महापालिकेला जागा हवी असल्यास बंगला पाडतो  - सुभाष देशमुख

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 एप्रिल 2018

कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरकार असताना पिशवीतील सोसायट्यांच्या मतावर निवडणुका जिंकण्याचा प्रकार होता. आमच्या सरकारने शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार दिला आहे. यापुढे खऱ्या अर्थाने बाजार समितीच्या निवडणुका लोकशाही पद्धतीने होतील. 
- सुभाष देशमुख, सहकारमंत्री

सोलापूर - महापालिकेने परवानगी दिल्यामुळेच अग्निशमन दलासाठी आरक्षित असलेल्या जागेवर बंगला बांधला. ही जागा महापालिकेला हवी असल्यास बंगला पाडून टाकतो, असे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले. भाजपमुळे नव्हे तर, कॉंग्रेस व राष्ट्रवादीमुळेच सोलापूरचे नुकसान झाल्याचेही ते म्हणाले. 

सोलापूर श्रमिक पत्रकार संघात त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले, 'होटगी रस्त्यावरील जागा अग्निशमन दलासाठी नको असा ठराव महापालिकेनेच 2004 मध्ये केला. 2012 मध्ये पालिकेने काही अटी व शर्थींवर बांधकाम परवानगी दिल्यामुळेच हा बंगला मी बांधला. त्यापूर्वी कॉंग्रेस सत्तेत असतानाच ही जागा अग्निशमनसाठी नको म्हणून ठराव करण्यात आला आहे. केवळ मीच नव्हे तर माझ्याबरोबर आणखीन 20 ते 25 मिळकतदार आहेत. त्यावेळी अग्निशमनसाठी जागा नको असा ठराव करणारेच आज गोंधळ करीत असतील तर महापालिकेने ही जागा आजही अग्निशमन केंद्रासाठी घ्यावी, मी राहता बंगला पाडण्यास तयार आहे.'' 

दोन देशमुखांमुळे सोलापूरचे नाव खराब झाले, असा आरोप राष्ट्रवादीचे नेते अजीत पवार यांनी केला होता. त्याबाबत श्री. देशमुख म्हणाले, 'सोलापूरचे वाटोळे अनेक वर्षांपूर्वी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस सत्तेत असताना झाले आहे. महापालिकेवर साडेचारशे कोटींचे कर्ज असल्यामुळे विकासकामाला निधी कमी पडत आहे. तरीही आमच्या सरकारने दुहेरी जलवाहिनी, ड्रेनेजसाठी कोट्यवधीचा निधी दिला आहे. आम्ही दोन्ही मंत्री एकदिलाने काम करत आहोत. येत्या काळात सोलापूरचा विकास भाजपच करेल. टीका करणाऱ्यांनी आत्मचिंतन करावे.'' 

लातूर येथे लिंगायत समाजाचा अवमान केल्याचा आरोप श्री. देशमुखांवर केला जात आहे. त्याबाबत ते म्हणाले, 'या देशातील नागरीक भुकेला, गरीब आहे. विद्यापीठाच्या नामांतराचा विषय झालाच पाहिजे. सरकारकडील त्यांच्या ज्या मागण्या आहेत, त्यासाठी मी त्यांच्यासोबत आहे. पण भुकेलेल्यांसाठीही संघर्ष झाला पाहिजे या मताचा मी आहे.'' महापालिका बरखास्तीचा दम मुख्यमंत्र्यांनी दिला असला तरी, त्यामुळे सोलापूरचे मार्केटींग वाईट होणार नाही. सर्वांनी मिळून सोलापूरच्या सकारात्मक मार्केटींगसाठी प्रयत्न केले पाहिजेत, असेही ते म्हणाले.

Web Title: municipal land bunglow subhash deshmukh