रमांक - ५, ६, ७, ८ मधील चित्र
थोडी बाचाबाची पण बाकी मतदान शांततेत
या सर्वच प्रभागांत अतिशय चुरशीने मतदान झाले. प्रभाग पाचमधील रावजी सखाराम हायस्कूलमध्ये दुपारी १२च्या सुमारास महिलांनी मतदानासाठी गर्दी केली होती. प्रभाग क्रमांक आठमध्ये भाजपचे उमेदवार व काही विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. पोलिसांनी मध्यस्थी करून दोघांनाही शांत करण्याचा प्रयत्न केला.

प्रभाग क्रमांक पाचमध्ये दुपारी मतदारांची संख्या कमीच होती. दुपारपासून मतदारांच्या संख्येत वाढ झाली. प्रभाग क्रमांक सहामध्ये आवसे वस्तीमधील सह्याद्री शाळेमध्ये पावणेएकच्या सुमारास मतदान यंत्रामध्ये बिघाड झाल्यामुळे मतदान जवळपास एक तासभर बंद ठेवले होते. मशिन दुरुस्त करण्याचा ट्रेनर आल्यानंतर पुन्हा मतदानाला सुरवात झाली.

सह्याद्री शाळेमध्ये मंडप मारल्याने मतदारांसाठी सावलीची व्यवस्था झाली होती. या प्रभागात सुंदराबाई डागा शाळेमध्ये वयस्क आजीबाई मतदानासाठी आल्या होत्या. या ठिकाणी १०० मीटरच्या बाहेर कार्यकर्त्यांनी उभे राहण्यावरून पोलिस व कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. राष्ट्रवादीच्या उमेदवार गीता पवार या मतदारांच्या भेटी घेत होत्या. मतदान केंद्राच्या बाहेर राष्ट्रवादीचे उमेदवार दिलीप कोल्हे उभे होते. या ठिकाणी मतदारांची नावे शोधण्यासाठी लॅपटॉपचा आधार घेण्यात आला होता. प्रभाग क्रमांक सातमध्ये कार्यकर्त्यांना बाहेर काढण्याच्या तक्रारी पोलिसांकडे केल्या जात होत्या. 

शिवसेनेचे उमेदवार अमोल शिंदे या केंद्रावर होते. या केंद्रावर मतदान करण्यासाठी मतदारांनी रांग लावली होती. याच प्रभागातील शरदचंद्र पवार प्रशालेत मतदारांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. जे मतदार स्वतः मतदान करू शकत नव्हते, त्यांना रक्तातल्या नात्यांमधील लोकांनाच बरोबर घेऊन येण्याचा आग्रह पोलिस करत होते. या शाळेमध्ये मुलांना खेळण्यासाठी घसरगुंडीची व्यवस्था होती. मतदार आपल्या लहान मुलांना या घसरगुंडीच्या ठिकाणी सोडून मतदान करण्यासाठी गेले होते. लहान मुले घसरगुंडीचा आनंद घेत होते तर त्यांचे आई-वडील मतदान करत असतानाचे चित्र या केंद्रावर पाहायला मिळाले. या केंद्रावर शिवसेनेचे उमेदवार देवेंद्र कोठे उपस्थित होते. अभिमानश्रीनगर येथे असलेल्या लोकमंगल प्रशालेमधील एका केंद्रावर मतदारांनी मोठी रांग केली होती. प्रभाग क्रमांक आठमध्ये साखर पेठेतील नारायणराव कुचन शाळेतील मतदान केंद्रावर भाजपच्या उमेदवार शोभा बनशेट्टी व विरोधी पक्षातील काही कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करून या प्रकरणावर पडदा टाकला. या प्रभागातील मार्कंडेय हायस्कूल, महापालिका मुलींची उर्दू शाळा, नीलकंठेश्‍वर प्रशाला या ठिकाणी सकाळी ११च्या सुमारास मतदानाची टक्केवारी खूपच कमी होती.

ठळक घडामोडी
प्रभाग सहामधील सह्याद्री शाळेतील मतदान यंत्रात बिघाड
प्रभाग आठमध्ये उमेदवार व विरोधी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
प्रभाग सहामध्ये पोलिस व कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
प्रभाग पाचमध्ये महिला मतदारांच्या रांगा
सर्वच प्रभागांतील उमेदवारांच्या चेहऱ्यावर दिसत होता तणाव

Web Title: municipal election solapur