उड्डाणपुलात पालिका, महावितरणचे अडथळे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 डिसेंबर 2016

सांगली - विश्रामबाग येथील रेल्वे उड्डाणपूल उभारणीच्या कामाला गती आली आहे; मात्र महापालिका आणि महावितरणच्या आडकाठी आणण्याच्या भूमिकेमुळे कामात अडचणी निर्माण झाल्या आहेत. बांधकाम विभागाकडून वारंवार पत्रव्यवहार करूनही महापालिका आणि महावितरणचे अधिकारी सहकार्य करत नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या पुलाचे बांधकाम पंचवीस टक्के पूर्ण झाले असून जूनअखेर काम होणार असल्याचे ‘टी अँड टी’कंपनीच्या अभियंत्यांनी सांगितले. 

सांगली - विश्रामबाग येथील रेल्वे उड्डाणपूल उभारणीच्या कामाला गती आली आहे; मात्र महापालिका आणि महावितरणच्या आडकाठी आणण्याच्या भूमिकेमुळे कामात अडचणी निर्माण झाल्या आहेत. बांधकाम विभागाकडून वारंवार पत्रव्यवहार करूनही महापालिका आणि महावितरणचे अधिकारी सहकार्य करत नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या पुलाचे बांधकाम पंचवीस टक्के पूर्ण झाले असून जूनअखेर काम होणार असल्याचे ‘टी अँड टी’कंपनीच्या अभियंत्यांनी सांगितले. 

प्रदीर्घ काळापासून उड्डाणपुलाची मागणी होती. विश्रामबाग आता मध्यवर्ती शहराचा भाग झाला आहे. गेल्या तीन दशकांत वाहनांची संख्याही फुगत गेली. या मार्गावर दररोज शेकडो वाहनांची वर्दळ असते. 

दिवसभरात डझनभर रेल्वेगाड्या या ट्रॅकवरून धावत असतात. प्रत्येकवेळी गेटच्या दोन्ही बाजूला वाहनांची रांग लागलेली असते. लोकांचा वेळ जायचा, त्यासाठी पूल होणे गरजेचे होते. शासन दरबारी प्रलंबित असणारी फाइल अखेर चार महिन्यांपूर्वी मंजूर झाली. त्यानंतर गेल्या महिन्यात कामाला सुरवात करण्यात आली आहे. हे काम करण्यासाठी पुण्यातील ‘टी अँड टी’ कंपनीला ठेका देण्यात आला आहे. अत्याधुनिक ‘स्काडा’ प्रणालीच्या माध्यमातून काम सुरू आहे. मात्र महापालिका आणि महावितरणच्या आडकाठी भूमिकेने कामात ढीगभर अडचणी निर्माण झाल्या आहे. 

महापालिका आणि महावितरणला विद्युत वाहिनी, खांब, खोकी, पाण्याच्या पाइपलाइन हटवण्याबाबत पत्र पाठवण्यात आले होते. मात्र पुलाचे बांधकाम आता २५ टक्के झाले तरी विद्युतवाहिनी, खोकी ‘जैसे थे’ च आहेत. त्यामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. भागातील भली मोठी झाडेही महापालिकेच्या बागा विभागाने काढली नाहीत. तसेच पाण्याच्या पाइपलाइनचेही स्थलांतर करण्यात आले नाही. वारंवार पत्रव्यवहार करूनही कामात दिरंगाई केली जात आहे. महापालिका आणि महावितरणने सहकार्य केल्यास जूनअखेर पुलाचे बांधकाम पूर्ण होईल, असे ठेकेदारांनी सांगितले. रेल्वे गेटपासून दोन्ही बाजूला साधारण साडेतीनशे मीटर इतक्‍या अंतराचा पुलाचा उतार असेल. तीन रेल्वे ट्रॅकचा विचार करून या पुलाची उभारणी असून रुंदी साधारण साडेदहा मीटर इतकी असेल. पुलावर दोन्ही बाजूला पदपथ असतील. 

‘‘अत्याधुनिक स्काडा प्रणालीद्वारे बांधकाम सुरू आहे. त्यातील दर्जा तपासणी वेळोवेळी घेतली जाते. उभारलेल्या बांधकामाची मशीनद्वारे चाचणी केली जाते. पुन्हा सात दिवसांनंतर क्‍युरिंग टेस्ट घेतली जाते. २४ न्युटॉन इतकी क्षमता एका ब्लॉकची आहे. त्यामुळे दर्जेदारच बांधकाम होत आहे. महापालिका आणि महावितरणने सहकार्य करण्याची गरज आहे.’’
- संजय देसाई, उपविभागीय अभियंता, बांधकाम विभाग

‘‘आमच्या कंपनीद्वारे सध्या भारतात २३ ठिकाणी पुलाचे बांधकाम सुरू आहे. टेंडरमध्ये दिलेल्या वेळेपूर्वीच काम पूर्ण केले जाते. स्काडा प्रणाली असल्याने बांधकामात तडजोड केली जात नाही.’’
- बळिराम पवार, अभियंता टी अँड टी कंपनी, पुणे

स्काडा प्रणाली काय?
बांधकामाचा दर्जा उत्तम राहावा, यासाठी जागतिक दर्जाची ‘स्काडा’ प्रणाली वापरली जात आहे. स्काडा प्रणाली अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करून बनवली आहे. फौंडेशन, सिमेंट-वाळूचे मिश्रण, सळी, पाण्याचा वापर, क्‍युरिंग आदींच्या नोंदी ठेवल्या जातात. तयार मिश्रणातून तयार केलेल्या ब्लॉकचे इलेक्‍ट्रीक हायड्रो मशीनद्वारे तपासणी करून त्याची स्काडावर नोंद होते. ही सर्व प्रक्रिया ऑनलाइन असल्याने सर्वांना पाहता येते. वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत ऑनलाइन तपासणी करता येते.

Web Title: municipal electricity problem for overbridge