आता कसोटी सर्वसामान्य मतदारराजाची!

श्रीकांत कात्रे - t@shrikantkatre
रविवार, 13 नोव्हेंबर 2016

नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीचे चित्र शुक्रवारी स्पष्ट झाले. काही ठिकाणी पक्षीय पातळीवर, तर बहुतेक ठिकाणी आघाड्यांद्वारे आता प्रचाराची चुरस रंगत जाईल. प्रचारात एकमेकांची उणीदुणी काढणे आणि आरोप- प्रत्यारोपांची फैरी झाडणे यापलीकडे फारसे काही हाती लागत नाही. नागरी प्रश्‍नांकडे तोंडी लावण्यापुरते पाहण्याचा दृष्टिकोन नेत्यांनीच बदलायला हवा. नागरी प्रश्‍नांचे मुद्दे प्रचाराचे मुख्य सूत्र असायला हवे. तसे होत नसेल तर सर्वसामान्य मतदारांनीच मते मागावयास येणाऱ्या उमेदवारांवर आणि त्यांच्या नेत्यांवर प्रश्‍नांची सरबत्ती करायला हवी.

नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीचे चित्र शुक्रवारी स्पष्ट झाले. काही ठिकाणी पक्षीय पातळीवर, तर बहुतेक ठिकाणी आघाड्यांद्वारे आता प्रचाराची चुरस रंगत जाईल. प्रचारात एकमेकांची उणीदुणी काढणे आणि आरोप- प्रत्यारोपांची फैरी झाडणे यापलीकडे फारसे काही हाती लागत नाही. नागरी प्रश्‍नांकडे तोंडी लावण्यापुरते पाहण्याचा दृष्टिकोन नेत्यांनीच बदलायला हवा. नागरी प्रश्‍नांचे मुद्दे प्रचाराचे मुख्य सूत्र असायला हवे. तसे होत नसेल तर सर्वसामान्य मतदारांनीच मते मागावयास येणाऱ्या उमेदवारांवर आणि त्यांच्या नेत्यांवर प्रश्‍नांची सरबत्ती करायला हवी. शहरांचा बकालपणा दूर होऊन सर्वसामान्यांचे जगणे सुखद होण्यासाठी सर्वसामान्यांनीच पुढाकार घेण्याची वेळ आली आहे.

सातारा, कऱ्हाड, वाई, फलटण, म्हसवड, रहिमतपूर, महाबळेश्‍वर व पाचगणी या आठ नगरपालिका आणि दहिवडी, वडूज, कोरेगाव, खंडाळा, मेढा आणि पाटण या सहा नगरपंचायती अशा 14 ठिकाणांसह राज्यात नागरी निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. बहुतेक ठिकाणी तिरंगी लढती होत आहेत. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या प्रमुख पक्षांचे उमेदवार काही ठिकाणी लढत देत आहेत.

स्थानिक नेत्यांच्या आघाड्याच या रणधुमाळीचा प्रमुख भाग बनून गेल्या आहेत. या निवडणुकांवर पक्षीय शिस्तीचे कोणतेही नियंत्रण राहणार नाही, अशीच व्यवस्था केली जाते. त्यामुळे स्थानिक नेतेमंडळी आपल्या सोयीचे राजकारण करतात. आयाराम- गयारामांचा इकडून तिकडे आणि तिकडून इकडे प्रवास सुरू असतो. आघाड्यांसमोर कोणतीही ध्येयधोरणे असलीच पाहिजेत, असे बंधन नसते. फक्त सत्ता हस्तगत करण्यासाठी आघाड्यांची धडपड असते. त्यासाठी साम, दाम, दंड, भेद येनकेनप्रकारे सत्तेच्या शिडीपर्यंत पोचण्याचाच खटाटोप राहतो. त्यात कधी मोठ्या समजल्या जाणाऱ्या कार्यकर्त्यांचा पत्ता कट होतो, तर कस्पटासारखी किंमत असणारा एकदम "महान' बनून जातो. तडजोडींच्या बैठका रंगतात. जेवणावळींनी चोचले पुरवले जातात. नाराजांना गटविण्यासाठी खुषमस्करीही होते. काही जणांवर डोळा ठेवून पाडण्याचे डावपेचही रंगतात. या सर्व काळात युवकांचा उपयोग मोठ्या प्रमाणावर करून घेतला जातो. राजकारणात युवकांचा सहभाग वाढायला हवा, यात शंका नाही. वास्तविक युवाशक्तीला विधायक वळण देण्याचे प्रयत्न व्हायला हवेत. मात्र, निवडणूक काळात त्याच्यासमोर वेगळीच गणिते उकलली जात असतात. दिवसा जेवढ काही घडत असतं, त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक रात्रीच्या अंधारात शिजत असतं. दिवसा जे दिसतं त्याच्यापेक्षा रात्रीचं बरचं काही वेगळंही असतं. निवडणुकीच्या रणधुमाळीत असचं बरचं काही सुरू असलं तरी जो मतदारराजा आहे,

त्याच्यावर आश्‍वासनांची खैरात असते. बहुतेक आश्‍वासने मागच्या निवडणुकीतीलही असतात. केवळ आश्‍वासनाने सुखावून जाणारा मतदारराजाही स्वप्नांत गुंतून जातो.

आगामी 15 दिवस प्रचाराने व्यस्त असणार आहेत. मतदारराजाने जागरूकतेने आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींकडे सजगपणे पाहिले पाहिजे. आमिषाला दूर सारून आपले स्वतंत्र मत तयार करण्याची भूमिका प्रत्येकाने पार पाडावी. आपल्या शहराचा चेहरा सुंदर व्हावा, सर्व क्षेत्रांतील किमान सुखसुविधा उपलब्ध असाव्यात, शहरातील नागरिकाचे जगणे सुखद व्हावे, याची दृष्टी बाळगणारे नेते आणि उमेदवार आपल्याभोवती आहेत का, हेही तपासले पाहिजे. त्यामुळे सर्वसामान्य मतदारांच्या दृष्टीने हा कसोटीचा काळ आहे. एक तर मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे आणि तो बजावतानाही आपण डोळस असले पाहिजे. बकालपणाची किळस डोळ्यामध्ये दिसली पाहिजे, शहर विकासाचा विचार मनात असला पाहिजे. सुरक्षित दहशतमुक्त वातावरणात पुरेसा पाणीपुरवठा, सुंदर आरोग्यदायी स्वच्छता, सुकर वाहतूक, पर्यावरणपूरक जगण्याच्या आनंदासह सलोख्याने सुसंस्कृत वाटचालीची हमी देणारे, अभ्यासाने सिद्ध होणारे आणि वॉर्डाबरोबरच शहराचा विचार करणारे, सभागृहाची आणि पर्यायाने शहराची उंची वाढविणारे सदस्य मिळणे गरजेचे आहे. मतदारराजाने हेच लक्षात घ्यायला हवे. पाच वर्षांतून एकदाच तुम्ही राजा असता. या संधीचे सोने करण्याची हीच वेळ आहे. ती गमावू नका. नाही तर "पहिले पाढे पंचावन्न.' लोकशाहीतील राजे पाच वर्षे काय करतील, याचा तुम्हाला थांगपत्ताही लागणार नाही.

Web Title: municipal nagarpanchyat election