घरपट्टीला लागलेल्या घुशींचा नायनाट करा

घरपट्टीला लागलेल्या घुशींचा नायनाट करा

भानुदास यादवनामक लिपिकाचे घरपट्टी विभागात दोन लाखांच्या घोटाळ्याबद्दल निलंबन झाले. आता त्याची चौकशी, फौजदारी होईल. कदाचित त्याला पुन्हा कामावर घेतले जाईल. घोटाळ्याची रक्कम त्याच्या वेतनातून कपात केली जाईल. तो सापडला म्हणून शिक्षा काय, तर बिनव्याजी कर्ज दिल्याप्रमाणे मासिक परतफेड योजना. असेच महाभाग पाणीपट्टी, मालमत्ता विभागात आहेत. अनेक वरिष्ठांनी अशाच लाखोंच्या तसलमात रकमा घेतल्या आहेत. स्वतःची पगारवाढ करून घेतल्या आहेत. या सर्वांना सतत वरिष्ठांनी ‘आपला तो बाब्या’ म्हणून पाठीशी घातलेय. अमुक एक आयुक्त कारवाई करतात आणि पुढचा त्याला आरोपमुक्त करून कामावर घेतात आणि वर्षानुवर्षांचा हाच पायंडा सुरू आहे.

महापालिकेतील विविध विभागांतील दरवर्षी अशा घोटाळ्याबद्दल कर्मचारी निलंबित होतात. हे कर्मचारी कर गोळा करतात. नागरिकांना पावत्या देतात. ही पावतीबुके महापालिकेत जमाही करतात, फक्त पैसा जमा करीत नाहीत. मग कधी तरी ही बाब वरिष्ठांच्या लक्षात येते. तोवर दोन-चार लाखांचा खड्डा पडलेला असतो. दिलेल्या पावती बुकांचे या कर्मचाऱ्यांनी केलं काय, हे त्या विभागाचे प्रमुख पाहात नाहीत का? गलेलठ्ठ पगार घेऊन प्रतिनियुक्तीवर आलेले या अधिकाऱ्यांचे काम टक्केवारीसाठी बिले अडवणे एवढेच आहे का? पूर्वी इथे अंतर्गत लेखापरीक्षक होते म्हणे. गेल्या चार-पाच वर्षांपासून ही जमातच गायब झालेली आहे. ते किर्द खतावण्या तपासायचे.

ऑनलाइनच्या जमान्यात थेट बॅंक खात्यावर रकमा जमा होतात म्हणे. फक्त ती खाती महापालिकेची असत नाहीत एवढीच आपली प्रगती. प्रतिनियुक्तीवर आलेले सहायक संचालक लेखा परीक्षक संजय गोसावी यांना प्रीऑडिटमध्ये मोठा रस असतो. खरे तर इथे पोस्ट ऑडिट करण्यात कुणालाच स्वारस्य नाही. कारण केलेला उकिरडा कोण चाचपत बसणार?
घरपट्टी घोटाळ्याबद्दल मिरजेतील दोन कर्मचारी काही महिन्यांपूर्वी निलंबित झाले. अमर अंकलगी आणि भोकरे नामक एक बयाबाई. यातले अंकलगी महाशय पुन्हा रुजू झाले. त्यांच्या पगाराला चार पाच हजारांची कपात लावण्यात आली. आता ते दुसऱ्या घोटाळ्यात अडकले असून लवकरच दुसऱ्यांदा निलंबित होतील. पुन्हा ‘येरे माझ्या मागल्या’. विविध कारणास्तव तसलमात रकमा उचलायच्या आणि त्याचा हिशेबच सादर करायचा नाही, ही पालिकेच्या सर्व वरिष्ठांना लागलेली सवय. लेखापरीक्षणात याबद्दल वर्षानुवर्षे ताशेरे ओढले जातात. मात्र ते ताशेरे अभिमानाने मिरवत हे अधिकारी पुन्हा त्याच पदावर काम करीत असतात. पाणीपुरवठा विभागात पाच, घरपट्टी विभागात तीन आणि तसलमात रकमांच्या वसुलीसाठी दहा जणांच्या वेतनातून सध्या कपात सुरू आहे. महापालिकेचा...जनतेचा पैसा हे नतद्रष्ट लाचखोर अधिकारी बिनव्याजी वापरत आहेत. खाल्ल्या ताटात घाण करणारी ही अवलाद म्हणजे पालिकेला लागलेल्या जळवा आहेत. त्यांना तुरुंगात डांबणे दूर, काही काळाने त्यांना सन्मानाने पुन्हा कामावर घ्यायचे ठराव इथले निर्लज्ज विश्‍वस्त करीत असतात. मग नागरिकांनी कर रूपाने पैसा तरी का भरायचा? तुम्ही सर्वसामान्यांच्या घराला टाळे लावणार आणि त्याचवेळी या नतद्रष्टांची भर करून त्यांची जन्मभराची सोय करणार. 

या घुशींनी पालिका पोखरून गेली आहे. त्यांचा कायमचा नायनाट कराच. पावतीबुके तपासायची आणि त्यावर कारवाई करायची जबाबदारी असणाऱ्या विभागप्रमुख आणि लेखा परीक्षकांवरही काही तरी कारवाई कराच. 

कैक घाेटाळे ढिगाऱ्याखाली
गुंठेवारी नियमितीकरणाचे तीस-चाळीस लाखांचे धनादेश न वटवता फायलींच्या ढिगाऱ्यात सापडले. असे कैक घोटाळेही  ढिगाऱ्याखाली दडपले गेले आहेत, कधीही न बाहेर येण्यासाठी!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com