स्वीकृतसाठी तासगावमध्ये रस्सीखेच

रवींद्र माने
मंगळवार, 13 डिसेंबर 2016

तासगाव - तासगाव पालिका निवडणुकीनंतर आता स्वीकृत सदस्यपदासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. २३ रोजी होणाऱ्या सभेमध्ये उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत सदस्य निवडी होणार आहेत. याच दिवशी नवे नगराध्यक्ष आपला कार्यभार स्वीकारतील. स्वीकृत नगरसेवकपदासाठी इच्छुकांनी पक्षनेत्यांकडे फिल्डिंग लावण्यास सुरवात केली आहे. 

तासगाव - तासगाव पालिका निवडणुकीनंतर आता स्वीकृत सदस्यपदासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. २३ रोजी होणाऱ्या सभेमध्ये उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत सदस्य निवडी होणार आहेत. याच दिवशी नवे नगराध्यक्ष आपला कार्यभार स्वीकारतील. स्वीकृत नगरसेवकपदासाठी इच्छुकांनी पक्षनेत्यांकडे फिल्डिंग लावण्यास सुरवात केली आहे. 

थेट नगराध्यक्षपदासह पालिकेची निवडणूक झाल्यानंतर आता नूतन सदस्यांकडून पदभार स्वीकारणे, स्वीकृत सदस्य निवड आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीची उत्सुकता लागली आहे. येत्या २३ डिसेंबर रोजी या निवडी आणि पदभार स्वीकारला जाईल. मात्र त्यापूर्वी उपनगराध्यक्ष कोण आणि स्वीकृत नगरसेवक कोण, याची चर्चा सुरू झाली आहे. निवडणुकीत भाजपाचे १३, तर राष्ट्रवादीचे ८ सदस्य निवडून आले आहेत. सदस्यांच्या संख्येच्या प्रमाणात भाजपा आणि राष्ट्रवादीचा प्रत्येकी एक स्वीकृत सदस्य निवडला जाणार आहे. 

स्वीकृत सदस्य म्हणून जुन्या ‘जाणत्यां’ ना पुन्हा संधी मिळणार ? की निवडून आलेल्या नव्या चेहऱ्याप्रमाणे स्वीकृत सदस्यही नवे जाणार ? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. यासाठी अनेकजणांनी आपल्या नेत्यांना साकडेही घालण्यास सुरवात केली आहे. इच्छुकांच्या समर्थकांची शिष्टमंडळे नेत्यांना भेटू लागली आहेत. इच्छुकांमध्ये आजी माजी पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा समावेश आहे. तर काही जणांना निवडणुकीआधीच नेत्यांनी ‘शब्द’ दिला असल्याचे सांगितले जात आहे. त्यामानाने भाजपाच्या तुलनेत राष्ट्रवादीतून इच्छुकांची संख्या कमी आहे.  

निवडून गेलेले बहुतांशी पालिका राजकारणात नवे असल्याने काही सत्तेचा अनुभव असलेले हवेत, असा मतप्रवाह ऐकू येत आहे. तर निवडणुकीत मदत केलेल्यांपैकी काही जणांना संधी मिळावी, असाही मतप्रवाह सुरू झाला आहे. स्वीकृत सदस्यपदासाठी भाजपामध्ये इच्छुकांची अक्षरशः मांदियाळी झाली आहे. त्यातून योग्य निवडीचे आव्हान पक्षनेत्यांसमोर उभे राहिले आहे. स्वीकृत सदस्य निवडताना ‘‘गुणवत्ता’’ पाहिली जाते की ‘‘सोय’’ पाहिली जाते, हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे.

इच्छुकांची संख्या वाढली
डॉ. विजय सावंत थेट नगराध्यक्षपदी निवडून आल्याने आता उपनगराध्यक्षपदी कोण? याची चर्चा सुरू झाली आहे. नव्या सदस्यांची आणि खासदार संजय पाटील यांची अद्याप बैठक झाली नाही. बैठक झाल्यानंतर उपनगराध्यक्षपदाबाबत निर्णय होईल, असे नगरसेवकांमधून बोलले जात आहे. जाफर मुजावर, अनिल कुत्ते यांच्यापैकी एकाच्या नावावर शिक्‍कामोर्तब होण्याची शक्‍यता आहे. तासगावच्या नगराध्यक्षपदाची संगीत खुर्ची थांबली, आता उपनगराध्यक्षपद आणि स्वीकृत नगरसेवकपदाची सुरू होण्याची शक्‍यता आहे.

Web Title: municipal election tasgav